पिंपरी, ता. २४ ः ‘‘आगामी काळात एक विकसित भाग आणि ‘विकासाचे रोल मॉडेल’ म्हणून भोसरी विधानसभा मतदारसंघ राज्यात ओळखला जाईल. पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांचा स्वाभिमान कायम ठेवून आणि सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना अभिमान वाटेल, असे काम मला पुढील काळात करायचे आहे.’’, असा निर्धार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
लांडगे म्हणाले, ‘‘विधानसभा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भोसरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष महायुतीची अधिकृत उमेदवारी मला मिळाली. गेल्या १० वर्षांतील कामांच्या ‘रिपोर्ट कार्ड’चा विचार करून मला उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले, ही माझ्यासाठी निश्चितच समाधानाची बाब आहे. २०१४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाताना शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकास कामे या मुद्यांवर मी आपणांस ‘शब्द’ दिला होता. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत आणि त्यानंतर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीतही मतदार माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. ‘शब्द दिला की आशा निर्माण होते आणि दिलेला शब्द पूर्ण केला की विश्वास निर्माण होतो..’ या सूत्रानुसार मी आजवर काम करीत आहे. सर्वांचे पाठबळ आणि राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार व केंद्र सरकारशी संबंधित शहरातील प्रश्न मार्गी लावता आले.’’
विकास निरंतर चालणारी प्रक्रिया...
वास्तविक, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे बहुतांशी प्रश्न सुटले असले; तरी आपण शाश्वत विकासाच्या संकल्पनेनुसार काम करीत आहोत. मला खात्री आहे की, पिंपरी-चिंचवडकरांची जीवनशैली उंचावण्यासाठी आणि शहराच्या शाश्वत विकासाच्यादृष्टीने आपण ज्या पद्धतीने काम करीत आहोत, आजवर जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळेच शहरातील विविध प्रश्न व प्रलंबित विकासकामे मार्गी लावता आली आहेत. २०१४ आणि २०१९ नंतर आता पुन्हा एकदा लोकहिताचे उर्वरित कार्य पूर्ण करण्यासाठी २०२४ मध्ये मी जनतेच्या सोबतीने विधानसभा निवडणुकीला सामोरा गेलो. त्यामध्ये सर्वांनी मला विजयी केले, असेही लांडगे यांनी नमूद केले.
प्रचार काळात आम्ही केलेली विकास कामे, सोडवलेले प्रश्न आणि आगामी काळातील शहराच्या शाश्वत विकासाबाबत अजेंडा घेऊन मतदारांसमोर गेलो. गुणवत्तेच्या आधारे सर्वजण निश्चितपणे माझ्यासोबत होते. आणि पुढेही राहणार आहेत, याची मला खात्री आहे. आपली साथ हीच माझी ताकद आहे. मी दिलेला प्रत्येक शब्द खरा करीन, हे माझे अभिवचन आहे. आम्ही पिंपरी-चिंचवडकर एकजुटीने राहून विकसित शहर घडविणार. हाच आमचा ध्यास आहे.
- महेश लांडगे, आमदार तथा विजयी उमेदवार, भोसरी विधानसभा, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.