पिंपरी, ता. २१ : भोसरी विभागीय कार्यालयातील अधिकारी आणि तळवडे शाखा अभियंता यांनी संगनमताने चाळीस घरगुती व व्यापारी वीज जोड दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘महावितरण’ची मंजुरी नसताना हे जोड दिले आहेत. त्यापोटी प्रती जोड निर्धारित रक्कम भरून न घेता कमी शुल्कात वीज जोड दिले. त्यामुळे ‘महावितरण’चे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत हे प्रकरण उघडकीस आले आहे.
‘महावितरण’च्या भोसरी विभागीय कार्यालयाकडून तळवडे येथील एका इमारतीच्या ४० घरगुती व व्यापारी वीज जोडणीसाठी १२७ केव्ही वीज भार मंजूर करण्यात आला. त्यासाठी ‘महावितरण’च्या एएससी योजनेतंर्गत १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवून त्याठिकाणी २०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. परंतु ट्रान्सफॉर्मरचे काम प्रलंबित असताना तळवडे शाखा अभियंता यांनी मर्जीतील ठेकेदाराला पोसण्यासाठी परस्पर ४० घरगुती व व्यापारी जोड कोटेशन अर्जदाराला भरायला सांगितले. त्यामध्ये नियमाप्रमाणे आठ हजार २३० रुपये सेवाशुल्क घेणे अपेक्षित असताना प्रती जोड एक हजार ८४० इतके शुल्क ग्राहकाकडून भरून घेतले.
मर्जीतील ठेकेदाराला पोसण्यासाठी अधिकारी, शाखा अभियंता यांनी संगनमताने ‘महावितरण’चे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सचिव नितीन बोंडे यांनी केला आहे. बोंडे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत हे प्रकरण उजेडात आणले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व अभियंते यांच्यावर फौजदारी खटले दाखल करावेत. या अधिकारी व अभियंता यांना ‘महावितरण’ सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही बोंडे यांनी केली आहे.
ट्रान्सफॉर्मर प्रत्यक्ष जागेवर बसविलाच नाही
प्रति जोड तीन के.डब्लू. लोडनुसार कोटेशन देणे आवश्यक असताना केवळ एक के.डब्लू. इतका लोड दाखवून सुरक्षा ठेव प्रती घरगुती कनेक्शन एक हजार पाचशे रुपये घेतली. नियमानुसार तीन के.डब्लूसाठी प्रती जोड चार हजार पाचशे इतकी सुरक्षा ठेव घेणे आवश्यक असताना त्यांनी जाणीवपूर्वक कमी भरणा करून घेतला. शिवाय बारा व्यापारी वीज जोड देण्याकरिता तीन केडब्लूसाठी नऊ हजार तीनशे इतकी सुरक्षा ठेव भरून घेणे आवश्यक असताना केवळ तीन हजार शंभर रुपये इतकी सुरक्षा ठेव भरून घेतली. यावरुन तळवडे शाखा अभियंता यांनी मर्जीतील ठेकेदारासोबत संगनमत करून चाळीस जोड देण्यासाठी चार लाख चौदा हजार इतकी कमी रक्कम आकारून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केले. शिवाय अंदाजपत्रकानुसार दोनशे केव्हीए एनएससी ट्रान्सफॉर्मर प्रत्यक्ष जागेवर बसविण्यात आलेला नाही, अशी माहिती बोंडे यांनी दिली.
पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी संचालक हे २५ लाखांपेक्षा जास्त अंदाजपत्रकाची तपासणी करण्यास सांगत आहेत. स्वखर्चाने केलेल्या एक पूर्णांक तीन टक्के कामाची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांना पाठवत आहेत. वास्तविक कुठल्याही प्रादेशिक कार्यालयात असा नियम अस्तित्वात नाही. पुणे प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तीन झोनपैकी केवळ पुण्यातच मनमानी पद्धतीने चुकीचे नियम लावून कामे केली जात आहेत.
- संतोष सौंदणकर, पिंपरी-चिंचवड शहर संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
‘‘या संदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. त्याची चौकशी त्वरित सुरू केली जाईल.’’
- निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.