शाहुवाडी
राजेंद्र दळवी
चुरस झाली तरी विनय कोरेच सरस
पन्हाळा ः पन्हाळा व शाहूवाडी अशा दोन तालुक्यात विभागालेल्या मतदार संघात जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक डॉ. विनय कोरे विरूद्ध शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्यात पारंपरिक लढत झाली. मात्र, डॉ. विनय कोरे यांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
या दोन्हीही उमेदवारांचा त्याच्या-त्यांच्या तालुक्यात प्रभाव आहे. सत्यजित पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव व स्थानिक उमेदवार अशी साद घालत ही निवडणूक भावनिक मुद्यावर लढली; पण डॉ. कोरे यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागाकडे लक्ष केंद्रित केले. दुर्गम वाड्या-वस्त्यांवर कोट्यवधी रुपयांच्या निधीतून रस्ता, आरोग्य सुविधा पुरवून विकास साधला. विरोधातील गटा-तटातील स्थानिक नेत्यांना विकासाच्या मुद्द्यावर आपल्याकडे खेचण्याचा गनिमी कावाही कोरे यांनी केला. परिणामी, विरोधी पक्षाला मोठा धक्का बसला. सत्यजीत पाटील यांना बालेकिल्ला असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यात अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. कोरे यांच्या प्रचारात शाहूवाडीतून माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील-पेरिडकर, गोकुळ संचालक करणसिंह गायकवाड, पन्हाळ्यातून गोकुळ संचालक अमरसिंह पाटील, भाजप महिला मोर्च्याच्या प्रदेश सचिव डॉ. स्वाती पाटील यांनी धुरा सांभाळली. शेवटच्या टप्प्यात शाहूवाडीतील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे हेही डॉ. कोरे यांच्या प्रचारात सहभागी झाले. त्याचा लाभ कोरे यांना झाला.
सत्यजित पाटील यांच्या फळीतील शिलेदार डॉ. कोरे यांच्याकडे गेल्याने त्यांच्या प्रचारात पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांचा तसेच प्रचारात नियोजनाचा अभाव जाणवला. पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असूनही त्यांच्या प्रचारात आघाडीच्या जिल्हा किंवा राज्य पातळीवरील एकाही नेत्याने सहभाग घेतला नाही. त्यामुळे ते एकाकी पडल्याचे चित्र होते. महायुती सरकारने राबवलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे डॉ. कोरे यांना महिलांवर्गाची मोठी साथ मिळाली. त्यांनी मतदारसंघातील विकासकामांचा मुद्दा प्रचार आणल्याने तो विरोधकांच्या भावनिक मुद्द्यापेक्षा सरस ठरला. राजकीय जोडण्या, विकासकामे, लाडकी बहिण योजना व प्रचाराचे सूक्ष्म नियोजन या जोरावर डॉ. कोरे यांनी निवडणुकीत ३६, ०५३ इतके मताधिक्य मिळून विजयश्री खेचून आणली.
घडले काय?
१) विनय कोरेंकडून विकासकामांचा प्रचार
२) लडकी बहीण योजनेचाही फायदा
३) गटातटाच्या बेरजेत कोरेंना यश
४) लोकसभेच्या प्रचारातच केल्या जोडण्या
५) सरूडकरांसाठी नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.