वळीव बरसला, ओला चारा बहरला!
यंदा मुबलक उपलब्धता : आताच आला कापणीला, दोन वर्षे भासली होती टंचाई
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : पाऊसमान चांगले असेल तर त्याचा सर्वच घटकांवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. अगदी जनावरांच्या चाऱ्याबाबतही हे सूत्र लागू आहे. दोन वर्षांत ओल्या चाऱ्याची मोठी टंचाई भासली होती. मात्र, यंदा वळीव चांगला झाला. त्यामुळे ओला चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. आताच तो कापणीला आला आहे.
शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. ग्रामीण भागात काही अपवाद वगळता घरटी एखाद-दुसरे जनावर हमखास मिळते. गडहिंग्लज तालुक्याचा विचार केला तर गाय व म्हैसवर्ग जनावरांची संख्या ७६ हजार आहे. यावरून जनावरांची विपुलता लक्षात येते. शेतीतील ज्वारीचा कडबा, भाताचे पिंजर हा सुका चारा उपलब्ध होतोच. शिवाय शेताकडेच्या बांधावरील ओला चारा पावसाळ्यात जनावरांचे भरण-पोषण करतो.
दोन-तीन वर्षांत वळीव पावसाने दगा दिला होता. त्याचा परिणाम जसा शेतातील कष्टकामावर झाला तसाच तो चाऱ्याच्या उपलब्धतेवरही दिसून आला होता. ओल्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवली होती. साहजिकच दरही भरमसाठ वाढले होते. काही शेतकऱ्यांनी मूरघास बनवण्याला प्राधान्य दिले होते. अगदी लगतच्या कर्नाटकातूनही मूरघास आणले होते. मात्र, यंदा परिस्थिती बदलली आहे. वळीव चांगलाच बरसला. मे महिन्यात तर पावसाळ्यासारखी परिस्थिती होती. त्याचा सकारात्मक परिणाम शेताच्या कडेला असणाऱ्या बांधावरील ओल्या चाऱ्याच्या वाढीवर झाला आहे. आता जुलैच्या पहिल्या आठवड्यातच अनेक ठिकाणी चारा कापणीला आला आहे. मुबलक प्रमाणात चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला उपलब्धता वाढल्यामुळे मागणी घटली आहे. त्यामुळे ओल्या चाऱ्यासाठी ग्राहक मिळणे अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे.
-------------
यावर्षी वळीव पाऊस चांगला झाला. त्यामुळे बांधावरील गवत चांगले आले आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यांत येणारी पहिली कापणी यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात आली आहे. त्यामुळे दुसरी कापणीही लवकर येणार आहे.
- संभाजी केसरकर, दूध उत्पादक शेतकरी
बेळगुंदी, ता. गडहिंग्लज
--------------
अर्धा एकरवर गाजर गवत आहे. शिवाय बांधावरचेही गवत आले आहे. म्हैस नसल्याने गवत विकतो. दरवर्षी या गवताला मागणी होती. लोक विचारत येत होते. यंदा गवत पाहिजे म्हणून कोणी आले नाही. दोघा-तिघांना विचारणाही केली. पण, त्यांनीही आपले गवत असल्याने नकार दिला.
- संजय शिंदे,
अत्याळ, ता. गडहिंग्लज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.