चिंचवड, ता.१३ ः चिंचवड येथील पवना नदी पुलाच्या डाव्या बाजूस, वाल्हेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या पदपथावर मागील अनेक दिवसांपासून कचरा आणि राडारोडा साचला आहे. त्यामुळे या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून पादचाऱ्यांना याचा त्रास होत आहे.
पदपथावर साचलेल्या कचऱ्यामुळे चालण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. तसेच, साचलेल्या कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. चिंचवडच्या प्रवेशद्वारावरच असा राडारोडा आणि कचऱ्याचा ढीग असल्याने शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत आहे. महापालिकेने या ठिकाणी योग्य ती कारवाई करून पुन्हा कचरा व राडारोडा टाकला जाणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.