शिवाजी पेठेतील वस्ताद आनंदराव ठोंबरे यांचे घर खंडोबा तालमीपासून काही पावलांवर...रात्रीचे नऊ वाजल्यावर रस्त्यावर लाठ्या भिरभिरू लागलेल्या... ‘ये पवित्रा घे की,’ वस्तादांचा बाणा जागा झाला...पवित्रा कसा घ्यायचा, लाठी हातात कशी धरायची, याचे प्राथमिक ज्ञान देण्याचे त्यांचे रोजचे काम. वयाच्या ऐंशीतही त्यांनी मर्दानी खेळाची रांगडी परंपरा जोपासलेली...वस्ताद ज्ञानदेव चव्हाण, अमृतराव जाधव, श्रीपतराव बोंद्रे, सखारामबापू खराडे यांनी टिकवलेला कलेचा वारसा पुढे नेटाने चालला....वस्ताद शामराव अमृतराव जाधव, आनंदराव पोवार, शंकरराव जरग, शंकरराव बालिंगेकर, बाबासाहेब तिबिले, निवृत्ती पोवार, आनंदराव मालेकर हा ठोंबरे यांचा समकालीन मित्र परिवार...तशी ही यादी भली मोठी... प्रत्येकाने कलेचा प्रसार केल्याचे ठोंबरे वस्ताद सांगत होते. भवानी मंडपातल्या मर्दानी खेळाच्या स्पर्धेत पेठापेठांत ईर्षा उफाळून यायची. खेळ जीवावर बेतणारा... तरीही त्याला प्रतिष्ठा मिळाली नाही...जत्रा, यात्रा, मिरवणुकीत, समारंभात प्रात्यक्षिकांपुरतेच त्याचे अस्तित्व राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मंडपातही स्पर्धा होत नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली. त्यांचा निरोप घेऊन मर्दानी खेळाचा आखाडा गाठला. त्याच्या मागे बाळासाहेब खराडे महाविद्यालयाची भली मोठी इमारत.
फरी गदका स्पर्धेच्या उरल्या आठवणी
‘आमच्या जन्मापूर्वी महाविद्यालयाच्या मैदानावर फरी गदकाच्या स्पर्धा व्हायच्या. त्या आठवणी वडील सांगायचे. तशा स्पर्धा आता होत नाहीत. पेठेतल्या या रांगड्या खेळाला त्यानंतर ग्रहण लागले,’’ अशोक चव्हाण सांगत होते. फरी म्हणजे ढाल व गदका म्हणजे तलवार. ढाल तलवारीचा हा खेळ. गदक्याच्या शेंड्याला रंगीत कापड गुंडाळून शरीराला त्याचा स्पर्श झाल्यावर गुण दिले जायचे. तो मोडीत निघाल्याचे शल्य मनाला बोचले. सह्याद्री प्रतिष्ठानच्या कसबा बावड्यातील आखाड्याचे प्रशिक्षक प्रदीप थोरवत यांची उद्यमनगरात भेट घडली. ‘वस्ताद शामराव अमृतराव जाधव यांच्याकडे व्यायाम ज्ञानकोश खंड होता. बडोद्याचे दत्तात्रय मुजुमदार यांनी त्याचे संपादन केले होते. एकूण दहा खंडांपैकी एक मर्दानी खेळावर होता. त्यावर आधारित जाधव वस्ताद शास्त्रोक्त शिकवायचे. पाच विटेकरी एकाच वेळी विटाफेक करायचे. तसे प्रात्यक्षिक भवानी मंडपात झाले. तसा प्रयोग पुन्हा झाला नाही. माडू शस्त्र चालविण्यात ते वाक्बगार. प्रत्येक फेक करण्यात त्यांची नजाकत होती,’’ त्यांनी वस्तादांच्या आठवणींना उजाळा दिला. खेळाला सुगीचे दिवस आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.
सिलंबम, गटका ते कलरीपयटू
तमिळनाडूमध्ये १९९८-९९ पासून ‘सिलंबम’ खेळ सुरू झाला आहे. एका रिंगणात दोन प्रतिस्पर्धी काठ्या घेऊन एकमेकांना त्याचा स्पर्श करतात. त्यावर गुणांकन पद्धती आकारली आहे. जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्पर्धा असे त्याचे स्वरूप आहे. पंजाबमध्ये फरी गदक्यासारखा ‘गटका’ खेळ प्रसिद्ध आहे. केरळमध्ये ‘कलरीपयटू’ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला आहे. विशेष म्हणजे सिलंबम स्पर्धेत कोल्हापुरातील खेळाडूंनी बक्षिसे मिळवली आहेत. हा खेळ महाराष्ट्रात शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट झालाय. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या मर्दानी खेळाला स्पर्धेचे स्वरूप मिळालेले नाही. प्रत्येक आखाड्यात लाठी फिरविण्याची पद्धती वेगळी आहेत. पूर्वीची गुणांकन पद्धती कशी होती, याची माहिती अलीकडच्या पिढीला नसल्याचा सूर आहे. या खेळातील सुसूत्रतेसाठी मतमतांतरे बाजूला ठेवून त्याला स्पर्धेचे स्वरूप देण्यासाठी गुणांकन निश्चित करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.
