Akshay Maharaj 
पश्चिम महाराष्ट्र

संतसाहित्याच्या माध्यमातून दुष्काळ निवारणाचा प्रयत्न

रुपेश कदम

दहिवडी : महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन काळात संतांनी समाजप्रबोधनाचे काम केले. संतांच्या विचारांचा आता आधुनिक काळातही उपयोग करण्याची वेळ आली आहे. कारण संतांचे माहेरघर असलेला महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलाय. दुष्काळाचे सावट दूर व्हावे, गावे पाणीदार व्हावी, शेतीत भरपूर उत्पन्न व्हावं याकरिता संतसाहित्याच्या आधारे लोकांचे प्रबोधन करण्याचे काम महा एनजीओ फेडरेशन आणि वारकरी संप्रदाय युवा मंच यांनी सुरु केले आहे.

वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक अक्षय महाराज भोसले यांच्या विचारातून या उपक्रमाला चालना मिळाली आहे. या उपक्रमाबद्दल अक्षय महाराज म्हणतात, मी मुळचा सातारा जिल्ह्यातील बिजवडी गावचा. या गावात कधीच पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे या गावातील दुष्काळ मी माझ्या जन्मापासूनच अनुभवला आहे. वृक्ष संवर्धन आणि जल संवर्धन होत नाही तोपर्यंत दुष्काळ महाराष्ट्रातून जाणार नाही असं अभ्यासाअंती सिद्ध झालं आहे. किर्तनाचे धडे ज्यांच्याकडे गिरवले त्या श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर व श्रीगुरु प्रमोद महाराज जगताप यांनी याविषयी मला जाणीव करुन दिली. दरम्यान जलयुक्त शिवार व इतर जलसंधारणाची कामे सुरु झाली, या कामांचं यशही पाहिलं. म्हणूनच आपल्याला जमेल त्या पद्धतीने वृक्ष संवर्धन, जल संवर्धनाचे प्रबोधन करायचे ठरवले. राज्याचे जलसंधारण विभागाचे माजी सचिव प्रभाकर देशमुख, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महाराष्ट्राचे सल्लागार शेखर मुंदडा यांचीही भेट घडून आली. दोघांचेही या क्षेत्रातील काम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला जमेल त्या पद्धतीने दुष्काळ निवारणासाठी किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करायचे निश्चित केले. याची सुरुवात माण तालुक्यातील मोगराळे गावातून केली. यात विजय वरुडकर आणि शशिकांत काटे यांनी प्रचंड प्रोत्साहन दिले.

अक्षय महाराज पुढे म्हणाले की, संत तुकाराम महाराज यांच्या काळात दुष्काळ पडला होता, मात्र ते दुष्काळापुढे हारले नाहीत. उलट 'बरे झाले देवा निघाले दिवाळेl बरी या दुष्काळे पिढा केलीll' असे सांगत त्यांनी दुष्काळाचा मुकाबला केला. संतांनी दिलेल्या पर्यावरण रक्षणाच्या संदेशाकडे आपण दुर्लक्ष केल्याने आपल्यावर दुष्काळाचे संकट कोसळले आहे. सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्याला सांगितले होते की, 'नगरेचि रचावीl जलाशये निर्मावीl महा वने लावावीl नानाविधll' या संत वचनाप्रमाणे आपणही जलाशयाची निर्मिती केली असती आणि विविध प्रकारची महावने लावली असती तर आताचे दुष्काळाचे संकट ओढवले नसते. संतसाहित्याचा जनमानसांत हवा तेवढा प्रसार न झाल्यानेच ही परिस्थिती ओढावल्याची खंत अक्षय महाराज व्यक्त करतात.

अक्षय महाराज पुढे म्हणतात की गावे पाणीदार करायची असतील, शेतं हिरवीगार करायची असतील तर शेतीविषयक सखोल अभ्यास होणंही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या गावात जाऊन प्रबोधनाचे काम करायचे आहे, त्या गावातील संपूर्ण भौतिक माहिती घेतली जाते. गावातील स्वयंसेवकांशी चर्चा केली जाते. त्यानंतर गावातील लोकांचं दुष्काळाशी सामना करण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून मनोबल वाढवलं जातं. संत तुकाराम महाराज, संत  दामाशेट्टी मंगळवेढेकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही दुष्काळ होता. मात्र ते ज्या पद्धतीने या परिस्थितीला सामोरे गेले तसे आपणही या परिस्थितीला तोंड देणे गरजेचे आहे, हे पटवून दिले जाते. व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या अक्षयवारीच्या माध्यमातून रोज या संदर्भातील अभ्यासपूर्ण पोस्ट्स जवळपास १०,००० हुन अधिक लोकांपर्यंत नियमित पोहोचल्या जातात. आतापर्यंत सोलापूर, सातारा, बीडमधील ३० हून अधिक छावण्यांमध्ये समाजप्रबोधनाचं काम केल्याचं अक्षय महाराज यांनी सांगितले.

"लेकरां फारच गोड सांगतूस बघ, आम्हाला नव्हतं इतकं समजत. पण तू सांगतूस ते खरं हाय बघ. आधीच्या येळेत आम्हीबी झाड लावूंनशी जगवली असती तरीबी आज इथं समदं हिरवं असत बघ. पण नाय जमलं बग तवा. पण आता करु आम्ही आमची लेकरं व नातवंडबी करतील बर," वयाच्या सत्तरीकडे झुकलेल्या आजीबाईंनी केलेलं कौतुक डोळ्यात समाधानाचे भाव आणून अक्षय महाराज सांगतात. किर्तनांना वयाच्या आठ वर्षाच्या मुलांपासून ते अगदी ८० वर्षांपर्यंतचे गावकरी येतात. आपल्या गावातील दुष्काळ दूर करायचा असेल तर आपल्याला एकत्र यायलाच हवं असं गावकऱ्यांच्या मनात बिबंवलं गेलं आहे. निसर्गाची पूजा केली, वृक्षवेलींना जपलं, पाण्याचा सदुपयोग केला तर आपल्याला दुष्काळाचे चटके लागणार नाहीत हे लोकांना आता कळून चुकलंय.

किर्तनातून प्रबोधन करण्याची महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. काळानुरुप किर्तन सेवकांनी आपल्या किर्तनांत बदल करुन तत्कालीन संदर्भ घेऊन लोकांना योग्य मार्गावर आणलं आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आपत्ती, संकटं आली तेव्हा या प्रबोधनकारांनीच जनमानसांना सावरलं आहे. आता महाराष्ट्राला दुष्काळानं घेरलं असताना किर्तनकारांनी पुन्हा आपलं प्रबोधनाचं काम हाती घेतलं आहे. या कामात महा एनजीओ फेडरेशन, वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्र, एनयूजे महाराष्ट्र या संस्थांचे विशेष सहकार्य अक्षय महाराज भोसले यांना मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I: इशान किशन, सूर्यकुमार यादव यांची चौफेर फटकेबाजी; दणदणीत विजयासह भारताची मालिकेत २-० अशी आघाडी

Pune Grand Tour: ''सायकल स्पर्धेमुळे पुण्यातील वाहतुकीवर फारसा ताण नाही'', पुणे पोलिस नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर

MSCE Exam 2026 : प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाची विभागीय स्पर्धा परीक्षा ३-४ फेब्रुवारीला ऑनलाईन

Pune Crime News : ई-सिगारेट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्रेत्यांवर छापे, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT