घरातील सिलिंडरसह अंथरुणही नेले
भोंदूबाबाचा आदेश : करणीच्या भीतीने गाळण, सुशिक्षित कुटुंबाची वाताहत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : अघोरी शक्ती, काळी जादू, करणी, गुप्तधन, चेटूकसारख्या शब्दांनी सर्वसामान्यांची भंबेरी उडते. रोजच्या जगण्यात प्रत्येकाचा संघर्ष सुरूच असतो. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करताना अनपेक्षित बुवावाजी, कर्मकांडात अडकलेल्यांच्या घरादाराची दुर्दशा होताना दिसते. वर्षभरापासून गंगावेशमधील कुलकर्णी कुटुंबासोबतही हाच प्रकार सुरू होता. वडिलार्जित दागदागिन्यांसह आयुष्याची पुंजी त्यांनी यामध्ये गमावली. इतकेच काय तर राहत्या घरातील अंथरुण, सिलिंडर, लाकडी फर्निचरही भोंदूबाबाच्या टोळक्याने उचलून नेले.
गंगावेश परिसरातील कुलकर्णी यांचे वडिलोपार्जित जुने दुमजली घर आहे. गावाकडील शेतजमिनीच्या सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची माहिती एकाने हेरली. रत्नागिरीचा देवऋषी दादा पाटील महाराज याच्यापर्यंत माहिती आल्यानंतर त्याने दोन महिलांसह सात ते आठ जणांचे एक टोळके बनवले. सुरुवातीला कुलकर्णी यांना कणकवलीमध्ये आणून वेगवेगळ्या विधींद्वारे या समस्या दूर करण्याचे त्यांच्या मनावर बिंबविले. फेब्रुवारी २०२३ मध्ये गंगावेशमध्ये येऊन सात दिवसांची पूजा सुरू केली. शापित बंधन काढणे, काळ्या जादूमधून शुद्धीकरण असे भासवत रोख रक्कम, चांदीची नाणी, चांदीचे अलंकार, तांब्याचे हंडे, ताम्रपट, हार्मोनियम पेटी घेऊन कोकण गाठले.
महिन्याभरात वारंवार कुलकर्णी यांच्या घरातून सोने, चांदीचे अलंकार घेऊन जाण्याचे प्रकार या टोळक्याने चालवले. जुलै महिन्यात पाटील महाराज कोल्हापुरात राहण्यास आल्याचे सांगून चक्क अंथरुण, पांघरुण, चार गाद्या, गॅस सिलिंडरही टेंपोतून भरून नेले. घरातील जुने लाकडी सामान, फळ्या, कपाटे, खुर्च्या असे कोणतेच साहित्य भामट्यांनी शिल्लक ठेवले नाही.
चौकट
घर सोडण्याची वेळ....
घरावर तसेच प्रत्येक प्रापंचिक साहित्यावर काळी जादू झाल्याचे सांगत कुलकर्णी कुटुंबाची लूट करण्यात आली. या त्रासामुळे सध्या या कुटुंबावर राहते घर सोडून अन्यत्र राहण्याची वेळ आली आहे. तसेच खात्यावरील पैसेही लुबाडण्यात आल्याने सर्वच बाजूंनी पंचाईत झाली आहे.
...
शहरात दरबार बहरलेलेच....
शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या दरबार भरवले जात आहेत. कसबा बावड्यातील शुगर मिल परिसरातील दरबार बंद झाला असला तरी नदी रोड, तलावाच्या परिसरात दरबार भरतात. प्रसादांसाठीही भरभरून वर्गणी दिल्या जात असल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.