पिंपरी, ता. २ः ‘‘पंढरीच्या विठोबापेक्षा त्यांच्या विठोबा नामामध्ये मोठी ताकद आहे. म्हणून संतांच्या संगतीने पंढरपूरला निघालेले वारकरी नामस्मरणात तल्लीन झाले आहेत. कारण, विठोबाच्या नामस्मरणात मोठी ताकद आहे,’’ असा कानमंत्र नागपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार तथा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी दिला.
आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात ढोक महाराज बोलत होते. त्यांच्या हस्ते श्रीविठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी व अभंगगाथा या ग्रंथाचे पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांची कीर्तन सेवा झाली. संत तुकाराम महाराज यांच्या,
एक गावें आह्मीं विठोबाचे नाम ।
आणिकांपें काम नाहीं आतां ॥
मोडूनियां वाटा सूक्ष्म दुस्तर ।
केला राज्यभार चाले ऐसा ॥
लावूनि मृदंग श्रुतिटाळ घोष ।
सेवूं ब्रह्मरस आवडीनें ॥
तुका म्हणे महापातकी पतित ।
ऐसियांचे हित हेळा मात्रें ॥
या अभंगाचे निरूपण त्यांनी केले. दह्यापासून लोणी निघते. त्याचे सार म्हणजे तूप आहे. तसे नामस्मरण हे भक्तीचे सार आहे, असे सांगून ढोक महाराज म्हणाले, ‘‘पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर संतांच्या संगतीने जायला हवे. कारण, ‘संतांचे संगती मनोमार्ग गती’ आहे. देव योग्याला भावतो. भक्ताला आकडतो. संसार हे न्यायालय आहे. त्यातील संत हे वकील आहेत. आपण सामान्य जण आरोपी आहोत. भगवंत हे न्यायाधीश आहेत. त्यामुळे आरोपीला न्यायाधीशापर्यंत जायचे असेल तर वकील निवडावा लागतो. तसे काही आरोपी देहूच्या वकिलासोबत, काही आळंदीच्या वकिलासोबत, काही मुक्ताईनगरच्या तर काही शेगावच्या वकिलासोबत पंढरपूरच्या न्यायाधीशांकडे चालत आहेत.’’ चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट व आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन महोत्सवाचे सहप्रायोजक आहेत.
‘सकाळ’चा श्रीमंत कीर्तन सोहळा
सालाबादप्रमाणे ‘सकाळ माध्यम समूहा’ने आजपासून आषाढी एकादशीपर्यंत ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ हा कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. हा सुंदर उपक्रम आहे. गडगंज श्रीमंत बापाने लाडक्या मुलीचे लग्न लावून द्यावे, त्यात काहीही उणीव राहात नाही, तसा हा सोहळा ‘सकाळ माध्यम समूहा’ने आषाढी एकादशी निमित्त परिपूर्णपणे घडवून आणला आहे. त्यात काहीही उणीव ठेवलेली नाही, असा हा कीर्तनाचा श्रीमंत सोहळा आहे, अशा शब्दांत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी ‘सकाळ’चे कौतुक केले.
बोधले महाराजांचे आज कीर्तन
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात गुरुवारी (ता. ३) सायंकाळी पाच वाजता पंढरपूर येथील कीर्तनकार जयंत महाराज बोधले यांची कीर्तन सेवा होईल.
महोत्सवाची उर्वरित रूपरेषा
शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी पाच वाजता पुणे येथील महिला कीर्तनकार रोहिणीताई माने-परांजपे, शनिवारी (ता. ५) सायंकाळी पाच वाजता नेवासा येथील कीर्तनकार उद्धव महाराज मंडलिक यांची कीर्तन सेवा होईल. रविवारी (ता. ६) सकाळी ९ वाजता पुणे येथील कीर्तनकार सचिन महाराज पवार यांच्या कीर्तन सेवेने महोत्सवाचा समारोप होईल.
सर्वांना विनामूल्य प्रवेश
आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ’ने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.
....
फोटो ओळ
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात निरूपण करताना रामराव महाराज ढोक.
...
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात उपस्थित भाविक.
....
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात सन्मानित केलेले भाविक.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.