पश्चिम महाराष्ट्र

पोलिसाचा खून.. एवढेच उरले होते...

शेखर जोशी

‘रत्ना’बारमध्ये पोलिसाचा खून’ या वॉटसॲपवरील एका धक्‍कादायक मेसेजने सांगलीकरांची बुधवारची सकाळ उजाडली... आता लोकांना खून ही गोष्ट फार सुन्न करत नाही. महिन्यात एक-दोन म्हणजे आता सवयीचे झाले आहे. टोळीयुद्धातले, भाऊबंदकीतले, आर्थिक आणि अनैतिक संबंधातून खून पडत राहतात... पण आता चक्‍क वर्दीत असताना पोलिसाचाच खून झाला आहे, तो देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साक्षीने. किती मोठे धाडस. वाईटांना (खलांना) वाटणारा धाकसुद्धा संपल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. ‘सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय’ असे पोलिसांचे घोषवाक्‍य आहे; पण खल म्हणजे गुन्हेगारच पोलिसांना संपवू लागल्याचा अत्यंत वाईट मेसेज समाजात जातो आहे. कायदा व सुव्यस्थेचा असा बोऱ्या कधीच वाजला नव्हता. 

वर्षभरापूर्वी सांगली पोलिसांच्या अब्रूची लक्‍तरे ज्या कोथळे प्रकरणाने राज्याच्या वेशीवर टांगली गेली, त्यातून काहीच धडा वर्दीने घेतलेला दिसत नाही. इथे बदली होऊन आलेल्या पोलिस अधीक्षकांनी काय दिवे लावले हे आता दिसून आले आहे. त्यावेळी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी कोथळे प्रकरणाने खाकीला शरम आणली, अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यावेळी परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटलांनीही पोलिसांची ही चूक पोटात घ्या, असे आवाहन करीत जनतेची माफी मागितली. पण त्यातून काय घडले? पोलिसांचा कारभार ज्या पद्धतीने चालला आहे त्यानुसार ना काळे धंदे बंद आहेत, ना गुंडांच्या टोळ्यांना आळा बसला आहे. गुंड तडीपार केले किंवा मोका लावला तरीही फळकुट दादांपासून ते नामचीन गुंडांची दहशत कायम आहे. ती सामान्यांसाठी सोडा, आता पोलिसांनाही भीक घालत नाही. आता पोलिस रोज उठून कोणत्या तरी चौकात जी तपासणी करतात, त्यात आतापर्यंत किती गुन्हेगार सापडलेत? का सामान्यांनाच रोज वेठीस धरायचे आणि गुंडांना मोकाट सोडत चेक पोस्टची नुसती नौटंकी करायची, असा सवाल संतप्त जनतेतून व्यक्‍त होत आहे. 

गृहखात्याने आता सांगलीची सूत्रे तरुण तडफदार आणि थेट आयपीएस असलेल्या सुहैल शर्मांकडे सोपविली. शर्मा यांनी मध्यंतरी तासगाव येथील राजकीय हाणामारीच्या प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा व दबाव न घेता काम केले. पण एकूणच बेसिक पोलिंसिंगबाबत आजही तीच रडकथा आहे. पोलिस आणि गुन्हेगार यांचे संबंध... हप्तेखोरीत सापडलेली खाकी वर्दी, काळ्या धंद्यांना दिले जाणारे आंदण यामुळे पोलिस आजही बदनामच होत चालले आहेत. मध्यंतरी दोन पोलिसांत सिनेमास्टाईल गॅंगवॉरसारखी मारामारी लोकांनी पाहिली. वारणानगर प्रकरणात तर एलसीबीचे अधिकारी तपासासाठी गेले आणि स्वत:च दरोडा टाकून रक्‍कम हडप करून बसले. कोथळे प्रकरणात तर पोलिसांनी खून केला, असे आरोप झाले आणि आता तर पोलिसाचा वर्दीत असतानाच खून झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण यातून एक प्रक्रियाही घडते आहे ती म्हणजे एका दुष्टचक्राची आहे. 

सांगलीचा संजयनगर भाग आणि मिरजेतील काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काही हॉटेल-बार हे कोणाच्या कृपेने चालू राहतात? काही बारचे मालक तर अनेक गुन्ह्यांत अडकलेलेच आहेत. अशांच्या बारमध्ये पोलिस अधिकारी व त्यांचे कनिष्ट यांची ऊठबस असल्याचीही चर्चा ऐकायला मिळत असते. गुन्हेगारांचे धाडस असे एका दिवसात वाढत नसते. बारवाल्यांचाही आता पोलिसांना धाक राहिलेला नाही. सध्या सांगलीत आचारसंहिता सुरू असताना साडेदहा वाजता बार बंद करायचा नियम असताना इथेच का सवलत? यातले सारे तपशिल महत्वाचे नाहीत. तर पोलिस यंत्रणा अशा प्रकारांबाबत किती हलगर्जी वागते हे महत्वाचे. पोलिस यंत्रणा आता यातून काय धडा घेते यावर समाजाच्या सुरक्षेचे भवितव्य अवलंबून असेल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: ईव्हीएमबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : फ्रेझर-मॅकगर्कचं तुफानी अर्धशतक, दिल्लीची मुंबईविरुद्ध आक्रमक सुरुवात

Gurucharan Singh: गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट; सीसीटीव्ही फुटेज लागलं पोलिसांच्या हाती

SCROLL FOR NEXT