5213, 5212
कुरुकली-बेनिक्रे दरम्यान घोडेश्वर मंदिर परिसराजवळ असणारे बेलवन. दुसऱ्या छायाचित्रात बेलवनातील वृक्षांना असे पाटाने पाणी दिले जाते.
........
ऐन उन्हाळ्यात बहरले ‘बेलवन’
कुरुकलीच्या घोडेश्वर मंदिर परिसरात सामाजिक वनीकरणचा उपक्रम
प्रकाश तिराळे : सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. १२ : ऐन उन्हाळ्यात एकीकडे पाण्याविना वृक्षवेली कोमेजून जात असताना सामाजिक वनीकरण विभागाने महत्प्रयासाने कागल तालुक्यातील घोडेश्वर मंदिर परिसराच्या बाजूला ‘बेलवन’ उद्यान विकसित केले आहे. माळरानावर असलेले हे बेलवन उन्हाच्या कडाक्यातही योग्य नियोजनामुळे बहरले आहे.
महाराष्ट्र शासनपुरस्कृत सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूरअंतर्गत कागल परिक्षेत्रातील कुरुकली-बेनिक्रे दरम्यानच्या गायरानातील गट क्रमांक ३६ मध्ये सुमारे एक हेक्टर जागेमध्ये घोडेश्वर मंदिर परिसराच्या बाजूलाच बेलवन साकारले आहे. सात जून २०२३ रोजी याला तांत्रिक, तर आठ जून २०२३ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. ठराविक अंतरावर सुमारे ४०० खड्डे खोदून त्यामध्ये विविध जातीच्या औषधी रोपांची लागवड करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने बेल, सीता अशोक, रुद्राक्ष, बोर, पळस, पारिजात, पांढरा चापा, तगर, उंबर, पांढरी कन्हेर, पांढरा धोतरा व स्वस्तिक यांसारख्या सुमारे ४०० औषधी रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली आहे. ही रोपे हिंगणघाट येथून आणली आहेत. अतिशय महत्त्वाकांक्षी असणारा हा प्रकल्प अनेक अडचणींचा सामना करत वनाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला आहे.
गेले दीड वर्ष या रोपांची चांगल्या पद्धतीने जोपासना करून त्यांच्या भोवती संरक्षण जाळ्यादेखील लावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढलेला आहे. त्यामुळे रोपांना पाण्याची नितांत गरज ओळखून प्रतिभा पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बेनिक्रे गावातील काही नागरिकांच्या मदतीने कालव्यातील पाणी पाटाने दिले. त्यामुळे ही झाडे पुन्हा बहरली आहेत. वेळोवेळी या झाडांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते. त्यातून रोपांची तहान भागविण्याचे काम वनाधिकाऱ्यांनी केले आहे.
...
चौकट...
बेलाच्या संवर्धनासाठी...
सर्वत्र बेलाची झाडे झपाट्याने कमी होताना दिसत आहेत. त्यांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने बेलवनाच्या उद्यानाची निर्मिती केली आहे. बेलाची पाने, मुळे, त्याची फळे आणि साल यांचा आयुर्वेदिक औषधांत विविध रोगांवर उपयोग केला जातो. या उद्यानाचा फायदा नागरिकांना व्हावा, त्याचबरोबर दुर्मीळ होत चाललेल्या वेगवेगळ्या वनौषधी वृक्षांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने या बेलवनाची वन विभागाकडून निर्मिती केली आहे.
...........
कोट...
देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील त्यावेळी ही झाडे २४ वर्षांची होतील, परिपक्व बनतील, या उद्देशाने शासनाने हा उपक्रम राबविला आहे. त्यासाठी मंदिर परिसराजवळच हे बेलवन साकारले आहे. जेणेकरून त्याचा उपयोग चांगला होईल. यातील काही प्रस्तावित कामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर हे बेलवन उद्यान सुंदर बनेल.
- प्रतिभा पाटील, परिमंडळ वन अधिकारी, हमीदवाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.