पिंपरी, ता. ३ ः आई राजा उदे उदे, अंबाबाईचा उदे उदे, अशा जयघोषात शहरातील विविध मंदिरांमध्ये गुरुवारपासून (ता.३) आदिशक्तीचा उत्सव असणाऱ्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. पहाटेपासून विविध मंदिरांमध्ये घटस्थापनेची लगबग दिसून आली. सर्वच देवीच्या मंदिरांमध्ये पहाटे अभिषेक करण्यात आला. त्यानंतर, विधीवत घटस्थापना झाली. पहिल्याच माळेला पहाटेपासूनच अबालवृद्धांनी देवीच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली. महिलांनीही घरोघरी घट बसवून मनोभावे पूजा केली; तर सायंकाळी विविध सार्वजनिक मंडळांनी मिरवणुका काढत देवीची प्राणप्रतिष्ठापना केली.
घरोघरी पहाटेपासूनच सुरू असलेली महिला वर्गाची लगबग, पूजेचे साहित्य आणण्यासाठी बाजारात उडालेली झुंबड, फुले- हार, धान्य, घट या साहित्याची करण्यात येणारी जमवाजमव, घराघरांतून श्रीसुक्ताचे ऐकू येणारे सूर असे वातावरण शहरात अनुभवायला मिळाले. पिंपरीतील फुलांची बाजारपेठ, आकुर्डी, चिंचवड व उपनगरांतील बाजारांमध्ये नागरिकांनी फुले व घटस्थापनेचे सामान घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. अनेकांनी घटस्थापनेचा उपवास केला होता. त्यामुळे, फळे, उपवासाची तयार पीठे व फराळाचे पदार्थ घेण्यासाठी देखील बाजारात गर्दी उसळली.
भजन, श्री सुक्त पठण कार्यक्रम
पहिल्या माळेलाच देवीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. मंदिरांमध्येही नऊ दिवसांमध्ये भजन, श्री सुक्त पठण, महिलांसाठी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. बहुतांश मंदिरांमध्येही पहिल्या माळेला देवीला पिवळ्या रंगांची वस्त्रे परिधान करून आदिशक्तीचे रुप देण्यात आले होते. आकुर्डीतील तुळजा भवानी मंदिर, पिंपरीतील वैष्णोदेवी मंदिर, दुर्गा टेकडी उद्यान येथील दुर्गादेवी मंदिर, शितळादेवी मंदिर, यमुनानगर येथील सातेरी देवी मंदिर, कुंदननगर येथील आई माताजी मंदिर, मोरवाडी येथील मोरजाई माता मंदिर, पिंपरीतील महालक्ष्मी मंदिर, खराळवाडी येथील खराळाई मंदिर, कासारवाडी येथील शितळादेवी मंदिर, वडमुखवाडी येथील पद्मादेवी मंदिर, दापोडी येथील फिरंगाई देवी मंदिर, चऱ्होलीतील हिरामाता देवी मंदिर, दिघीतील काळुबाई मंदिर, प्राधिकरण निगडी येथील मनुदेवी, सांगवी येथील लक्ष्मीमाता मंदिर, पिंपळे गुरव येथील तुळजा भवानी मंदिर, लिंक रोड येथील कालिका माता यासह देवीच्या विविध मंदिरांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
पिवळ्या रंगाचे वस्त्र
दरवर्षी नवरात्रात नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांमध्ये रूढ झालेली आहे. या काळात मंदिरांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यावेळी देवीलाही याच ठरावीक रंगाची वस्त्रे परिधान करण्यात येतात. यावर्षी पहिल्या माळेला पिवळा रंग असल्याने बहुतांश महिला व तरुणींनी पिवळा रंग परिधान केलेला दिसून आले. महाविद्यालये, सरकारी व खासगी कार्यालये याबरोबरच मंदिरांत दर्शनासाठी आलेल्या महिलांनीही पिवळा रंग परिधान केलेला दिसून आला. पिवळ्या रंगाच्या एकसारख्या साड्या किंवा पारंपरिक पेहराव घालून फोटोशूट करतानाही महिला दिसून आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.