नगर ः आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली कर्जमाफी योजनेची यादी प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाने अखेर हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे कर्जमाफी योजनेत मार्ग निघाला आहे. बळिराजाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जिल्ह्यातील 1598 गावांच्या दोन लाख 53 हजार 455 कर्ज खात्यांच्या याद्या प्रशासनाने आज (शनिवार) प्रसिद्ध केल्या. त्यात नगर तालुक्यातील विळद व पिंप्री घुमट या गावांना आचारसंहितेचा अडथळा आल्याने त्यांना मात्र तूर्तास वगळले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रशासनाने आज याद्या प्रसिद्ध करून कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू केली आहे. 30 सप्टेंबर 2019 अखेरच्या थकीत व पुनर्गठित केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जास कर्जमाफी दिली जात आहे.
आधार प्रमाणीकरण करून शेतकऱ्यांना योजनेचा थेट लाभ दिला जात आहे. मागील साडेतीन महिन्यांपासून महसूल व सहकार प्रशासनाकडून कर्जमाफी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शासन निर्देशानुसार तलाठी, ग्रामपंचायत, जिल्हा बॅंक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था येथे याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
९५१ खात्यांचे आधार प्रमाणीकरण
आधार प्रमाणीकरणात राज्यात पहिला बहुमान नगर जिल्ह्याला मिळाला. जिल्ह्यात आजअखेर 951 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्यातून नगर तालुक्यातील जखणगाव आणि राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या गावांतील 787 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर पाच कोटी 42 लाख 42 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
साडेतीन लाख कर्जखाती
जिल्ह्यातील कर्ज खात्यांची एकूण संख्या तीन लाख 54 हजार 180 आहे. पात्र शेतकऱ्यांची संख्या दोन लाख 60 हजार 604 आहे. सर्व कर्ज खात्यांकडे असलेली एकूण रक्कम दोन हजार 296 कोटी रुपये आहे.
आयोगाने आज परवानगी दिल्याने कर्जमाफीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. आधार प्रमाणीकरणासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखा, आपले सेवा केंद्र येथे दोन हजार बायोमेट्रिक मशिन उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यादीतील रकमेची खात्री करावी. घाई, गडबड करू नये. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासन बांधील आहे.
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.