सोलापूर : हरियानातील हिसार येथून मुंबईमार्गे सोलापुरात आलेल्या २६ वर्षीय अजयकुमार बजरंगलाल सांसी याने १४ मे २०२५ रोजी एसटी स्टॅण्डवरून मुंबईला निघालेल्या परमेश्वर नरसप्पा बेळे यांच्या बॅगेतील पावणेपाच लाखांचा ऐवज चोरला होता. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने अजयकुमारला त्याच्या गावातून पकडून सोलापुरात आणले. त्याने चोरलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
१४ मे रोजी फिर्यादी परमेश्वर बेळे (वय ५९) हे त्यांच्या मूळगावी वडगाव वाडी (ता. लोहारा) येथून नोकरीनिमित्त पुन्हा मुंबईला जाण्यासाठी सोलापुरातील बस स्टॅण्डवर आले होते. सोलापूर-पुणे बसमध्ये बसताना त्यांच्याशी एकजण बोलत होता. त्यावेळी बॅगेकडे लक्ष नसल्याची संधी साधून अजयकुमार याने बेळे यांच्या बॅगेतील दागिने व रोकड लंपास केली. त्यांनी लगेचच फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली.
स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही चोरट्याचा शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. हरियाणातील हिसार तालुक्यातील किरोरी गावचा अजयकुमार सांसी याच्या शोधासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या परवानगीने शहर गुन्हे शाखेचे पथक हरियानाच्या दिशेने रवाना झाले. सहा दिवसांतच त्यांनी कारवाई फत्ते करीत अजयकुमारला जेरबंद केले.
त्यासाठी त्यांना स्थानिक पोलिसांचीही मदत झाली. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलिस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, चालक फरदीन शेख, सायबर पोलिसांकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने पार पाडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.