सकाळ इम्पॅक्ट
निगडी, ता. २५ : आकुर्डी गावठाणातील गुरुदेवनगर परिसरातील अनेकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन महापालिकेच्या ‘अ’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांनी तातडीने नालेसफाई केली. याशिवाय निगडी प्राधिकरणातीलही नाले स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
राज्यात लवकरच मॉन्सून दाखल होणार आहे. अशातच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे झाल्यामुळे यंदा पाणी साचण्याची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे जेथे पाण्याचा निचरा होत नाही, अशा अनेक अडगळीच्या ठिकाणी यंत्राच्यामदतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे कामाला गती मिळाली आणि नाले अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ झाले.
दरवर्षी पावसाळ्यात निगडी प्राधिकरण आणि आकुर्डी गावातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचे काम हाती घेतले. त्यामध्ये गाळ, कचरा आणि प्लास्टिकचा ढिगारा काढून टाकण्यात आला. त्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा झाला.
आकुर्डीतील रहिवासी रमेश शिंदे म्हणाले, ‘‘दरवर्षी पावसाळ्यात आमच्या परिसरात पाणी तुंबायचे. गटाराचे पाणी घरात घुसून खूप नुकसान व्हायचे. यंदा प्रशासनाने वेळेत नालेसफाई केल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. आशा आहे की यंदा पाणी साचणार नाही.’’
निगडी प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरिक अंजली कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘ महापालिकेने एक चांगला आणि आवश्यक पुढाकार घेतला आहे. परंतु फक्त नालेसफाई करूनच चालणार नाही; तर नागरिकांनीही कचरा नाल्यांमध्ये न टाकण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. प्रशासनाने यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.’’
‘‘आम्ही रावेत, वाल्हेकरवाडी, निगडी प्राधिकरण आणि आकुर्डी गावातील सर्व प्रमुख नाल्यांची स्वच्छता केली आहे. विशेषतः जेथे पाणी साचण्याची जास्त शक्यता असते. तिथे जेसीबी आणि इतर आधुनिक साधनांचा वापर करून खोलवर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे. नागरिकांनीही या कामात सहकार्य करावे आणि कचरा नाल्यात टाकू नये.
- सुधीर वाघमारे, आरोग्य अधिकारी, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.