30161
आधी नागरी सुविधा; मग संरक्षित स्मारक
पावनगडवासीयांची मागणी; ना रस्ता, ना शाळा, मूलभूत सुविधांपासून वंचितच
सकाळ वृत्तसेवा ः राजेंद्र दळवी
पन्हाळा, ता. ७ ः पन्हाळगडाचा जोडकिल्ला अशी ओळख असलेला पण विकासापासून आजही चार हात लांब राहिलेला पावनगड संरक्षित स्मारक करण्यासाठी शासनाची अधिसूचना निघाली आहे. त्यामुळे येथील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन होणार आहे; पण येथे आजही नागरी सुविधांची वानवाच आहे. त्यामुळे पावनगड संरक्षित स्मारक करताना आमच्या हक्काला धक्का लावू नका. प्रथम सुविधांचे प्रश्न सोडवा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पावनगड पन्हाळ्यापासून तीन ते चार किमी अंतरावर आहे. हे दोन्ही गड वेगवेगळे जरी असले तरीही पावनगड पन्हाळा नगरपरिषदेचाच एक भाग आहे. पावनगडवर जेमतेम ७०-८० च्य़ा आसपास लोक राहतात. पण या गडाकडे जाताना ना धड रस्ता, ना दळणवळणाची सोय. त्यामुळे खासगी वाहनानेच इकडे जावे लागते. पण रेडेघाट मार्गे असलेला हा रस्ता चढ-उताराचा आणि हाडे खिळखिळी व वाहनांचा खुळखुळा करणारा. पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास म्हणजे दिव्यच असते. पावनगडावर शाळा व दवाखाना नसल्यामुळे शिक्षण, वैद्यकीयसेवा व नोकरीसाठी येथील नागरिकांना पन्हाळा किंवा इतर गावांचा आधार घ्यावा लागतो. इतकेच नाही तर येथे किराणा दुकान नाही. त्यामुळे काड्यापेटी जरी आणायचे म्हटले तरी तीन चार किमी जावे लागते. त्यासाठी वाहनाने अथवा चालत पायवाटेने फरफट करावी लागते. नगरपरिषदेने येथील नागरिकांसाठी नैसर्गिक झऱ्यातील पाणी टाकीत घेऊन व नळाद्वारे पुरवून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. पण उन्हाळ्यात झऱ्याचे पाणी कमी होते; तेव्हा पाणी टाकीत येणे कठीण होते. त्यावेळी नागरिकांना दरीत जाऊनच पाणी आणावे लागते. पावनगडावर लाईटची सोय आहे; पण जर एखादी वायर तुटली अथवा स्ट्रीट लाईट गेली तर ती पुन्हा कधी चालू होईल, याची श्वावतीच नसते. येथे मोबाईल नेटवर्क मिळणे दुरापास्तच. त्यामुळे रात्री-अपरात्री कोणतीही मदत हवी असल्यास संपर्क होण्यापासुन मदत मिळेपर्यंत देवावरच भरवसा ठेवावा लागतो. यामुळे येथील कित्येकांना नोकरी, शिक्षण, आरोग्याच्या कारणासाठी स्वत:चे घर सोडून परगावी भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.
चौकट
ऐतिहासिक वास्तूंचे वैभव
येथील तुपाची विहीर, महादेव मंदिर, चाँद तारा बुरुज, हत्ती महल अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. हेच पावनगडाचे ऐतिहासिक वैभव पाहून शासनाने गड संरक्षित स्मारक ठरवले. यामुळे येथील ऐतिहासिक वास्तू व ठेव्यांचे जतन व संवर्धन होण्यास मदत होणार आहे; येथील लोकांना राहती घरे पाडण्यात येणार. आमच्या मालकीच्या जागा सरकार जमा होणार; अशी भीती वाटत आहे. त्यामुळे पावनगड संरक्षित स्मारक अवश्य करा; पण आमच्या हक्काला धक्का लावू नका. प्रथम सुविधा द्या; अशी मागणी होत आहे.
कोट
पन्हाळगड वर्ल्ड होरिटेजमध्ये समावेश करण्यासाठी ज्याप्रमाणे स्थानिक लोकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे; तशीच स्थिती पावनगड संरक्षिक स्मारक करताना येथील नागरिकांची साथही प्रशासनाला मिळणे गरजेचे आहे.
- आयुब मुजावर, पावनगड, नागरिक
कोट...
पावनगड पन्हाळा नगरपरिषद हद्दीत आहे;पण येथे नगरपरिषदेची स्वत:च्या मालकीची जागा नाही. पावनगडाकडे जाणारा रस्ता वन विभागाच्या अखत्यारितून जातो. त्यामुळे भौतिक सुविधा पुरवण्यात मर्यादा येत आहेत. वन विभागाने पक्क्या रस्त्यासाठी परवानगी दिल्यास अनेक अडचणी सुटतील. गडावर पाण्याची सोय केलेली असून गटारीचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात येईल.
- चेतनकुमार माळी, मुख्याधिकारी, पन्हाळा नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.