प्रगतिशील पिंपरी-चिंचवडचे ‘स्मार्ट व्हीजन’
-------------------
कामगारनगरी, उद्योगनगरी, आयटी हब, ऑटो हब... आणि आता ‘स्मार्ट सिटी’ अशी दमदार वाटचाल पिंपरी-चिंचवड शहराची सुरू आहे. सुमारे ३० लाख पिंपरी-चिंचवडकरांची जीवनशैली उंचावण्याच्या दृष्टीने विकसित शहर घडवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजप, पिंपरी-चिंचवड.
-------------
माजी राष्ट्रपती, भारतरत्न स्व. डॉ. अब्दूल कलाम यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, आम्ही २०१७ मध्ये ‘व्हीजन-२०२०’ अभियान हाती घेतले होते. त्याअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील सर्वसामान्य नागरिकांना त्याच-त्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी औद्योगिक विकास, इन्फ्रास्ट्रक्चर, पर्यावरण संवर्धन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, पायाभूत सुविधा हा पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला होता.
शाश्वत विकासाच्या अजेंड्यावर २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सोबतीने आम्ही पिंपरी-चिंचवडसह समाविष्ट गावांतील विकासकामांना चालना दिली. त्यामुळेच ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्शिअल कॉरिडॉर’ विकसित करता आला. पायाभूत सोयी-सुविधा, पर्यावरण आणि कौशल्य विकास या माध्यमातून आधुनिक काळात प्रगतिशील पिंपरी-चिंचवड घडवणे हेच ‘व्हीजन-२०३०’ आहे.
जलस्रोत आत्मनिर्भर पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून पवना धरण हा एकमात्र जलस्रोत होता. वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण यामुळे नवीन जलस्त्रोतांची निर्मिती करणे काळाची गरज होती. अन्यथा शहरात पाणी संकट उभा राहिले असते. यासाठी आम्ही आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातून सुमारे २६८ एमएलडी पाणी उपलब्ध करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी १०० एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात दाखल झाले असून, त्यामुळे समाविष्ट गावांसह शहरातील पाणी पुरवठा सक्षम होण्यास मदत होणार आहे. उर्वरित १६८ एमएलडी पाणी आगामी काळात शहराला उपलब्ध करणे, यासह पवना धरणप्रकल्पातील अतिरिक्त पाणीसाठा पिंपरी-चिंचवडसाठी राखीव ठेवणे. यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
ग्रीन सिटी क्लीन सिटी
पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना १९७० मध्ये झाली. त्यानंतर १९८२ मध्ये महापालिका निर्माण झाली. तेव्हापासून मोशी येथील मोकळ्या जागेत शहरातील जमा होणारा कचरा टाकला जात होता. त्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नव्हती. त्यामुळे २०१४ पर्यंत कचऱ्याचे मोठे डोंगर निर्माण झाले. नागरी आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे आम्ही कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा संकल्प केला. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील पहिला ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्यात आला. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यासह बायोमायनिंग, सीएन्डडी वेस्ट असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी आम्ही प्रयत्नशील असून, नमामी गंगाच्या धर्तीवर इंद्रायणी पुनरुज्जीवन करण्याचा आमचा संकल्प आहे. यासह शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी लोकसहभाग आणि प्रशासन असे एकत्रित प्रयत्न करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण
देव-देश अन् धर्म रक्षण आणि विकासाचा अजेंडा मुद्यावर आम्ही काम करीत आहोत. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा आणि शंभू सृष्टी विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिव-शंभूप्रेमी आणि नव्या पिढीसाठी हा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ प्रेरणादायी ठरणार
असून, पिंपरी-चिंचवडची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार आहे. २०३० मध्ये या महत्त्वाकांक्षी स्मारकाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे.
स्पोर्ट्स सिटी पिंपरी-चिंचवड...
पिंपरी-चिंचवड शहराला ‘स्पोर्ट्स सिटी’ घडवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्याद्वारे स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, असा हेतू आहे. शहरात आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, आंतरराष्ट्रीय कबड्डी संकुल, स्केटिंग ग्राउंड, बहुद्देशीय स्टेडिअम असे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. आगामी काळात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये शहरातील लक्षवेधी कामगिरी करावी, असा संकल्प आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडिअम, हॉर्स रायडिंग ग्राउंड, स्वीमिंग पूल असे प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आणि मल्टीपर्पज स्टेडिअम विकसित करण्याचा मानस आहे.
आरोग्य सुविधा सक्षमीकरण...
पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. समाविष्ट गावांमधील ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्शिअल कॉरिडॉर’ नव्याने विकसित झाला आहे. अशा परिस्थितीत शहराची ‘आरोग्यवाहिनी’ असलेले स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर (वायसीएम हॉस्पिटल) मोठा ताण येतो. त्यामुळे शहरात सात ठिकाणी विभागीय रुग्णालय उभारण्यात आली आहेत. तसेच, वायसीएम रुग्णालय येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पॅरामेडिकल कॉलेजचेही काम प्रगतिपथावर आहे.
वायसीएम रुग्णालयात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपचार घेण्यासाठी येतात. त्यामुळे शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे अत्यावश्यक होते. यासाठी आम्ही मोशी येथे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे ८५० बेडचे रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आगामी काळात शहरात कॅन्सर रुग्णालयही उभारण्याचा मानस आहे.
प्रशस्त पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुल...
पिंपरी-चिंचवड दिवाणी न्यायालयाची जुनी इमारत अपुरी आहे. शहरातील दाव्यांची संख्या आणि पक्षकार व वकिलांची पुण्याकडे होणारी पायपीट कमी करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय संकुल उभारावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. यासाठी आम्ही पुढाकार घेतला आणि मोशी येथील गायरान जमिनीमध्ये न्यायालयाची सुसज्ज इमारत उभारण्याचे काम हाती घेतले. त्याला राज्य सरकारची मंजुरीही मिळाली. त्यामुळे सुमारे ४० हजार दावे आणि विविध आठ प्रकारची न्यायालये शहरात सुरू होणार असून, नागरिक, पक्षकारांसह वकिलांना दिलासा मिळणार आहे. या इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
एज्युकेशन हब पिंपरी-चिंचवड...
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडची ओळख एज्युकेशन हब अशी व्हावी, असा आमचा निर्धार आहे. बदलल्या जीवनशैलीमध्ये आधुनिक शिक्षणासोबतच अध्यात्म आणि वारकरी शिक्षणाची संधी नव्या पिढीला मिळाली पाहिजे. या संकल्पनेतून आम्ही टाळगाव चिखली येथे महाराष्ट्रातील पहिले जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठाची पायाभरणी केली. संतपीठाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, अभ्यासक्रमही सुरू झाला आहे. तसेच, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, आयआयएम, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, राष्ट्रीय कला अकादमी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, तसेच, प्रस्तावित संविधान भवन उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
महापालिका प्रशासकीय भवन...
पिंपरी येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेची प्रशासकीय इमारत आहे. या चार मजली इमारतीचे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते १३ मार्च १९८७ रोजी उद्घाटन झाले होते. तीन मजल्यावर अधिकाऱ्यांची दालने तर, एका मजल्यावर पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. त्यानंतर महापालिकेचे विस्तारीकरण करण्यात आले. सध्या ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे चिंचवड येथील ७ एकर जागेत १३ मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारण्याचे नियोजन आहे. भविष्यातील ५० वर्षांचे नियोजन करून या इमारतीचा आराखडा तयार केला आहे. पाच मजली स्वतंत्र इमारतीमध्ये वाहनतळ असणार आहे. महापालिका सभागृहात ३०० नगरसेवकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि हेलिपॅड सुविधासुद्धा असणार आहे.
पायाभूत सुविधा सक्षमीकरण...
पिंपरी-चिंचवडसह समाविष्ट गावांतील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर आम्ही ‘फोकस’ केला आहे. विकास आराखड्यातील आरक्षणाप्रमाणे प्रमुख रस्ते, आरक्षणे विकसित करणे आणि त्याद्वारे स्थानिक नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे याला प्राधान्य देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराची कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच, टपरीमुक्त शहर, अतिक्रमण मुक्त पदपथ यासाठी पुढाकार घेणार आहोत.
सोसायटीधारकांसाठी स्वतंत्र यंत्रणा...
सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही विधानसभा सभागृहात राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळे राज्य सरकारने सोसायटीधारकांच्या समस्या निराकरणासाठी धोरण ठरवण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सहकार विभागामार्फत ‘एसओपी’ तयार केली असून, त्याद्वारे सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. आगामी काळात सोसायटीधारक आणि गृहनिर्माण सोसायट्यांसाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्वतंत्र अधिकारी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कालबद्ध धोरण ठरवण्याकरिता पुढाकार घेण्यात येणार आहे.
‘‘ भोसरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी २०१४ मध्ये मला विधानसभा सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यानंतर शास्तीकर संपूर्ण माफी, बैलगाडा शर्यत बंदी उठवणे, बफर झोन, प्राधिकरण बाधितांचा परतावा, स्पाईन रस्ता असे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले. मध्यंतरी कोविड महामारीमुळे सुमारे दीड वर्षे विकासकामांची गती मंदावली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सुमारे अडीच वर्षे पिंपरी-चिंचवडकडे राज्य सरकारचे अक्षरश: दुर्लक्ष झाले. आता महायुती सरकारच्या काळात विकासकामांना पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. ‘व्हीजन-२०२३’ च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड राज्यातील विकासाचे ‘रोल मॉडेल’ होईल, असा विश्वास आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा.
फोटोः 85619
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.