पिंपरी, ता. ३ ः ‘भाकरीच्या ताटामधे, बहिणाईचा शब्दघास; बहिणाईची चूल माझ्या कवितेचा श्वास..’, ‘पाच लेकरांची माय, भाकर तव्यावर टाकते..’ या आणि अशा अनेक कवितांचे सादरीकरण, त्याबरोबर चुलीवर भाजल्या जाणाऱ्या भाकरी आणि उपस्थितांनी दिलेली दाद, अशा वातावरणात शब्दधन काव्यमंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेले काव्यसंमेलन पार पडले. निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या काव्यसंमेलनात चुलीवर भाकरी करताना कविता सादर करण्यात आल्या.
चिंचवड येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र येथे संपन्न झालेल्या या कविसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी उज्ज्वला केळकर यांच्या हस्ते चुलीची पूजा करून झाले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या सदस्य जयश्री श्रीखंडे, शामला पंडित, प्रदीप बोरसे, सुरेश कंक, मंगला पाटसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तानाजी एकोंडे यांनी चूल पेटवताना सादर केलेल्या भक्तिपूर्ण रचनेने कविसंमेलनाची सुरुवात झाली. ‘आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’ या कवितेतून चांगले फळ मिळण्यासाठी माणसाने अगोदर कष्ट केले पाहिजे असा संदेश बहिणाबाई चौधरी यांनी दिला आहे, असे सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
याप्रसंगी राधाबाई वाघमारे, शोभा जोशी, आय. के. शेख, कैलास भैरट, फुलवती जगताप, जयश्री गुमास्ते, संगीता सलवाजी, नंदकुमार कांबळे, सुहास घुमरे, कांचन नेवे, केशर भुजबळ, अण्णा जोगदंड, हेमंत जोशी, तेजश्री पाटील, योगिता कोठेकर, डॉ. पी. एस. आगरवाल, शारदा पानगे, सुभाष चटणे, यशवंत कण्हेरे, बळीराम शेवते, संजय गमे, चंद्रकांत बरसावडे, महेश बिरदवडे यांच्यासह सुमारे पंचेचाळीस कवींनी कवितांच्या माध्यमातून स्त्रीजाणिवा, मातृत्व, निसर्ग आणि सामाजिक बांधीलकी विशद केली. संध्या गांधलीकर यांनी बहिणाबाईंच्या ‘धरित्रीले दंडवत’ या कवितेचे अभिवाचन केले; तर नारायण कुंभार यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध कवितांचे रसग्रहण केले. सुचेता गटणे यांनी सादर केलेल्या भारुडाने तसेच प्रकाश महाराज घोरपडे यांच्या भैरवीने कविसंमेलनाची सांगता करण्यात आली. मुरलीधर दळवी, अशोक महाराज गोरे, अण्णा गुरव यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शामराव सरकाळे यांनी आभार मानले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.