प्रशिक्षण वर्ग लागले वाढू
२००० नंतर हळूहळू आखाड्यांत वाढ झाली. ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या शस्त्रांवरील धूळ झटकली गेली. गावागावांत जत्रा-यात्रांत क्वचित प्रात्यक्षिके व्हायची. शहरात ठिकठिकाणी अलीकडे मर्दानी खेळाचे प्रशिक्षण दिले जात आहे. लहान मुलांना कराटे खेळातही लाठीचे धडे दिले जात आहेत. विविध जिल्ह्यांतून आखाड्यांना बोलावले जात आहे. बाराबंदीचा पोशाख व भगव्या साड्यांवर प्रात्यक्षिके सादर करून ऐतिहासिकता जोपासली जात आहे. गल्ली, गाव, शहरापुरता हा खेळ उरलेला नाही. त्याचे सादरीकरण विविध वाहिन्यांवर झाले आहे. लिंबू काढणीच्या उपक्रमांतून त्याला उजाळा मिळाला आहे. या खेळावर अधिकृततेची मोहोर उमटायला हवी हे मात्र खरे.
शिवकालीन युद्धकला व शस्त्रास्त्र संग्राहक
मर्दानी खेळाला अलीकडे शिवकालीन युद्धकला, असा शब्द योजला जात आहे. ज्येष्ठ शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश जाधव यांनी पंधराशेहून अधिक शस्त्रे जमा केली. त्यांचे ठिकठिकाणी प्रदर्शन भरवले गेले. शस्त्रांविषयीची ओढ युवा पिढीत दृढ झाली. शिवकालीन युद्धकलेच्या माध्यमातून शस्त्रांची माहिती देण्याचा विचार युवकांच्या मनात आला. त्यांच्याकडूनही शस्त्रास्त्र संग्रह करण्याचा छंद सुरू झाला आहे. श्री. जाधव यांनी शस्त्रांच्या माहितीची छोटी पुस्तिका प्रसिद्ध केली होती. महाविद्यालय अथवा विद्यापीठस्तरावर शस्त्रास्त्र अभ्यासाचा एखादा अभ्यासक्रम सुरू होण्याची आवश्यकता आहे. तेथून पुढे पाडळी खुर्दच्या आखाड्याला भेट देण्यासाठी रात्री रवाना झालो.
कलेच्या सेवेकऱ्यांचे काय?
प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापुरातील खेळाडूंना युद्धकलेच्या प्रात्यक्षिकाची संधी यंदा मिळाली. त्यांनी या संधीचे सोने केले. खेळाच्या प्रात्यक्षिकांतून उपस्थितांना तोंडात बोटे घालायला लावण्याचा हा इतिहास नवा नाही. यापूर्वी सखारामबापू खराडे यांनी दिल्लीत मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना अचंबित केले होते. डेक्कन ओडिसीतून आलेले पर्यटक प्रात्यक्षिके पाहून दाद द्यायचे. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेकावेळी दुर्गराज रायगडावर ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ उपक्रमातून महाराष्ट्रातील आखाड्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया साधली. वस्तादांचा मानपत्र देऊन सन्मान केला. पाच देशांच्या राजदूतांसमोर खेळाची प्रात्यक्षिके सादर झाली. हा खेळ महाराष्ट्राचा ब्रँड बनण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शहरासह ग्रामीण भागातील वस्ताद अनंत अडचणींवर मात करत खेळ जोपासत आहेत; मात्र त्यांच्याकडे कोणी लक्षच देत नाही...हा विचार करत पाडळीची वेस गाठली.
...आठ वाजून गेल्याने सराव बंद झालेला. कोल्हापूरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. खेळाला शालेय क्रीडा स्पर्धेत स्थान देण्यासाठी कोण पुढाकार घेईल का, असा विचारही मनात घोळत राहिला.
कसबा बावड्यातल्या धनगर गल्लीतले काशिलिंग मंदिर...पन्नासहून अधिक मुला-मुलींच्या हातात लाठ्या...‘‘पवित्रा, नजर समोर, सुरू,’’ असा आदेश देताच समान वेगात लाठ्या भिरभिरू लागल्या.... चौमुखी लाठी पवित्र्याची फेक सादर झाली. पट्टा, तलवार, भाला, विटा, फरी व गदका घेऊन चार-पाच मुले दाखल झाली....उत्सुकता वाढल्याने संवाद सुरू झाला...सह्याद्री प्रतिष्ठानचा शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणाचा हा आखाडा... युद्धकला प्रशिक्षणाची माहिती घेण्याची उत्सुकता वाढली...पेठा-पेठांसह ग्रामीण भागातील फेरफटक्यातून युद्धकला प्रशिक्षणाचे पदर उलगडत गेले...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.