सोलापूर : होटगी रस्त्यावरील क्रोमा शोरूम फोडून ३६ लाखांचे ७८ मोबाईल चोरणारा ठाण्यातील रामनिवास ऊर्फ रामा मंजू गुप्ता (वय ३७) याला सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने जेरबंद केले. चोरीच्या आदल्या दिवशी (२९ मे) त्याने रात्री आठच्या सुमारास शोरूममध्ये कसे शिरता येईल, शोरूमची रचना कशी आहे, याची रेकी केली होती अशी बाब समोर आली आहे.
संशयित रामनिवास याने ३० मे रोजी मध्यरात्री होटगी रस्त्यावरील क्रोमा सेंटरमध्ये चोरी केली. तत्पूर्वी, त्याने शोरूममध्ये कसे जाता येईल, रात्री तेथे सुरक्षारक्षक असतो का, याची माहिती घेतली. त्याठिकाणी रंगकाम सुरू असल्याने लाकडी शिडी होती. या संधीचा फायदा घेऊन रामनिवास याने शटर न उचकटता त्या शिडीवरून दुकानावर असलेली काच फळीने फोडून दुकानात उडी घेतली. त्यावेळी सायरन वाजले होते, पण सुरक्षारक्षक नसल्याने तेथे कोणी आले नाही. ७८ लाखांचे मोबाईल चोरी झाल्याने शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले, पण त्याने चेहरा कापडाने झाकल्याने पोलिसांना ओळख पटविता आली नाही.
आदल्या दिवशीच्या फुटेजमध्ये मात्र रात्री आठच्या सुमारास तो रेकी करताना दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले आणि मंगळवारी (ता. ३) रेल्वे स्थानकासमोरून भय्या चौकाकडे जाताना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ७० मोबाईल हस्तगत केले असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची कोठडी ठोठावली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक खेडकर, विजय पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली.
ठाण्याहून दुचाकीवर आला; चोरलेले आठ मोबाईल विकले
ठाणे येथे राहायला असलेला रामनिवास गुप्ता याच्याविरुद्ध गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यात देखील घरफोडी, चोरी व मोबाईल शॉपी फोडल्याचे गुन्हे दाखल असल्याची बाब तपासात समोर आली आहे. सोलापुरातील तो चोरीच्या उद्देशाने दुचाकीवरून ठाण्यातून आला होता. पण, त्याची दुचाकी पोलिसांना सापडली नाही. दुसरीकडे त्याने चोरलेल्या ७८ पैकी आठ मोबाईल कोणालातरी विकले आहेत. २९ ते ३ जून या काळात तो कोठे राहायला होता, चोरीचा मुद्देमाल त्याने कोठे ठेवला होता, याचा तपास विजापूर नाका पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.