‘स्कॉफ’ आराखड्यास मुदतवाढ द्या
शिक्षक वर्गातून मागणी; ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदत
सकाळ वृत्तसेवा
सरवडे, ता. २८ : राज्यातील शाळांच्या मूल्यांकनासाठी राज्य -शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना केली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्कॉफ) भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने शिक्षण आयुक्त व संचालक यांच्याकडे केली आहे. लिंक ३१ मार्चपर्यंत सायंकाळी ५ पर्यंत कार्यान्वित असेल. त्यानंतर लिंक बंद होणार असल्याची माहिती प्रशिक्षण परिषदेकडून यापूर्वीच दिली आहे. अद्याप ९० टक्के शाळेचे काम अपुरे असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.
राज्यातील व्यवस्थापनाच्या शाळांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा भरण्यासाठी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, या काळात दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत्या. त्याचबरोबर सर्व तालुक्यांमध्ये शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणसुद्धा सुरू होते. त्यामुळे राज्यातील शाळा व्यवस्थापनाने यास अल्प प्रतिसाद दिला होता. ही बाब शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ३१ मार्च ही अंतिम तारीख दिली आहे. स्कॉफसाठी ६ क्षेत्रे, १२८ मानके आहेत. तर, १०० पेक्षा जास्त फोटो आणि शाळा मूल्यांकन व आश्वासन आराखडा संबंधित माहिती लिंकवर अपलोड करणे आवश्यक आहे. परंतु इतके फोटो शोधण्यासाठी शिक्षकांची डोकेदुखी आणि धावपळ उडाली आहे. मुलांचा अभ्यास आणि शिक्षणावर याचा परिणाम होताना दिसत आहे. या व्यतिरिक्त पाचवी ते नववी व अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. परीक्षेच्या अनुषंगाने विविध कामे पूर्ण करण्याचे काम शाळांमध्ये सुरू आहे. ''निपुण भारत''अंतर्गत अध्ययनस्तर निष्पत्ती आढावा कार्यक्रमही सुरू आहे. त्यामुळे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडाबाबतची महत्त्वपूर्ण माहिती भरण्यास हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शैक्षणिक वर्तुळातून होत आहे.
कोट
मूल्यांकनाची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट आहे. या प्रक्रियेचा कालावधी जून ते ऑगस्ट ठेवला असता, तर शिक्षक चांगल्या पद्धतीने मूल्यांकन करू शकले असते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे नियोजन; क्षमतावृद्धी प्रशिक्षण यात दोन महिने गेले. शिवाय मासिक कामे, पाचवी ते नववी व अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाला योग्य, अचूक पडताळणी करायची असेल तर विभागाने वेळ द्यावी.
- जयसिंग पोवार, मुख्याध्यापक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.