सांगली : जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेत सभासद हिताच्याच कारभाराला प्राधान्य दिले जात आहे. आगामी काळात सर्व प्रकारच्या कर्जांचा व्याजदर एकअंकी केला जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष सुनील गुरव यांनी आज सर्वसाधारण सभेत दिली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या सभेत नऊशे सभासदांनी प्रश्न विचारले, शंका उपस्थित होत्या. दरम्यान, सभासदांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करीत विरोधी शिक्षक संघ संचालकांनी सभात्याग केला.
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेची 68 सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चर हॉलमध्ये श्री. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक उपस्थित होते. कोरोनामुळे सभेला विलंब झाला. मात्र ती ऑनलाइन घेण्यास परवानगी मिळाली. सभेत घरबसल्या सहभागी होण्याची संधी मिळाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले यांनी नोटीस वाचन केले. व्यवस्थापक महांतेश इटंगी यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन केले. विषयपत्रिकेवरील विषयास सुरवात झाली. अध्यक्षांनी सर्व विषयांचे वाचन करत मंजुरीचे आवाहन केले. त्यांना थांबवत विरोधी संचालक विनायक शिंदे, अविनाश गुरव यांनी "प्रत्येक विषयावर ऑनलाईन सभासदांच्या प्रतिक्रिया घ्या, शंकांचे समाधान करावे, मत जाणून घ्या, अशी मागणी केली. सभासदांच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये येत असल्याचे गुरव यांनी सांगितले. तोवर विरोधकांनी सभासदांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करीत निषेध नोंदवला. सभात्यागही केला.
निवृत्तीनंतरही सभासदत्व कायम ठेवण्याची संधी देणे, सभासद सेवकांच्या कर्जातून सहा टक्केऐवजी पाच टक्केप्रमाणे शेअर्स वर्गणी कपात, सभासदांच्या मागणीप्रमाणे कायम ठेव परत करणे, तीन लाखांपर्यंत कर्ज असणारा सभासदाचा मृत्यू झाल्यास मृतसंजीवनी ठेव योजनेतून त्यांचे कर्ज माफ करून, उर्वरित रक्कम सभासदांच्या वारसांना देणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.
विरोधकांनी पळ काढला
अध्यक्ष श्री. गुरव म्हणाले, "पाच-सहा वर्षांत सभासद हिताचे अनेक निर्णय घेतले. सभेत तसेच ठराव आणले. सभासदांतून मिळालेले प्रचंड पाठबळ बघून विरोधकांनी पळ काढला. सभा सभासदांसाठी असते, संचालकांना बोलण्याची, निर्णय घेण्याची संधी संचालक मंडळाच्या सभेत असते. त्यांनी तिथेच बोलावे, याचे भान विरोधकांना नाही.'
सभासदांचा आवाज दाबला
शिक्षक संघाचे नेते विनायकराव शिंदे म्हणाले, ""ऑनलाईन सभेत आवाज दाबण्यात आला. सभा सभासदांसाठी नव्हे तर सत्ताधारींसाठी झाली. ऑनलाईन सभासदांची प्रतिक्रिया विचारात घेतली नाही. ठरावाबाबत मत जाणून घेतले नाही. त्यांच्या भावनांचा आदर केला नाही. सभा पद्धतीलाच काळीमा फासला. 10 टक्केही सभासद ऑनलाइन नव्हते. त्यांनाही विचारले नाही. विरोधी गटाचे संचालक व सामान्य सभासदांच्या भावनाच विचारात घेत नसतील तर अशी सभा काय कामाची? अशी सभा मान्य नसल्याने सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला. आजच्या सर्वसाधारण सभेत एकाही विषयाला सभासदांनी मंजुरी दिली नाही, तशी खात्री अध्यक्षांनी केली नाही.''
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.