पुणे, ता. ३ ः बक्षीस मिळण्याची आतुरता, टाळ्यांचा कडकडाट, आनंद व उत्साह या भावविश्वात विद्यार्थ्यांसह, शिक्षक आणि पालकही मग्न झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर यशाचा व कृतार्थतेचा भाव दिसत होता. काहींना पहिल्यांदा तर काहींना सलग दुसऱ्या वर्षी बक्षीस मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ एनआयई’ व एम-टेक इंजिनिअर्स पुणे यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे.
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या लेखन कौशल्याला वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने ‘असा साधला संवाद’ या अनुभव कथन स्पर्धेचे आयोजन शिक्षकांसाठी केले होते. तर, ‘अशी झाली फजिती’ या विनोदी लेखन स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी केले होते. त्याचे पारितोषिक वितरण ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात जल्लोषात झाले. या वेळी विविध जिल्ह्यांतील विजेते स्पर्धक शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना एम टेक इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक मनीष कोल्हटकर, ‘सकाळ’चे सरव्यवस्थापक (युनिट हेड) रूपेश मुतालिक, सरव्यवस्थापक (जाहिरात) उमेश पिंगळे, सहयोगी संपादक महेश बर्दापूरकर, सुरेंद्र पाटसकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थी व शिक्षकांच्या लेखन कौशल्याला वाव मिळावा, या हेतूने दरवर्षी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सहभागी स्पर्धकांमधून गटनिहाय सर्वोत्तम लेखनाची निवड केली. ‘सकाळ एनआयई’तर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. लेखन स्पर्धा ही या उपक्रमाचा एक भाग होती. नागपूर, अमरावती, ठाणे, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, सांगली, अकोला, परभणी या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेत आपले अनुभव शब्दबद्ध केले होते. ‘सकाळ एनआयई’चे व्यवस्थापक विशाल सराफ यांनी सूत्रसंचालन केले. सुमीत जाधव व पियुष ताकसांडे यांनी संयोजन केले.
‘‘विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनविता सर्वांगिण विकास करणाऱ्या अशा उपक्रमांत पालकांनी आवर्जून सहभागी होण्यास प्रवृत्त केले पाहिजे. लेखन व वाचन कौशल्याला वाव देणाऱ्या उपक्रमामुळे भावी पिढीला त्याचा नक्कीच उपयोग होत आहे. शिक्षकांमुळे विद्यार्थी घडत असतात. परिघाबाहेर जाऊन विद्यार्थ्यांशी राज्यभरातील शिक्षकांनी साधलेला संवाद, हा खरोखरच प्रेरणादायी आहे. ‘सकाळ एनआयई’च्या माध्यमातून त्यांना व्यक्त होण्याची संधी या स्पर्धांमुळे मिळाली आहे. वाचन व लेखन कौशल्ये विकसित करणाऱ्या अशा स्पर्धात्मक उपक्रमांची आवश्यकता आहे. सहभागी सर्वंच शिक्षक व विद्यार्थ्यांना यामुळे प्रोत्साहन मिळाले. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या या स्पर्धेत आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली, त्यांचा मनस्वी आनंद आहे.
- मनीष कोल्हटकर, व्यवस्थापकीय संचालक, एम-टेक इंजिनिअर्स, पुणे
फोटोः 05692, 12085
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.