लोणावळा, ता. १ ः बांधकाम कामगारांकडून पैशाची मागणी तसेच बोगस कागदपत्र, दाखले तयार करत महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांची चौकशी होणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्गत बोगस कागदपत्रे, दलाल यांच्याविरुध्द दक्षता पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवणेबाबत दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. ही तपासणी मोहीम दहा जुलैअखेर राबविण्यात येणार असून ११ जुलैपर्यंत चौकशी अहवाल मंडळास सादर करायचा आहे.
राज्याचे कामगार मंत्री व प्रधान सचिव (कामगार) यांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी याबाबत दक्षता पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सर्व जिल्हे व तालुकास्तरावर जिल्हा, तालुका सुविधा केंद्रामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्यात येते. तालुका सुविधा केंद्रातील कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्या छाननीअंती अर्ज मंजूर करण्यात येत आहेत. ही सर्व सेवा मंडळामार्फत निःशुल्क राबविण्यात येते. मंडळामार्फत देण्यात येत असलेले सर्व लाभ कोणतेही शुल्क न आकारता देण्यात येत असले तरीही, बांधकाम कामगारांकडून पैशाची मागणी होत असल्याबाबत तसेच बोगस कागदपत्र, दाखले तयार करत लाभ घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.
या पार्श्वभूमीवर कामगार कल्याण मंडळाअंतर्गत येणाऱ्या विभागप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा कार्यालय प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथक गठीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. जिल्ह्यात बोगस कागदपत्र तयार करून होणारी नोंदणी, पैशाच्या मागणीबाबतच्या प्राप्त तक्रारी, बोगस कागदपत्रे, दाखल्यांबाबत आलेल्या तक्रारींबाबत चौकशी होणार आहे. यात दोषी आढळणाऱ्या संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. याबाबत शासनाकडे अहवाल सादर होईल व नंतर नियमानुसार कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ यांनी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.