पिंपरी, ता.५ ः ठुमक्यांसोबत मनमोहक छटांसह सादर झालेली लावणी... हिपहॉप-बॉलिवूड डान्स शैलीतील लक्षवेधी सादरीकरण, संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई, सुरेल गायनाने वातावरणात संचारलेली ऊर्जा आणि प्रसन्नता, काव्यवाचन आणि पथनाट्याद्वारे सामाजिक विषयांना घातलेला हात, वक्तृत्व स्पर्धेतील धारदार भाषणे अन् व्यंगचित्राद्वारे चेहऱ्यावर उमटलेले हसू अशा युवा कलाकारांच्या थक्क करणाऱ्या कलाविष्कारांची मेजवानी शनिवारी (ता. ५) रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.
निमित्त होते ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) तर्फे झालेल्या ‘यिन कला महोत्सवाचे.’ प्रसिद्ध गायक अवधूत गांधी, सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी आणि ‘पीसीईटी’चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते महोत्सवाचे शानदार उद्घाटन झाले आणि कला महोत्सवाला हर्षोल्हासात सुरवात झाली.
आकुर्डीतील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे महाविद्यालय प्रांगण व सभागृह अशा विविध ठिकाणी एकाच वेळी वेगवेगळ्या कलाप्रकारांच्या स्पर्धा झाल्या. या दोन दिवसीय स्पर्धेतील पहिल्या दिवशी शनिवारी विविध कला प्रकारांच्या २१ स्पर्धांना महाविद्यालयीन युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ‘पीसीईटी’चे डिजिटल मार्केटिंग प्रमुख डॉ. केतन देसले, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक जयंत जाधव, ‘यिन’चे वरिष्ठ व्यवस्थापक श्यामसुंदर माडेवार, ‘यिन''चे सहायक व्यवस्थापक अनिकेत मोरे उपस्थित होते.
या स्पर्धेत सहभागाविषयी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. टाळ्या, शिट्यांच्या स्वरूपात प्रेक्षकांची दाद मिळत होती. अगदी पहिल्या सादरीकरणापासून असलेला उत्साह अखेरच्या सादरीकरणापर्यंत कायम होता. त्यांनी घेतलेली मेहनत सादरीकरणात झळकत होती. स्पर्धकांनी विविध नृत्य शैलीत नृत्य सादर करताना परीक्षकांसह उपस्थित रसिकांचे लक्ष वेधले. परंतु, सर्वाधिक सादरीकरण हे लावणी नृत्य प्रकारातील राहिल्याने या मराठमोळ्या लोककलेची लोकप्रियता तरुणाईतही असल्याचे अधोरेखित झाले.
दुपारच्या सत्रात ‘यिन’ कला महोत्सवात समूहनृत्य, स्कीट सादरीकरण, एकपात्री अभिनया स्पर्धेसोबतच फॅशन शोचा जलवा बघायला मिळाला. प्रत्येक स्पर्धक विद्यार्थ्याने आपल्यातील कुशलतेचे दर्शन घडविल्याने परीक्षकांना विजेत्यांची निवड करण्यात कस लागला, तर कलाविष्कारांचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विशेषतः नृत्य आणि गायन स्पर्धेतील सादरीकरण पाहण्यासाठी सभागृहात गर्दी झाली होती. या वेळी एकल नृत्य प्रकारात बॉलिवूड, हिपहॉप या नृत्य शैलींतूनही स्पर्धकांनी सादरीकरण केले.
प्रभरंजन नलावडे याने सूत्रसंचालन केले. पिंपरी चिंचवड ‘यिन’ समन्वयक अक्षय बर्गे यांनी संयोजन केले.
आज पारितोषिक वितरण
रविवारी (ता. ६) सायंकाळी पाचला पीसीईटी सभागृहात महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी पाहुण्यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होईल. सर्वच स्पर्धकांनी दमदार सहभाग नोंदविला असल्याने बक्षीस कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोट
‘‘सकाळ’च्या ‘यिन’ कला महोत्सवाच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले असून, त्यातून चांगले कलाकार तयार होतील. मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या महोत्सवाची उंची वाढत आहे.’’
-डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी)
‘‘कला तुम्हाला जगायला मदत करते. नैराश्यातून बाहेर काढते. कलेतून आत्मिक आनंद मिळतो. ‘सकाळ’च्या कला महोत्सवामुळे तरुणाईची ऊर्जा पहायला मिळाली. अशा महोत्सवाची आज गरज आहे. पण आपण पंधरा सेकंदाच्या ‘रिल्स’ आणि ‘पोस्ट’मध्ये अडकून पडत आहोत. कुणाच्या तरी वाक्यावर मिमिक्री सादर करणे याला खरी गुणवत्ता म्हणत नाहीत.’’
-प्राजक्ता माळी, सिनेअभिनेत्री
‘यिन’ कला महोत्सवातील स्पर्धांमधून यश मिळवणारी तरुणाई वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमावेल . तरुणांनी ‘सकाळ’तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या संधीचे सोने करावे. तरुणाईचे मनोबल उंचावण्यासाठी ‘सकाळ’तर्फे विविध उपक्रम होतात. मुलांनी बॉलिवूड, हिपहॉप या नृत्य शैलीबरोबरच पारंपारिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.’’
अवधूत गांधी, संगीतकार - गायक
फोटोः 52262, 52263, 52264, 52265, 52266, 52268
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.