अखेर आजीबाईंनी आपला हुंदका आवरत- सावरत आपण आत्महत्या करायला निघाल्याचे सांगितले.
केत्तूर (सोलापूर) : मंगळवार, 5 जुलै 2021... वेळ सायंकाळी 6 वाजताची... स्थळ उजनी पाणलोट क्षेत्र... केत्तूर नंबर 2 व पोमलवाडी (ता. करमाळा) (Karmala) गावादरम्यान नुकत्याच तयार झालेल्या पुलापासून हाकेच्या अंतरावर व पाण्याच्या दिशेने धडपडत जाणारी आजीबाई... त्याच वेळी रोजच्याप्रमाणे सायंकाळच्या वेळी नदीकिनारी फिरायला येणारी काही मंडळी... पैकी सात- आठ तरुण, पाच-सहा शिक्षक, जनावरे चारणारे शेतकरी, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून काही वेळ मनोरंजन म्हणून फिरायला येणारे तरुण... अशांचे लक्ष धडपडत पाण्याकडे सरसावणाऱ्या या आजीकडे गेले... काही तरुणांनी तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला; पण अर्धा-पाऊण तास आपल्या गावाचे नाव वगळता एकही ब्र शब्दही आजी बोलली नाही... त्यामुळे पंधरा- वीस जणांचा गराडा तिच्याभोवती जमा झाला... सर्वांनी प्रश्नांची सरबत्ती चालू केल्याने अखेर आजीबाईंनी आपला हुंदका आवरत- सावरत आपण आत्महत्या करायला निघाल्याचे सांगितले... हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला... (The elderly woman, who was ready to commit suicide, changed her mind due to counseling)
तरुणांनी तिला अडवले नसते तर मोठा अनर्थ घडला असता. आजीबाईंनी तास-दीड तास आपल्या मनात आत्महत्येचा विचार का आला, पतीच्या निधनानंतर एकटी सूनबाई, आपल्या दोन मुली, नातवंडे, शेजारीपाजारी, नातेवाईक इत्यादी गोतावळा सांगताना नेमका कशाचा (कुणाचा) त्रास आजीला झाला, याचा उल्लेख आजीने मुद्दामहून टाळला. थोड्या वेळातच अंधार पडणार होता, त्यामुळे काहीजणांनी आजच्या दिवशी तरी आपल्या घरी येण्याची विनंती केली. यातच एकाने वृद्धाश्रमाचा सांगितलेला पर्याय समोर ठेवल्याने आजीच्या मनात वीज चमकल्याप्रमाणे एक आशादायक विचार चमकला. कुठला वृद्धाश्रम? कोण मला सोडणार? असा विचार ती करू लागली. दरम्यान काही तरुणांनी आजीबाईच्या उत्तराचा धागा पकडत तिच्या गावापासून लांब असणाऱ्या पण येथील परिसरात असणाऱ्या लांबच्या नातेवाइकाचा पत्ता मिळवून संपर्क केला आणि ते पाहुणे आजीबाईंना घेण्यासाठी तासाभरात हजर झाले. जीवनाला कंटाळलेल्या आजीबाईंनी दहा-पंधरा तरुणांसमोर काहीच न चालल्याने आत्महत्येचा विचार सोडून वृद्धाश्रमात जायचे, या विचाराने आलेल्या पाहुण्यांसोबत त्यांच्या घरी गेल्या.
आज समाजातील कोणत्याही वयोगटात आत्महत्या, लाईव्ह आत्महत्या यांचे प्रमाण वाढलेले आहे. आत्महत्या हा उपाय नसून "धर्माने पाप तर कायद्याने गुन्हा' असताना देखील परिस्थितीपुढे माणूस नमतो आणि आपले जीवन संपवून टाकतो. आज या उजनी पाणलोटकिनारी हे तरुण नसते तर साधारण सत्तर वयाच्या खणखणीत आजीबाईंच्या जीवनाचा अनर्थ झाला असता. आजीला सकारात्मक बाबी सांगून आत्महत्येपासून परावृत्त करणाऱ्या मंडळींमध्ये हरी शिंदे, श्री. जाधव, बी. जी. बुरुटे, आर.डी. मदने, एस. एस. जाधव, एस. बी. सामंत (सर्व शिक्षक), राहुल इरावडे, श्रीराज गणगे, योगेश मोरेपाटील (स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी), किरण निंबाळकर, नागराज बाबर, शेतकरी शिवाजी येडे, सिद्धार्थ भाटिया, सुदर्शन मारवाडी, अविनाश साठे, परजिल्ह्यात पीएसआयपदी नुकतेच रुजू झालेले पण सुटीसाठी गावी आलेले पीएसआय चेतक गणगे यांनी आजीबाईला खऱ्या अर्थाने जीवनदान दिले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.