भोसरी, ता. १८ ः पीसीएमसी चौकात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे. मात्र, तेथे स्पर्धा परीक्षेची पुस्तके २०१८ पूर्वी खरेदी केलेली असल्याने विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार त्याचा फारसा उपयोग होत नाही. महागडी पुस्तके विद्यार्थ्यांना स्वतः विकत घ्यावी लागतात. महानगरपालिकेने बसविलेले इंटरनेट नेटवर्क निकृष्ट असल्याने अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी स्वतः पैशाची तजवीज करून खासगी नेटवर्क बसविले आहे. केंद्रातील इनव्हर्टर कमी क्षमतेचे असल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्यास केंद्राच्या निम्म्या भागात अंधार पसरतो. त्यामुळे या केंद्रातील समस्या सोडविण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरीतील पीसीएमसी केंद्रात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारले आहे. या स्पर्धा परीक्षा केंद्रात विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी प्रवेश घेतात. स्पर्धा परीक्षा केंद्राची क्षमता १२९ असताना येथे १५० परीक्षार्थींनी प्रवेश घेतला आहे. मात्र, असे असतानाही या केंद्रात सुधारित पुस्तकांचा अभाव आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची महागडी पुस्तके स्वतःच विकत घ्यावी लागत आहेत.
वायफाय क्वचितच चालू
स्पर्धा परीक्षा केंद्राला भेट दिली असताना विद्यार्थी अभ्यासात मग्न असलेले दिसले. काही विद्यार्थी संगणकावर तर काही विद्यार्थी मोबाईलवर शैक्षणिक व्हिडीओ पाहण्यात मग्न असताना दिसली. केंद्रात महापालिकेने पुरविलेले वायफाय नेटवर्क अमावस्या - पौर्णिमेसारखे कधीतरीच चालत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. कर संकलन विभागात महापालिकेच्या इंटरनेटची चांगली सुविधा मिळत असताना त्याच्या वरच्याच मजल्यावर असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रात का नाही ? असा प्रश्नही काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी स्वतः पैसे जमवून खासगी इंटरनेटची सुविधा बसविली आहे. हे नेटवर्क सुरू राहण्यासाठी विद्यार्थ्यांना दर तीन महिन्यांनी पैसे जमा करून त्याचे भाडे भरावे लागत आहे.
महापालिकेचे हास्यास्पद दावे...
विद्यार्थ्यांनीच स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची आवश्यकता नसल्याचे एका बैठकीत सांगितल्याने नवीन अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध करून दिली नाहीत. महापालिकेचे इंटरनेट नेटवर्क सुरू असल्यावर विद्यार्थी वेगळेच व्हिडिओ पाहण्याची शक्यता असल्याचा हास्यास्पद दावेही महापालिकेच्या संबंधित विभागाने केले आहेत. त्यामुळेच येथे महापालिकेद्वारे कमी प्रतीचे नेटवर्क असतानाही त्यात सुधारणा करण्याची तसदी महापालिका घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
काय आहेत अडचणी ?
- कमी क्षमतेचे इंटरनेट नेटवर्क
- स्वतः पैसे जमवून खासगी इंटरनेटची सुविधा घेण्याची वेळ
- स्पर्धा परीक्षा केंद्राच्या तळमजल्यावरील ग्रंथालयाचीही दुरवस्था
- ग्रंथालयातील बाक, कपाटे, खुर्च्या तुटलेल्या
- असंख्य पुस्तके कालबाह्य, महागडी पुस्तके विकत घेण्याची पाळी
ग्रंथालयाला अत्यल्प प्रतिसाद
ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक, कादंबऱ्या, चरित्रे, कथासंग्रह आदींसह विविध विषयांवरील एकूण १५ हजार ३९१ पुस्तकांची ग्रंथसंपदा ग्रंथालयात उपलब्ध आहे. असे असतानाही या ग्रंथालयातील सभासदांची संख्या अवघी ५० आहे. हे ग्रंथालय पूर्वी भोसरी गावठाणात होते. त्यावेळेस सभासद संख्या अडीचशेच्या पुढे असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. मात्र या ग्रंथालयात सुविधेचा अभाव असल्याने सभासदांची संख्या रोडावल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्यात स्पर्धा परीक्षा केंद्रातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. मात्र येथे बसविलेल्या इनव्हर्टरद्वारे केंद्राच्या फक्त निम्म्याच भागातील विद्युत पुरवठा सुरळीत राहतो. अंधारात अभ्यास करता येत नाही. त्याचप्रमाणे पंखेही बंद राहत असल्याने उकाड्याने स्पर्धा परीक्षा केंद्रात बसणे अवघड होते.
- एक परीक्षार्थी
स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची मागणी केल्यास ती त्यांना पुरविण्यात येतील. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी
जागा उपलब्ध व्हावी यासाठी शेजारील समाज कल्याण इमारतीतील एक हॉल महापालिकेकडे मागण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंटरनेट सेवा आणि इनव्हर्टरची क्षमता वाढविण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली जाईल.
- पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.