भोसरी, ता. ९ ः अकलूज....विरुद्ध पारनेर....सोलापूर....विरुद्ध सातारा....अशी जोरदार आरोळी...कुस्त्यांचा थरार....त्यातच जोरदार पावसाची बरसात...त्यात रंगलेले सामने...अशा उत्साही वातावरणात भोसरीतील कुस्त्यांच्या आखाडा भर पावसात रंगला. त्याचा कुस्तीप्रेमींनी जल्लोषात आनंद घेतला.
भोसरीतील श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त भोसरीतील वस्ताद कै. सदाशिवराव फुगे आखाडा मैदानात कुस्त्यांचा सामना रंगला. या वेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पंच बाळासाहेब लांडगे, माजी नगरसेवक रवी लांडगे, जालिंदर शिंदे, संतोष लोंढे, विश्वनाथ लांडे, सम्राट फुगे, दत्ता गव्हाणे आदी उपस्थित होते. कुस्त्यांचा सामना रंगत आलेला असताना पावणेसहा वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी महाराष्ट्र केसरी बाला रफीक आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यात लढत सुरू होती. मात्र, मुसळधार पावसातही या कुस्तीचा थरार सुरू होता. भर पावसात कुस्तीप्रेमी थांबून पहिलवानांना प्रोत्साहन देत होते. या अटीतटीच्या लढतीत बाला रफीक याने बनकर यांना चितपट करत वस्ताद कै. पोपटराव फुगे आणि वस्ताद कै. गुलाबराव फुगे यांच्या सन्मानार्थ दिली जाणारी ‘वस्ताद केसरी भोसरी’ची गदा आणि दोन लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. कै. ज्ञानेश्वर लोंढे यांच्या सन्मानार्थ दिली जाणारी युवा सम्राट भोसरीची गदा संकेत ठाकूर यांनी योगेश तापकीर यांच्यावर मात करीत जिंकली.
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यातील कुस्ती पावसामुळे बरोबरीत सोडवावी लागली. महान भारत केसरी माउली जमदाडे आणि उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार यांच्यातील कुस्ती बरोबरीत झाली.
पंच म्हणून हिरामण लांडगे, सुरेश लोंढे, अनिल फुगे, मदन गव्हाणे यांनी काम पाहिले. तर कुस्त्यांचे निवेदन शेखर लांडगे, बाजीराव लांडे, भानुदास फुगे यांनी केले.
पावसामुळे व्यत्यय
सायंकाळी पावणेसहा वाजता भोसरीत जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे श्रोत्यांची पळापळ झाली. मात्र, बाला रफीक आणि प्रकाश बनकर यांचा भर पावसातही सामना सुरू राहिल्याने कुस्तीप्रेमी भर पावसातही कुस्त्यांचा आनंद घेत होते. त्यापुढील कुस्त्या पावसामुळे थांबवाव्या लागल्या. पावसामुळे उत्सवानिमित्त थाटलेल्या दुकानदारांनी पावसापासून साहित्य वाचविण्यासाठी पळापळ करावी लागली. त्यामुळे पावसाने काही काळ उत्सवप्रमींची निराशा केली.
वस्ताद कै. सदाशिवराव फुगे आखाडा मैदान, भोसरी ः भर पावसातही झालेल्या कुस्तीत बाला रफीक याने रोमहर्षक लढतीत वस्ताद केसरीचा किताब जिंकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.