भोसरी, ता. २६ ः इंद्रायणीनगरातील काही प्रमुख रस्त्यांवर विविध विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन त्याचे वाहतूक कोंडीत रुपांतर होत आहे. स्पाइन रस्त्यावरील जय गणेश साम्राज्य चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीने बाहेर पडणेही अशक्य झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. बऱ्याच वेळा स्पाइन रस्त्यावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होत आहे.
स्पाइन रस्त्यावरील राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात संध्याकाळच्या वेळेस हमखास वाहतूक कोंडी झालेली असते. त्यापासून वाचण्यासाठी खासगी प्रवासी बस व अवजड वाहन चालक पुणे - नाशिक महामार्गावरून इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौकातून संतनगर चौकाकडे जातात. तेथून आरटीओमार्गे मोशीकडे मार्गस्थ होतात. मात्र, त्यामुळे इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौक व परिसरातील रस्त्यांवर वाहनांची कोंडी होते.
मोशी प्राधीकरणातील स्पाइन रस्ता आणि इंद्रायणीनगरात काही मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयातील रुग्ण ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिकांना इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौक आणि स्पाइन रस्त्याने जावे लागते. मात्र, बऱ्याच वेळा या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उंची रोधक कमान हवी
अवजड वाहने आणि खासगी प्रवासी बस जाऊ नये यासाठी महामार्गावरून इंद्रायणीनगरकडे येणाऱ्या रस्त्यावर उंची रोधक लोखंडी कमान लावण्यासाठी भोसरी वाहतूक पोलिस विभागाने ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेच्या संबंधित विभागाला सात दिवसांपूर्वीच दिले आहे. त्यामुळे ही कमान आता कधी लागणार ? याची नागरिक प्रतीक्षा करत आहेत.
व्यावसायिकांचे नुकसान
राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात संध्याकाळच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. या चौकात संध्याकाळच्यावेळेत वाहतूक कोंडीतून मार्ग काढत वाहने जय गणेश साम्राज्यजवळील सेवा रस्त्यावर येऊन थांबतात. त्यामुळे जय गणेश साम्राज्यमधील नागरिक आणि व्यावसायिक यांना बाहेर पडता येत नसल्याच्या तक्रारी येथील नागरिकांच्या आहेत. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस वाहतूक पोलिसांद्वारेही हा रस्ता बंद केला जात असल्याने येथील दुकानांच्या व्यवसायावर परिमाण होत असल्याच्या तक्रारी येथील व्यावसायिकांच्या आहेत.
भोसरीतील इंद्रायणीनगरातील साई चौक ते संतनगर चौक, जय गणेश साम्राज्य ते स्पाइन मॉल चौक आणि पेठ क्रमांक दोनमधील शंकर मंदिरामागील रस्ता आदी भागांतील रस्त्याच्या कडेला हातगाडीवाले, पथारीवाले यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडी वाढत आहे. त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट सर्कलजवळ होत असलेल्या पीएमपीएमएलचे वाहनतळ भविष्यात या भागासाठी डोकेदुखीचे ठरणार आहे.
- विश्वनाथ टेमगिरे, सामाजिक कार्यकर्ते, इंद्रायणीनगर
संध्याकाळच्यावेळेस पोलिसांद्वारे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे बंद केले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. जय गणेश साम्राज्य सोसायटीतून बाहेर जाणारा रस्ताही बंद केला जातो. त्यामुळे येथील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नित्याच्याच वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका झाली पाहिजे.
- निवृत्ती अमुप, सचिव, जय गणेश साम्राज्य, भोसरी
संध्याकाळच्यावेळेस राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक नियंत्रक दिवे बंद करून वाहतूक पोलिसांद्वारे रस्त्यावर होणारी कोंडी दूर केली जाते. यावेळी अधिक रहदारीच्या रस्त्यावरील वाहने मोठ्या प्रमाणात पुढे सोडून वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविले जाते. जय गणेश साम्राज्यसमोरील रस्त्याने नागरिक उलट दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तो रस्ता वाहनांच्या गर्दीच्यावेळी बंद केला जातो.
- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस वाहतूक विभाग
PNE25V34618
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.