फोटो आहे.
एक गाव, एक गणपतीतून एकोपा
आजऱ्यात ६३ गावांत जागर; मंडळाचा प्रतिसाद, विधायक उपक्रमावर भर
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १५ : आजरा तालुक्यात ११६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. ९८ गावांपैकी ६३ गावांत एक गाव एक गणपतीची संकल्पना रुजली आहे. सामाजिक सलोखा व एकोप्याचे दर्शन घडत आहे. सार्वजनिक मंडळाकडून या संकल्पनेला उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळत असून, गणेशोत्सव काळात मंडळानी सामाजिक व विधायक उपक्रमावर भर दिल्याचे पहायला मिळत आहे.
जिल्ह्यासह तालुक्यात नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळांनी उत्सवकाळात विधायक उपक्रम राबविले. सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व, रांगोळी, पोस्टर यासारख्या विविध स्पर्धांतून समाजप्रबोधन केले. नंतरच्या काळात मंडळामधे चुरस, अनावश्यक स्पर्धा वाढू लागली. गावागावांत तणावाचे प्रसंग निर्माण झाले. पोलिस यंत्रणेवर ताण वाढला. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख माधवराव सानप यांनी वर्ष १९९८ मध्ये एक गाव एक गणपती संकल्पना जिल्ह्यात राबविली. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजरा तालुक्यातही ६३ गावांत एक गाव एक गणपतीची संकल्पना रुजलेली पहावयास मिळते. या गावातील विविध मंडळे व ग्रामस्थांनी एकत्रित येत या संकल्पनेला बळ दिले आहे. सामाजिक एकोपा, शांतता आणि बंधुभाव वाढण्यास एकप्रकारे मदत झाली आहे. गणेशोत्सवातील मंडळामधील अनावश्यक स्पर्धा, वाढता खर्च आणि ध्वनिप्रदूषणाला आळा बसण्यास मदत झाली आहे. मंडळाकडून जमणाऱ्या वर्गणीचा उपयोग सामाजिक व विधायक उपक्रमांसाठी केला जात आहे. काही मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरही विशेष भर दिला आहे.
-----------------
चौकट
येथे एक गाव, एक गणपती
सुळे, सरंबळवाडी, खानापूर, कर्पेवाडी, मेढेवाडी, पोळगाव, वडकशिवाले, चितळे, हाळोली, सिरसंगी, सोहाळे, देऊळवाडी, पेदेवाडी, विनायकवाडी, खोराटवाडी, श्रृंगारवाडी, हालेवाडी, देवकांडगाव, मुरुडे, हात्तीवडे, एमेकोंड, चिमणे, साळगाव, खेडे, महागोंड, एरंडोळ, हरपवडे, पेरणोली, दर्डेवाडी, लाकूडवाडी, सरोळी, मुमेवाडी, भादवणवाडी, गवसे, कानोली, मडिलगे, मसोली, वाटंगी, झुलपेवाडी, मुंगूसवाडी, निंगुडगे, मलिग्रे, लाटगाव, कोरीवडे, हंदेवाडी, इटे, होणेवाडी, माद्याळ, आरदाळ, जाधेवाडी, जेऊर, महाडोंडवाडी, पारेवाडी, गणेशवाडी, परोलीवाडी, पेंढारवाडी, मासेवाडी, हाजगोळी खुर्द, हाजगोळी बुद्रुक, सुळेरान, सातेवाडी, दाभिल, देवर्डे या गावात एक गाव एक गणपती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.