GAD221.JPG
38932
पाणंदीचे वाटोळे, सुरक्षाही वाऱ्यावर
रस्ता रुंदीकरण बैठक ः सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ ः गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गाचे रूंदीकरणाचे काम नियोजनशून्य सुरू आहे. राज्यमार्गालगतच्या पाणंदीचे ठेकेदाराने वाटोळे लावले आहे. रस्ता उंच आणि पाणंदी सखल भागात अशी स्थिती झाली आहे. कामाच्या ठिकाणी एकही फलक दिसत नाही. प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे; असा आरोप करत अपघातात जखमी झालेल्यांचा खर्च ठेकेदाराने देण्याची आग्रही मागणी आजच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली.
गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गासह आजरा-महागाव-हलकर्णी रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. यासंदर्भातील नागरिक, शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून मागणी केलेली संयुक्त बैठक प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या उपस्थितीत झाली. जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर, अमर चव्हाण, गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाश पताडे, पंचायत समिती सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, सदस्य अमर हिडदुग्गी, शिवगोंडा पाटील, स्नेहल जाधव, सरपंच गिरीजादेवी शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कामाचे नियोजन नाही. कुठेही सूचना फलक दिसत नाहीत. वारंवार अपघात होत आहेत. जोड रस्ते सखल झाले आहेत. पाऊस पडल्यानंतर उपाय करण्यात ठेकेदाराचे दुर्लक्ष आहे. पाणंदी सखल भागात गेल्याने शेतकरी अडचणीत आहेत. पाईपलाईन घालण्यासही सुविधा नाही. संथ काम आणि साईडपट्टीच्या अभावामुळे वाहतूक कोंडी होत आहे. बसफेऱ्याही बंद होत आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केल्या. पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता नजीर नाईकवाडे, देखरेख कंपनीचे प्रदीप तिवारी यांनी ठेकेदारांना बैठकीतच सूचना देऊन समस्या दूर करण्याचे आदेश दिले. फलकच नसल्याची तक्रार गंभीर आहे. यापुढे अशा तक्रारी येऊ नयेत; याची खबरदारी घ्यावी.
चौकट...
गोड बोला, पण...
ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी देशमुख यांच्याविषयी सर्वांच्याच तक्रारी आल्या. ते गोड बोलतात. पण काम करत नाहीत. वारंवार सूचना देऊनही दाद देत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. त्यावर ''तुम्ही गोड बोला, इथेच थांबा, पण काम नाही केला तर गडहिंग्लजकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका'', असा इशारा संग्राम कुपेकरांनी दिला. तिवारींना उद्देशून, ‘तिवारीसाब, आप किसीका जान जाने की राह देख रहे हो क्या,’ असा संतप्त प्रश्नही केला.
* बैठकीतील निर्णय
- महागावातील पाणंदीला भेट देणार
- पाईप्स, काँक्रीटने पाणंद मजबूत करणार
- पाईपलाईनला ५०० मीटरवर डक्ट आहे
- नेसरीचे जंक्शन सुस्थितीत करणार
- राज्यमार्ग जोडरस्ते १०० मीटरपर्यंत पक्के करणार
- गावाजवळ जंक्शनबाबत ग्रामपंचायतींशी चर्चेचा निर्णय
- विहिरी, मोरी सुरक्षित, मोरींची रुंदी वाढवणार
- झालेले अतिक्रमण प्रशासनानेच काढावे
- तिवारींनी दर पंधरावड्यातून कामाची पाहणी करावी
- शेतवडीत पाणी साचू नये यासाठी चर मारणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.