सांगली : जेवणाच्या पंगतीत शेवटी बसलेल्याचं दुःख प्रत्येकानं कधी ना कधी अनुभवलं असेलच. जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळपास दीडशे किलोमीटरवरील उमदी-संख आणि त्या परिसरातील ४८ गावांचं दुखणं त्यातलं आहे. पंगतीतल्या आधीच्यांना वाढल्यानंतर तरी आम्हाला मिळेल, या आशेवर ही सारी गावं होती. मात्र वाढपी शेवटापर्यंत येण्याआधीच त्याला पुन्हा पंगतीच्या प्रारंभाला बसणाऱ्यांनी मागं बोलवून घ्यावं आणि शेवटाचे लोक उपाशीच राहावेत... असं हे दुखणं आहे. मग ‘येरळा’ने ‘सिंचन सहयोग’सारख्या संस्थांच्या माध्यमातून कर्नाटकातून पाणी घ्यायचा नवा पर्याय पुढे आणला. जणू किचन आणि वाढपीच बदलला!
या निर्णयाचे परिणाम काय झाले? जालिहाळ आणि परिसराचा कायापालट झाला. जवळपास तीसहून अधिक गावे पाणीदार झाली. तब्बल सहा हजार एकर जमीन ओलिताखाली आली. ४८ हजार लोकांचे जगणे सुकर झाले. यासाठी महाराष्ट्राचा कर्नाटकशी कोणताही करार नाही की महाराष्ट्राने त्यासाठी कर्नाटकला पैका मोजला नाही. ही किमया केवळ आणि केवळ लोकरेट्याने घडली आहे. कर्नाटकातील यत्नाळ महाराष्ट्राच्या सीमेवरचे गाव. इथल्या तलावात कर्नाटकच्या तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी येते. या योजनेमुळे विजापूरचा संपूर्ण दुष्काळी पट्टा हिरवागार झाला आहे. तिकोंडी तलावातून पाणी नैसर्गिक उताराने ओढ्यातून भिवर्गी तलावापर्यंत येते. ओढे आणि पुढे बोर्गी नदीच्या दुतर्फा गावांचे शिवार भिजवत हे पाणी पुढे सोनलगीतून पुन्हा कर्नाटकातील चडचण हद्दीत जाते.
कर्नाटकच्या हिरे पडसलगी योजनेत महाराष्ट्राने सहभाग घ्यावा आणि या भागाला हक्काचे पाणी द्यावे, असा पहिला प्रस्ताव ‘येरळा’ने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जतच्या ‘त्या’ दुष्काळी दौऱ्यात दहा कोटींची घोषणा केली. श्री. चव्हाण पायउतार झाले. पुढे देवेंद्र फडणवीस यांचे पाच वर्षांचे भाजप-सेनेचे सरकार आणि त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्षांचे दोन्ही काँग्रेससोबतचे महाविकास आघाडीचे सरकार, असा आठ वर्षांचा प्रवास झाला. महाविकास आघाडीच्या काळात कर्नाटकातून पाण्याच्या प्रस्तावाला बगल देत म्हैसाळ योजनेच्या विस्ताराची योजना मांडली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जतसाठी पुन्हा सहा टीएमसी पाणी राखीव ठेवून ही योजना पुढे रेटली. आता गदारोळानंतर या योजनेसाठी दोन हजार कोटींची घोषणा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली.
हिरे-पडलसगी योजनेनंतर कर्नाटकने पुन्हा तुबची-बबलेश्वर योजना मांडली आणि गतीने पूर्णत्वास नेली. या योजनेत महाराष्ट्राने सहभागी व्हावे, असा प्रस्ताव कर्नाटकचे तत्कालीन मंत्री एम. बी. पाटील यांनी दिला होता. पण महाराष्ट्राचा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र या योजनेतून पिण्यासाठी तरी पाणी द्या, असे साकडे या भागातील ग्रामस्थांनी घातल्यानंतर २०१७ पासून या भागात यत्नाळ तलावातून पाणी यायला सुरवात झाली. तेव्हापासून या गावांच्या दुष्काळमुक्तीचा प्रारंभ झाला.याबाबत ‘येरळा’चे सचिव एन. व्ही. देशपांडे म्हणाले, ‘‘कर्नाटकमधून जत तालुक्यातील ४८ गावांना कमीत कमी खर्चात पाणी घेता येईल, ही भूमिका ‘सकाळ’ने आणि आम्ही प्रारंभापासून लावून धरली. कर्नाटकातील बाबानगर तलावातून दहा कोटींत स्वतंत्र जलवाहिनी करून या पाण्याने आपल्याकडील तलाव भरून घेता येतील, असा तो प्रस्ताव होता. त्यासाठी महाराष्ट्राने कर्नाटकला राजापूर (ता. शिरोळ) बंधाऱ्यातून पाणी द्यावे.
या बंधाऱ्यातून आपण प्रतिवर्षी उन्हाळ्यात माणुसकीच्या भावनेतून कर्नाटकला पाणी देतच असतो. या गावांसाठी म्हणून अर्धा टीएमसी पाणी द्यावे, एवढाच आमचा प्रस्ताव होता. त्यासाठी दोन राज्यांत आंतरराज्य करार झाला, तर आज येणारे पाणी या गावांसाठी हक्काचे झाले असते. त्या करारात, पाणी उचलण्याच्या खर्चाची हमी महाराष्ट्राने द्यावी. आता महाराष्ट्राने पाण्यापासून वंचित गावांसाठी दोन हजार कोटी रुपये खर्चाची नवी विस्तारित म्हैसाळ योजनाही मांडली होती. महाराष्ट्र शासनाच्या ही विस्तारित म्हैसाळ योजना व्हावी. मात्र त्याचवेळी कर्नाटकातूनही पाणी घ्यायचा पर्याय कायम खुला ठेवावा, हेच आमचं मागणं आहे.’
अपेक्षा काय?
सध्या जत तालुक्यातील तिकोंडी आणि भिवर्गी असे दोन तलावच भरले जातात. या भागातील शंभर टक्के क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी जालिहाळचे दोन तलाव, मोरबगी, गुलगुंजनाळ आणि माणिकनाळ असे अन्य तलाव भरून घेण्यासाठी कर्नाटकातील शिरनाळ कालव्यातून पाणी घेता येते. शिरनाळ कालवा ते जालिहाळ हे दोन किलोमीटरचे अंतर आहे. तिकोंडीचा एक तलावही कर्नाटकातील अरेकिरी येथील अमोघसिद्ध पादगट्टी येथून भरून घेता येईल. कर्नाटकच्या संमतीने अत्यल्प खर्चात हे शक्य आहे. दोन हजार कोटींची विस्तारित योजना कधी होईल तेव्हा होईल. मात्र त्याआधी या पर्यायांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा आहे.
पाणीदार गावे
तिकोंडी, करेवाडी, जालिहाळ, मोरबगी, भिवर्गी, कारजनगी, गुलगुंजनाळ, लवंगा, माणिकनाळ, अक्काळवाडी, बोर्गी खुर्द, बोर्गी बुद्रुक, बेळोंडगी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगी, मोटेवाडी, धुळकरवाडी, अंकलगी, कागनरी, करेवाडी, कोनबगी, उमदी, कोंतेव बोबलाद, गोंधळेवाडी, मोटेवाडी (तर्फ), निगडी बु., कारंडेवाडी, गिरगाव या गावांशिवाय आणखी उर्वरित अठरा गावे आहेत, त्यांनाही पाणी देण्यासाठी विचार व्हायला हवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.