Damage banana, pomegranate  crops
Damage banana, pomegranate crops Sakal
सोलापूर

पंढरपूर पावसाने केळीची बाग उद्ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा

पटवर्धन कुरोली - पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) परिसरात गुरूवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने केळी, डाळींबासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आलेल्या या पावसाने देविदास नाईकनवरे यांच्या चार एकर केळीच्या बागेचे नुकसान झाले आहे. आत्माराम मोरे यांची तीन एकर बागेतील केळीची झाडे पडली आहेत. तसेच कृष्णा मोरे तीन एकर, सदाशिव मोरे दोन एकर, औदुंबर मोरे तीन एकर, नानासाहेब नाईकनवरे यांची एक एकर, प्रमोद नाईकनवरे यांची दोन एकर, सचिन नाईकनवरे यांची एक एकर, लक्ष्मण नाईकनवरे यांच्या दोन एकर केळीच्या बागाचे नुकसान झाले आहे. काही जणांच्या केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. तर काहींची मधोमध चिरली आहेत. आत्माराम मोरे यांच्या दीड एकर डाळींब बागेचेही नुकसान झाले आहे.

पंढरपूर शहर व परिसर

पंढरपूर - पंढरपूर शहर व परिसरामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सोसाट्याचे वारे वाहू लागले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचे लोट शहरभर पसरले होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महावितरणने काही काळ विद्युतपुरवठा खंडित केला होता. त्यानंतर पावसाच्या हलक्‍या सरींनी शिडकावा केला. मात्र, सायंकाळी सव्वासातच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. रात्री नऊच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पुन्हा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.

नातेपुते परिसर

नातेपुते ः नातेपुते व परिसरात आज सायंकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दहा मिनिट पाऊस झाल्यानंतर संपूर्ण उन्हाळ्याचे चित्र बदलले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागल्या. पावसाचा फटका आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. रात्रभर रिमझिम पाऊस सुरु होता.

केतूर परिसरात सायंकाळच्या पावसाने दिलासा

केत्तूर ः करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात दोन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. आज सकाळी व सायंकाळी चारच्या दरम्यान पाऊस झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या तीन-चार दिवसांपासून परिसरात सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण तयार होत आहे. आज पावसाने हजेरी लावली. उजनी जलाशयाचे पाणी वरचेवर कमी होत असताना हा पाऊस शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे.

कोळा परिसरात पाऊस

कोळा ः कोळा (ता. सांगोला) परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. आज दिवभर वातावरण ढगाळ होते. अचानक दुपारपासून वातावरणात बदल होऊन सायंकाळी चार वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. यामध्ये पावसाच्या सुरवातीस वाऱ्याचा वेग जास्त होता. नंतर वेग कमी होत गेला. सायंकाळी चार वाजल्यापासून एक तास पाऊस पडत होता. या पावसामुळे शेतकरी वर्ग आनंदित असल्याचे चित्र दिसत होते. डाळींब, मका पिकास जीवदान मिळाले.

चळे येथे पाऊस

चळे ः चळे (ता. पंढरपूर) येथे आज तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात झाली. या अचानक आलेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. काढणीला आलेल्या द्राक्ष पिकाचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेतात पावसाळा पूर्व कामे सुरू आहेत. ती कामेही आता खोळंबली आहेत. दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस पाऊण तासानंतर थांबला. थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाऊसाची रिमझिम सुरू झाली.

सावळेश्‍वर परिसरात अवकाळी पाऊस

सावळेश्‍वर ः येथे सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वारे व पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतातील आंबा व इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेहमीपेक्षा चार दिवस अगोदर मान्सूनचे आगमन होणार असल्याचे देखील पाहायला मिळाले. हा पाऊस परिसरातील पोफळी, विरवडे, अर्जुनसोंड, लांबोटी व चिंचोली काटी परिसरात झाला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

भोसे परिसर

भोसे ः भोसे आणि आसपासच्या परिसरात आज सायंकाळी साडेआठच्या सुमारास मान्सून पूर्व पावसाचे वादळी वाऱ्यासह आगमन झाले. सायंकाळी पाचपासूनच हलकासा पाऊस सुरू झाला. रात्री साडेआठच्या सुमारास भोसे, शिरनांदगी परिसरात पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या.

वळसंग परिसरात रिमझिम पाऊस

वळसंग ः वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात दिवसभरात ढगांचा गडगडाट व रिमझिम पाऊस सुरु होता. असावी चक्रीवादळाने वातावरणात झालेला बदल नागरिकांना सुखद वाटत आहे. सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर अजूनही काही ठिकाणी मुरुमाचा रस्ता असल्याने दुचाकीस्वारांची मात्र तारांबळ होत आहे. पावसाळ्याची सुरुवात नेहमीप्रमाणे वीजेच्या लपंडावाने झाली आहे.

वैराग परिसरात विजेच्या कडकडाटसह पाऊस

वैराग ः वैराग (ता. बार्शी) परिसरातील मानेगाव, रातंजन, घाणेगाव, काळेगाव, इर्ले, तडवळे, राळेरास, मालेगाव, तुळशीदास नगर येथे आज (गुरूवारी) दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानी हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. इर्ले येथील दलित समाज मंदीरावरील पत्रे उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान सुमारे २० मिनिटे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

पिंपळनेर परिसरात रिमझिम

पिंपळनेर - पिंपळनेर (ता. माढा) परिसरात आज सायंकाळी रिमझिम पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या एक महिन्यापासून कडक उन्हामुळे नागरिकांना उष्ण तापमानाचा त्रास सहन करावा लागला होता. सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत तीव्र उन्हाच्या झळामुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास रिमझिम पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

पंचनामा करुन द्या नुकसान भरपाई

गेल्या दोन वर्षापासून कोरोना आणि लॉकडाउनमुळे परेशान झालेल्या शेतकऱ्यांपुढे पुन्हा मोठे संकट उभे राहिले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT