शाहू मिलसाठी निधी का नाही?
शाहू स्मृती व विचार जतन समितीची विचारणा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : मुंबईत स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी शासनाने चारशे कोटी रुपये खर्चाची तरतूद केली आहे. मग, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उभारलेल्या राजर्षी छत्रपती शाहू मिल पुनरुज्जीवित करण्यासाठी शासन ८५ ते शंभर कोटी रुपयांचा खर्च का करत नाही, अशा आशयाचे पत्रक राजर्षी छत्रपती शाहू स्मृती व विचार जतन समिती व मावळा संस्थेने प्रसिध्दीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदिराचे लोकार्पण नुकतेच झाले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगेशकर संगीत महाविद्यालयाच्या वास्तूची निविदा आचारसंहिता संपल्यानंतर निघेल, अशी घोषणा केली. या महाविद्यालयाला विरोध नाही. पण, मंत्री पाटील कोल्हापूरचे सुपुत्र आणि वस्त्रोद्योग मंत्री आहेत. त्यांनी मनावर घेतले तर शाहू मिलसाठीही निधी मिळू शकतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या पैशातून कोल्हापूरकरांना रोजगार मिळावा, यासाठी शाहू मिलची स्थापना केली. पुढे राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे ती बंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक वर्षी शेकडो तरुण अभियंते तयार होत असूनही त्यांच्या हाताला काम नाही, असे चित्र आहे. एकीकडे राज्य सरकार सह्याद्री अतिथीगृहावर चहा, जेवणावळीसाठी दोन कोटी रुपये खर्च करते. पण, शाहू मिलचा साधा भोंगाही शासनाला सुरू करता आला नाही. अखेर मावळा ग्रुप व शाहू प्रेमींनी स्वनिधीतून शाहू मिलचा भोंगा सुरू केला. ८५ ते शंभर कोटी रुपये खर्च करून पंचवीस हजार स्पीडलची नवीन तंज्ञज्ञानासह शाहू मिल पुनरुज्जीवित होऊ शकते.
पत्रकावर माजी महापौर आर. के. पोवार, ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, ॲड. सतीश नलवडे, अमित अतिग्रे, महादेव पाटील, श्रीकांत माने, फिरोजखान उस्ताद, विजय शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.