पिंपळे गुरव, ता. १ ः पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळील चौकात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून बांधलेले वाहतूक बेट सध्या धोकादायक स्थितीत असून अज्ञात वाहनाच्या धडकेने मोडकळीस आले आहे. त्याचे ब्लॉक सध्या चौकात अस्ताव्यस्त पडत आहेत. त्यामुळे, वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचाही धोका वाढला आहे.
रामकृष्ण चौक हा परिसरातील एक महत्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी, दापोडी तसेच पुण्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांचा हा चौक आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर लहान-मोठी वाहने, शालेय वाहने, रिक्षा तसेच पादचाऱ्यांची सततची वर्दळ असते. अशा ठिकाणी वाहतूक बेटाचे दगड अज्ञात वाहनाच्या धडक बसल्याने ढासळत असून अपघातास कारणीभूत ठरू शकतात. त्याची तत्परतेने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.
महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता प्रसाद देशमुख म्हणाले,‘‘या वाहतूक बेटाची पाहणी करून तुटलेल्या भागास सुरक्षा पट्टी लावली जाईल. दोन ते तीन दिवसांत ही दुरुस्ती पूर्ण केली जाईल.’’
प्रशासनाचे दुर्लक्ष
स्मार्ट सिटी अंतर्गत हा चौक सुंदरतेने विकसित करण्यात आला. वाहतूक बेट, झाडांची लागवड, रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, शोभिवंत दिवे आदी कामे करण्यात आली होती. मात्र, सध्या त्याचा काही उपयोग राहिलेला नाही. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. देखभालीची जबाबदारी कोणीच घेत नसल्याचे चित्र आहे.
प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षेची जाणीव राहिलेली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत लाखो रुपयांची कामे करण्यात आली असली तरी त्यांची देखभाल आणि वेळेवर दुरुस्ती करण्याकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही. अपघात होईपर्यंत वाट पाहण्याची ही प्रवृत्ती धोकादायक असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
- शिवाजी कदम, स्थानिक नागरिक
PMG25B02544
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.