मोहोळ (सोलापूर) : तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रकियेनंतर राजकीय वर्चस्वाची रणधुमाळी सुरू असतानाच, पक्षीय संघटनेच्या पातळीवर ग्रामपंचायतींचे संख्याबळ न सांगता गटा- तटाच्या नावे ग्रामपंचायती सांगितल्या जात आहेत. आता सरपंचपदाच्या आरक्षण सोडती निघाल्या आहेत. मात्र खऱ्या अर्थाने सरपंच निवडीनंतरच संबंधित राजकीय पक्षांच्या व सर्वमान्य राजकीय नेतृत्व असणाऱ्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन तालुक्यामध्ये सर्वोच्च स्थानी कोण? हे जगजाहीर होणार आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रकियेमध्ये तेरा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून दोन तृतीयांश ग्रामपंचायतींवर माजी आमदार राजन पाटील यांचे समर्थक निवडून आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. तर राज्य पातळीवर राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते म्हणून ओळखले जाणारे उमेश पाटील यांनी पहिल्यांदाच नरखेडच्या गावपातळीवरील राजकारणात प्रवेश करून एकहाती विजय संपादन केला व नरखेड - अनगर या जुन्या राजकीय इतिहासाला उजाळा देत गावच्या राजकारणाचे निमित्त करून तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी पक्षांतर्गत विरोधाचा डाव मांडला. तर अनेक वर्षांपासून माजी आमदार राजन पाटील यांच्या खास गटातील विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेनूर येथील मानाजी माने यांनीही पक्षांतर्गत वेगळी चूल मांडून नव्या राजकीय पटाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण राजकीय डावपेचामध्ये सरस असणारे माजी आमदार राजन पाटील यांनी "जे आहेत त्यांच्यासह व जे नाहीत त्यांच्याशिवाय' अशा प्रकारच्या चाणाक्ष धोरणाने ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती आखली होती. परिणामी पेनूरसह पोखरापूर, लांबोटी, सौंदणे, सावळेश्वर, कुरूल, घोडेश्वर, टाकळी सिंकदर, अंकोली आदी महत्त्वाच्या गावांमध्ये पाटील समर्थकांची सत्ता आल्यामुळे अनगरकरांची बाजू वरचढ झाली आहे.
तर दुसरीकडे, शिरापूर (सो), पाटकूल या ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेल्यामुळे त्याचेही शल्य पक्षनेतृत्वाला बोचत आहे. यादरम्यान विविध गावांत आघाड्या करून नव्याने निवडून आलेल्या अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी अनगर येथे जाऊन लोकनेते (कै.) बाबुरावअण्णा पाटील- अनगरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून "आम्ही आता तुमचेच आहोत!' असा संदेश देण्यास सुरवात केली आहे. तर दुसरीकडे लोकशक्ती (डोंगरे गट) व भीमा परिवार, महाडिक गट क्रमांक दोनसाठी दावा सांगत आहे. या चढाओढीत नवनिर्वाचित ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भाजपच्या ग्रामपंचायती किती? राज्य पातळीवर आघाडी असलेल्या शिवसेना व कॉंग्रेस या मित्रपक्षाच्या किती? याचा निश्चित आकडा मात्र तिन्हीही पक्षांचे नेते सांगताना दिसत नाहीत.
आता सरपंच आरक्षणाच्या सोडती झाल्या असून, जेव्हा सरपंच निवडले जातील तेव्हाच हे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. एकंदरीत, सद्य:स्थितीतील निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती पाहिल्या तर माजी आमदार राजन पाटील यांच्या राजकीय वर्चस्वामध्ये दिवसेंदिवस वाढच होत असलेले दिसत असले तरी एकसंघ दिसणाऱ्या राष्ट्रवादी पक्षात पक्षांतर्गत विरोधकांची लॉबी यापुढे अधिक सक्रिय राहणार, अशी दाट शक्यता असून, त्यांचा बोलविता धनी कोण? याचाही शोध घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. झालेल्या व येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जसजसा उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाईल, तसतसे राजकीय वातावरणही तापत राहणार, याची चुणूक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून दिसून आली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.