जाधववाडी, ता. १५ : जाधववाडी परिसरातील गजबजलेल्या शिवरस्त्यावर ‘नो पार्किंग’चे फलक नसतानाही वाहने उचलून पोलिसांकडून दंड आकारला जात आहे. कोणतीही पूर्वसूचना, रेखांकन, अधिकृत सूचना फलक नसताना अचानक कारवाई होत असल्यामुळे वाहनचालकांना नाहक आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण असून पार्किंगसाठी पर्यायी व्यवस्थेची मागणीही त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या माहितीनुसार, शिवरस्ता हा बाजारपेठ, शाळा, लहान-मोठी दुकाने आणि कार्यालयांनी व्यापलेला परिसर आहे. येथे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. रस्त्याच्याकडेला जागा उपलब्ध असल्याने अनेक नागरिक आपली दुचाकी किंवा चारचाकी काही वेळेसाठी उभी करतात. मात्र, अलीकडच्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी अचानक मोहीम राबवत अनेक वाहने क्रेनच्या साहाय्याने उचलून नेली. त्यानंतर संबंधित वाहनधारकांकडून दंड आकारण्यात आला.
रस्त्यावर कुठेही ‘नो पार्किंग’चा फलक नाही. पिवळ्या किंवा पांढऱ्या पट्ट्या नाहीत, कोणताही सूचना फलक नाही. तरीही आमची वाहने उचलली जात आहेत. हे अन्यायकारक आहे, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे. काही नागरिकांनी तर दंडाची रक्कम भरताना नाराजी व्यक्त करत नियम स्पष्ट नसताना कारवाई कशी काय केली जाते ?, असा सवाल उपस्थित केला आहे. व्यापाऱ्यांनाही या कारवाईचा फटका बसत आहे. ग्राहकांना वाहन उभे करण्याची सोय नसेल, तर व्यवसायावर परिणाम होतो. प्रशासनाने आधी पर्यायी पार्किंगची व्यवस्था करावी आणि नंतरच कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी करत आहेत.
दरम्यान, वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरस्ता हा महत्त्वाचा मुख्य मार्ग असून अनियमित पार्किंगमुळे वाहतूक कोंडी वाढते. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने किंवा आपत्कालीन सेवा अडथळ्यात येऊ नयेत म्हणून कारवाई केली जात आहे. मात्र, स्पष्ट सूचना फलक नसल्याची बाब लक्षात घेता नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे.
नागरिकांच्या मागण्या
- ‘नो पार्किंग’ किंवा ‘पार्किंग’ क्षेत्र स्पष्ट करणारे फलक लावावेत
- रस्ते योग्य चिन्हांकित करावीत, पार्किंगची पर्यायी व्यवस्था करावी
- कारवाईपूर्वी जागृती मोहीम राबवावी, नागरिकांना नियमांची माहिती द्यावी
- नियमांची पारदर्शक अंमलबजावणी व्हावी
अनेकजण वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून दुकानात जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. काही अपघात झाला; तर तेथून रुग्णवाहिकादेखील जाऊ शकत नाही. काही दिवसांपासून बऱ्याच नागरिकांनी आम्हाला याबाबत कारवाई करावी, अशी मागणीही केली होती. त्याचे समर्थनही काही जणांनी केले आहे. रस्त्यांवर ‘नो पार्किंग’चा फलक लावण्यात येईल. मात्र, नियम तोडल्यास कारवाई करण्यात येईल.
- रामचंद्र घाडगे, वाहतूक पोलिस निरीक्षक, तळवडे विभाग
जाधववाडी परिसरात वाहन कुठे उभे करायचे ?, हे निश्चित नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला वाहने लावली, तर वाहतूक पोलिस आणि टोइंग कर्मचारी उचलून नेतात. त्यावर आकारला जाणारा दंड अन्यायकारक आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहने कुठे उभी करायची? हे सांगायला हवे.
- आकाश जाधव, वाहनचालक, जाधववाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.