पिंपरी-चिंचवड

आळंदीकरांकडून साश्रू नयनांनी निरोप संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ

CD

आळंदी, ता. २० ः खांद्यावरील उंचावलेल्या भगव्या पताका.... ज्ञानोबा तुकारामांचा अखंड जयघोष..आणि उरी सावळ्या विठूरायाची आस....अशा द्विगुणित आनंदात लाखो वैष्णवजन आळंदीहून पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी मार्गस्थ झाले. यावेळी आळंदी शहरातील ग्रामस्थ, भाविक आपल्या लाडक्या माऊलींना निरोप देण्यासाठी थोरल्या पादुकापर्यंत आले होते. तिथे आरती झाल्यानंतर माऊलींचा रथ पंढरीच्या दिशेने पुढे मार्गस्थ झाला. पंढरीकडे निघालेली माऊली आता तब्बल तेहतीस दिवसांनी भेटणार यामुळे ओलावल्या नयनांच्या कडा पुसत जड अंतःकरणाने आळंदीकरांना माऊलींना पुढील प्रवासासाठी निरोप दिला.
गुरुवारी(ता. १९) माऊलींच्या पालखीने मंदिरातून रात्री तब्बल सव्वा तास उशिराने प्रस्थान ठेवल्यानंतर आजोळघरी समाजआरती झाल्यानंतर रात्री बाराच्या दरम्यान मुक्कामी
विसावली. समाज आरतीनंतर भाविकांचे दर्शन सुरू होते. दर्शनासाठी पहाटे दोनपर्यंत भाविक आणि आळंदीकरांनी गर्दी केली होती. त्यानंतर दर्शन बंद ठेवण्यात आले. यावेळी गांधी कुटुंबीयांकडून माऊलींच्या पादुकांना रुद्राभिषेक व पाद्यपूजन विधीवत करण्यात आले. देवस्थानच्या वतीनेही माऊलींची पहाट पूजा व आरती करण्यात आली. यानंतर ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्यावतीने माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. पहाटे पावणे सातला माऊलींच्या मानाच्या अश्वांचे आगमन आजोळघरी झाले. आळंदीकर ग्रामस्थ पालखी उचलण्यास सज्ज झाले. ठीक सात वाजता माऊलींची
पालखी विठूनामाच्या गजरात आजोळघरातून बाहेर पडली.
दरम्यानच्या काळात सकाळपासून मोठ्या संख्येने भाविक दिंड्यासह बाहेर पडत होते. दिंड्यांचे ट्रक मध्यरात्री तर काही पहाटेच्यावेळी पुण्याच्या दिशेने सोडण्यात आले होते. दरम्यान आजोळ घरातून पालखी बाहेर आल्यानंतर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव आणि रांगोळ्यांच्या पायघड्या करण्यात आल्या.
पालिका चौकामधे आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथामध्ये पालखी ठेवण्यात आली. रथाला आळंदीतील घुंडरे कुटुंबीयांची खिलारी बैलजोडी जुंपण्यात आली होती. रथाची संपूर्ण सजावट आळंदीतील गरुड कुटुंबीयांनी केली. रथात पालखीच्या स्वागताला पालिकेच्यावतीने मुख्याधिकारी माधव खांडेकर, सचिन गायकवाड सामोरे गेले. यावेळी पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार यांचा सन्मान केला. त्यानंतर माऊलींचा रथ पुण्याच्या दिशेने पुढे निघाला. पालिका चौक आळंदीकर ग्रामस्थांनी खचाखच भरून गेला होता. पालिका चौक जुना पूल, देहूफाटा परिसरात आळंदीकर ग्रामस्थ सोहळा पाहण्यासाठी जमले होते. एकामागून एक दिंड्या खांद्यावर भगव्या पताका घेऊन टाळ मृदंगाच्या निनादात विठूनामाचा गजर करत पंढरीकडे निघाल्या. दुसरीकडे पालखीने इंद्रायणीवरील पूल ओलांडल्यानंतर ग्रामस्थांच्या डोळ्यात एक वेगळाच भाव दाटून आला. पंढरीकडे निघालेली माऊली आता तब्बल तेहतीस दिवसांनी भेटणार, यामुळे आळंदीकरांचे अंतःकरण जड झाले होते.
वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पाणी, बिस्किटे, पोहे, शिरा, भात, राजगिरा लाडू, चिक्कीचे वाटप केले जात होते. सकाळी दहाला माऊलींची पालखी थोरल्या पादुका येथे पोचली. यावेळी थोरल्या पादुका येथील ज्ञानेश्वर मंदिरात पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, ऋषिकेश आरफळकर यांनी हातात पादुका घेऊन तेथील माऊलींच्या पुढे स्थानापन्न केल्या. यावेळी त्यांच्यासोबत पालखी सोहळा प्रमुख डॉ. देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. राजेंद्र उमाप होते.
थोरल्या पादुका देवस्थानचे विश्वस्त ॲड. विष्णू तापकीर आणि सदस्यांनी विधिवत पादुकांना पंचामृत स्नान घातले आणि आरती करून पालखी सोहळा पुढे दिघी, कळस, फुलेनगर मार्गे पुण्याकडे दोन दिवसांच्या मुक्कामी मार्गस्थ झाला.

भाविकांची दर्शनासाठी झुंबड
चऱ्होली, वडमुखवाडी, देहूफाटा परिसरातील ग्रामस्थांबरोबरच सोसायटीधारकांची दर्शनसाठी झुंबड उडाली होती. ठिकठिकाणी सोसायटीधारक तसेच ग्रामस्थ खाऊ वाटप करत होते. पालखी सोहळा म्हटलं की अनेकांच्या आनंदाला उधाण येते. मुख्याधिकारी माधव खांडेकर, त्यांच्या पत्नी, मुलगा पारंपारिक वारकरी वेशात भगवा पथक धरून वारीत सामील झाले होते. आळंदीतील त्यांची ही पहिलीच आषाढी वारी होती.

ड्रोनच्या घिरट्या बंद

अनेक वर्षांपासून प्रशासकीय बैठकीदरम्यान वारीच्यावेळी स्वागतकमान आणि ध्वनिक्षेपकांवर बंदीची मागणी होत होती. यंदाच्या वर्षी मात्र पालखी मार्गावर बऱ्यापैकी ध्वनिक्षेपक बंद केले होते. पोलिसांनी याबाबत विशेष दक्षता घेतल्याचे जाणवले. याचप्रमाणे ड्रोनद्वारे शूटिंग करण्यासही पोलिसांनी परवानगी दिली नाही. यामुळे आज दिवसभरात एकही ड्रोन दिसला नाही.

फोटो ः 06000, 06001, 06002

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT