Maharashtra Annual credit plan stalled
Maharashtra Annual credit plan stalled 
सोलापूर

शेतकऱ्यांची वाढणार चिंता! वार्षिक पतपुरवठा आराखडा रखडला... बँकांच्या कर्जवाटपात उद्योग, व्यवसायालाच प्राधान्य

तात्या लांडगे

सोलापूर : बँकांकडून माहिती न मिळाल्याने यावर्षीचा वार्षिक पतपुरवठा आराखडा रखडला आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये कर्जमाफी अडकली असल्याने शेतकरी थकबाकीदारांची संख्या आता 60 लाखांवर पोहोचली आहे. त्यामध्ये नियमित अर्जदारांची संख्या मोठी आहे. बँकिंग व्यवसाय सुरळीत व्हावा व आपले मोठे नियमित खातेदार दुरावू नयेत, या हेतूने बँकांनी आता शेतीच्या तुलनेत उद्योग, व्यवसायाच्या कर्जवाटपात प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याने बळीराजाची चिंता वाढू लागली आहे.
राज्यात शेतकरी खातेदारांची संख्या एक कोटी 53 लाख एवढी असून त्यापैकी एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांकडे कोणत्या ना कोणत्या बँकेचे कर्ज आहे. त्यामध्ये सुमारे 44 लाख 60 हजार शेतकरी नियमित कर्जदार असून त्यांना महाविकास आघाडी सरकारने 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप ती घोषणा प्रत्यक्षात उतरली नसल्याने आता ते शेतकरी थकबाकीत गेल्याचे बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दोन लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांबाबतही सरकारने ठोस धोरण अवलंबलेले नाही. आता कोरोनाच्या महामारीमुळे शेतीसह अन्य कर्ज वसुली ठप्प झाली आहे. यातून आता मार्ग काढण्यासाठी बँकांनी युद्धपातळीवर नियोजनाला सुरुवात केली आहे. पिककर्ज असो वा शेती कर्जातून 'नफा ना तोटा' या तत्वावर बँका कर्जवाटप करतात. मात्र, आगामी काळ कसोटीचा असल्याने आपले ग्राहक तुटू नयेत, बँकिंग व्यवहार सुरळीत व्हावा, यादृष्टीने बँका कर्जवाटपाचा प्राधान्यक्रम ठरवून लागल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळेल परंतु उद्योग-व्यवसाय यालाच प्राधान्य राहील, उद्योजक तथा व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी बँकांकडून खेळते भांडवलही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे काही बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सप्टेंबरमध्ये तयार होणार बँकांचा ताळेबंद
कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे आरबीआयने कर्जदारांना जूनपर्यंत हटकू नये, असे निर्देश दिले. मात्र, बँकानी मार्च महिन्यात पाच टक्के तर जूनमध्ये पाच टक्के 'एनपीए'ची तरतूद करावी, अशाही सूचना केल्या. नियमित कर्जदार थकबाकीत गेल्याने व सद्यस्थितीत संपुर्ण कर्ज वसुली ठप्प झाल्याने सहकारी बँकांसह अन्य बँकांचा एनपीए वाढेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दरवर्षी मार्च महिन्यात तयार होणारा बँकांचा ताळेबंद आता 15 मेनंतर तयार होणार असून त्यानंतर लेखापरीक्षण होईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँकांची सर्वसाधारण सभा होईल आणि त्यानंतर आर्थिक परिस्थिती पाहून कर्जवाटपाचे ठोस नियोजन केले जाईल, असा नियोजित कार्यक्रम असल्याची माहिती सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे प्रशासक शैलेश कोथिंबिरे यांनी दिली. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
असा असेल आगामी पतपुरवठा आराखडा
खरीप हंगामासाठी सुमारे 45 हजार कोटींचे तर रब्बी हंगामासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्टे राज्यातील सर्व बँकांना दिले जाण्याची शक्यता आहे. परंतु,‌ मागील वर्षीचा वार्षिक पतपुरवठा आराखडा आणि प्रत्यक्षात झालेल्या कर्ज वाटपावरून व सद्यस्थिती पाहता या पतपुरवठा आराखड्यानुसार 50 ते 55 टक्के उद्दिष्टे पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोलापूर जिल्हा अग्रणी बँकेने यंदाचा पतपुरवठा आराखडा साडेनऊ हजार कोटी रुपयांचा तयार केला असून त्यामध्ये चार हजार 400 कोटी रुपयांचे कर्जवाटप शेतीसाठी होईल असे नियोजन केल्याची माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी दिली. त्यामध्ये सर्वाधिक वाटा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिला असला, तरीही जिल्हा बँकेने कर्जवाटपाची सुरुवात कधी होईल हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे बळीराजा चांगलाच पेचात अडकला असून लॉकडाऊननंतर बळीराजाच्या अडचणी सोडवण्याचे आव्हान सरकारपुढे असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT