Rana Maharaj Vaskar, National President of the National Warkari Pike Association, warned to allow Karthiki Yatra or boycott the elections.jpg 
सोलापूर

कार्तिकी यात्रेला परवनगी द्या अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकू; वारकऱ्यांचा ठाकरे सरकारला इशारा

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : आगामी कार्तिकी  यात्रेच्यावेळी शासनाने समन्वयाची भूमिका घ्यावी. संप्रदायाने सूचवलेल्या पध्दतीने यात्रेचा सोहळा साजरा करण्यास परवानगी देऊन निर्बंधएेवजी निर्विघ्नपणे सोहळा पार पाडण्यासाठी नियोजन करावे अन्यथा मऊ मेणाहूनी अाम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू एेसे या संत वचनाप्रमाणे कठोर भूमिका घेत प्रत्येक निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकावा लागेल असा इशारा येथील राष्ट्रीय वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी अाज येथे पत्रकार परिषदेत दिला.

श्री. वासकर म्हणाले, वारकरी संप्रदायातील सर्व प्रमुख संघटना, फडकरी, दिंडी प्रमुख, मठाधिपती, वारकरी महाराज मंडळींची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत कार्तिकी यात्रा शके १९४२ सन २०२० नियोजनासंदर्भात प्रदिर्घ चर्चा होऊन कार्तिकी यात्रेसंदर्भात वारकरी संप्रदायाची पुढील दिशा ठरवून सर्वसमावेशक अशी एकच भूमिका मांडण्यासाठी संतवंशज, प्रमुख वारकरी संघटना व महाराज मंडळी यांचा एकत्रित समावेश असणारी 'कार्तिकी यात्रा समन्वय समिती' स्थापन करण्यात आली.

चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या आषाढी यात्रा कालावधीत कोविड-१९ (कोरोना)च्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शासनाकडून लादण्यात आले होते. मात्र तरीही वारकरी संप्रदायाने सामाजिक भान राखत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य प्रशासनास करत आपल्या अनेक परंपरांना मुरड घालत प्रतिकात्मक पद्धतीने वारीच्या परंपरा सांभाळण्याचा प्रयत्न केला. 

मात्र सध्या कोरोनाचा प्रभाव देशभर व महाराष्ट्रातही कमी होत असून महाराष्ट्र शासनाने गेल्या दोन तीन महिन्यांपासून अनेक निर्बंध शिथिल करत शहर व ग्रामीण भागातील सर्व बाजारपेठा, आठवडा बाजार सुरु केले आहेत. प्रवासासाठी जिल्हा बंदी उठवत खाजगी तसेच एस.टी. बससेवा सुरु केल्या‌. मद्यालये, सिनेमागृह, नाट्यगृह, ग्रंथालये यासह नुकतेच महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्रालयाने कोकणातील वार्षिक जत्रोत्सवासहित अनेक कार्यक्रमांना परवानगी दिल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर आषाढी कार्तिकी विसरू नका मज। सांगतसे गुज पांडुरंग॥ या संतवचनानुसार वारकरी संप्रदायातील प्रमुख दुसरी यात्रा असणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने स्वतःहून आरोग्यसुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता, कोरोनाप्रतिबंधात्मक उपायांसह  शासन प्रशासनाच्या नियमानुसारच योग्य तो समन्वय साधत हि वारी कशा पद्धतीने भरवता येईल याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला आहे. 

आषाढी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने केलेले अमुलाग्र सहकार्य व आताची वारकरी संप्रदायाची समन्वयाची भूमिका लक्षात घेत शासन-प्रशासनानेही यावेळी आता संप्रदायाला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन संप्रदायाच्या सुचनांचा गांभीर्याने विचार केल्यास कुठल्याही वाद-विवादाशिवाय, शासकिय नियमांचे योग्य ते पालन करत  संप्रदायाच्या परंपराही जपत ही यात्रा पार पडेल असा विश्वास वाटतो व यातूनच समन्वयाचा एक नवा आदर्शही प्रस्थापित होईल, अशी आशा आहे.

वारकरी संप्रदायाची भूमिका तथा प्रस्ताव पुढील प्रमाणे

१) 'कार्तिकी यात्रा समन्वय समिती' च्या माध्यमातून ही यात्रा निर्बंधांऐवजी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सकल वारकरी संप्रदाय, शासन-प्रशासन व पंढरपूकर नागरीक यांत समन्वयाचा प्रयत्न.

२) कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये प्रत्येक वारकरी संप्रदाय मठात किमान ५० (शक्यतो वय वर्षे ५० चे आतील) वारकऱ्यांना सामाजिक अंतर राखणे, मुखावरण (मास्क), निर्जंतुकीकरण द्रावण (सॅनिटायझर), वापरणे इ. उपाययोजनांसह सप्तमी ते पौर्णिमा या कालावधीत निवास, भजन, किर्तन करण्यास प्रतिबंध नसावा. या व्यतिरिक्त वैयक्तिक वारीस येणाऱ्या वारकऱ्यांना मुक्कामास थांबवू नये.

३) पंढरपुर कार्तिकी यात्रेसाठी ज्या दिंड्या बाहेरगावाहून पायी चालत येतात, त्या दिंडीमध्ये वारकऱ्यांची संख्या १० पेक्षा जास्त नसावी. वर दिलेले कोरोना प्रतिबंधात्मक सर्व आरोग्यसुरक्षा उपाय केलेले असल्यास या दिंड्यांना प्रवेशास प्रतिबंध करु नये.

४) यावर्षी ६५ एकर सारख्या व इतरही तंबू, राहुट्यामधील उघड्यावरील तात्पुरत्या निवासास प्रतिबंध असावा.

५) चंद्रभागा (नदी) स्नान हा वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग असल्याने सामाजिक अंतर राखत, गर्दी होणार नाही याची दक्षता घेत व यासाठी समन्वय समितीशी चर्चेद्वारे उपाययोजना करत चंद्रभागा स्नानाची योग्य ती व्यवस्था करावी.

६) एकादशी हा मुख्य दिवस असून या दिवशी सर्व फडांच्या दिंड्या नगरप्रदक्षणेसाठी निघतात. या प्रत्येक दिंड्यांत २५ पेक्षा जास्त वारकरी नसावेत तसेच सर्व वारकरी हे सामाजिक अंतर व इतर आरोग्य सुरक्षा उपायांसह सहभागी असावेत. या सर्व दिंड्यांना नगरप्रदक्षणेसाठी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंतची निर्धारित वेळ असावी. दोन दिंड्यांमध्ये  योग्य सामाजिक अंतर असावे. गर्दी होणार नाही याची काळजी दिंडीप्रमुखांनी घ्यावी. (कार्तिक शुद्ध पंचमीस सकाळी ९ ते दुपारी १  व नवमीस रात्री आठ ते पहाटे पाच पर्यंत काही फडांच्या परंपरेच्या नगरप्रदक्षणेसाठी दिंड्या असतात त्यांनाही वरील नियमांसह प्रतिबंध नसावा.)

७) पौर्णिमेच्या दिवशी वारकरी संप्रदाय नियमांप्रमाणे श्रीक्षेत्र गोपाळपूर येथे किर्तनासह 'गोपाळकाला' करण्यास साठी दिंड्या जातात. त्यामध्ये प्रत्येक दिंडीत १० वारकरी असतील. यास कोणतीही हरकत नसावी.

८) दुसरे दिवशी प्रथेप्रमाणे 'महाव्दारकाला' होतो तो अल्पसंख्येत का असेना पार पडणेस हरकत नसावी. 

९) यात्रा कालावधीत सामाजिक अंतर राखणे, मुखावरण (मास्क) चा वापर करणे बंधनकारक होणेसाठी पोलिस यंत्रणेला ताण न देता वारकरी संप्रदाय व पंढरपूरमधील सामाजिक संघटनांच्या समन्वयातून 'कोविड वॉरियर्स' नेमून त्यांचे द्वारे प्रबोधनात्मक व्यवस्था करण्यात यावी.

१०) गेली सहा महिने श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद आहे ते सुरक्षा उपायांसह उघडण्यास हरकत नाही. मात्र या उपरही शासन ते उघण्यास तयार नसल्यास किमान मंदिराचा मुख्य दरवाजा ( श्रीसंतनामदेव महाराज पायरीवरील पितळी महाद्वार) बंद न ठेवता, नित्योपचार वेळापत्रकानुसार तो उघडण्यात यावा. 

जेणेकरुन श्रीविठ्ठल व रुक्मिणी माता यांची कृपादृष्टी आपल्यावर पडते आहे, असा विश्वास वारकरी भक्तांमध्ये निर्माण होईल व दर्शनासाठी व्याकूळ झालेल्या मनाला थोडे समाधान लाभेल. तसेच महाव्दार, पश्चिमव्दार, नगरप्रदक्षणा मार्ग व चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी श्रीविठ्ठल रुक्मिणी दर्शनाचे थेट प्रक्षेपण 'डिजीटल स्क्रीन' द्वारे करण्यात यावे. लांबूनच श्रीसंत नामदेवराय, चोखोबाराय तसेच श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिराचे कळसदर्शन हा किमान हक्क वारकऱ्यांचा अबाधित असला पाहिजे. याकरिता  मंदिर परिसरात यात्रा काळात कोणत्याही प्रकारची संचारबंदी लादू नये. 

वरील प्रमाणे 'कार्तिकी यात्रा समन्वय समिती' ने सुचवलेल्या या सर्व अभ्यासपूर्ण उपाययोजनांसह कार्तिकी यात्रेचे आयोजन झाल्यास लाखोंच्या संख्येत होणारी वारी काही हजारांत भरवून कोरोनाप्रसाराचा धोका टाळत वारकरी संप्रदायाच्या परंपराही जपत चांगला समन्वय साधता येईल‌. हा समन्वय साधण्याची संधी महाराष्ट्र शासन व प्रशासन यांनी दवडू नये, अशी आमची विनंती आहे.

यावरही महाराष्ट्र शासन व प्रशासनाने वारकरी संप्रदायाने समन्वयाचा पुढे केलेला हात झिडकारून आषाढी यात्रेप्रमाणे कडक निर्बंध लादल्यास या लोकशाहीत फक्त वारकरी संप्रदायावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होऊन महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात व पंजाब या राज्यांपर्यंत विस्तारलेल्या लाखोंच्या संख्येतील वारकरी संप्रदायाला 'मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू ऐसे।।'  या संतवचनाप्रमाणे भविष्यात कठोर भूमिका घेत येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत 'मतदाना'वर जाहिर बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

'कार्तिकी यात्रा समन्वय समिती' निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. देवव्रत(राणा) महाराज वासकर, संजय महाराज देहूकर, निवृत्ती महाराज नामदास, भागवत महाराज चवरे, विष्णू महाराज कबीर, एकनाथ महाराज हंडे,
रंगनाथ(स्वामी) महाराज राशिनकर, मोहन महाराज बेलापूरकर, जगन्नाथ महाराज देशमुख, सुधाकर महाराज इंगळे, रामकृष्ण हनुमंत महाराज वीर. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT