बारणे, वाघेरे म्हणतात, ‘मीच विजयी होणार’
मावळ लोकसभा मतदारसंघात निकालापूर्वीच विजयाचे दावे; निकालाबाबत उत्सुकता
पिंपरी, ता. २१ : मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी झालेल्या मतदानानंतर महायुतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे व महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात लढत झाली. येत्या चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. परंतु तत्पूर्वीच बारणे व वाघेरे या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा मंगळवारी (ता. २१) केला.
अडीच लाखांनी विजयी होणार : बारणे
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीला प्रतिसाद चांगला होता. त्यामुळे मतदारांचा कौल माझ्या बाजूने राहणार असून, मी अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा महायुतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
बारणे म्हणाले, ‘‘मी निवडणुकीनंतर मतदानाचा अंदाज २००९, २०१४ व २०१९ च्या निवडणुकीनंतरही सांगितला होता. मागीलवेळी माझ्या अंदाजापेक्षा जादा मते मिळाली पण कमी नाही. घाटाखाली उरणमध्ये आमदार महेश बालदी यांनी चांगले काम केले व मतदान बाहेर काढले. त्यामुळे तेथे मतदान जादा झाले आहे. पिंपरी, चिंचवड व पनवेल आदी शहरी भागात उन्हामुळे मतदार कमी प्रमाणात बाहेर पडले. कर्जत व पनवेलला पावसामुळे परिणाम झाला. त्यामुळे त्या भागात मतदान टक्केवारी कमी झाली.
अजित पवार व भाजपने काम केले
महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार यांनी प्रामाणिकपणे आमदार, कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही प्रामाणिकपणे काम केले. मतदारसंघातील सहाही आमदारांनी चांगले काम केले. विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने आरोप करून क्लिप व्हायरल केल्या. परंतु त्यात तथ्य नव्हते. मीही मराठा असल्याने व अनेकवेळा आंदोलनात सहभागी झाल्याने त्याचा माझ्या मतदारसंघात काही परिणाम झाला नाही. देशाची निवडणूक असल्याने नातेवाईक, गाववाले व बाहेरचे असे पाहणे चुकीचे आहे, असे सांगताना ‘मी काही बीड, उस्मानाबादहून आलो नाही’ असे म्हटले होते, तीही क्लिप चुकीच्या पद्धतीने व्हायरल केली. मला कधीही कमळ चिन्हावर लढायचे नव्हते. मी सुरुवातीपासून शिवसेना व धनुष्यबाणावर लढण्यासाठीच आग्रही होतो, असे बारणे यांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
--------------
दोन लाखांचे मताधिक्य मिळणार : वाघेरे
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात केंद्रातील भाजपच्या सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल व महायुतीच्या उमेदवाराबाबत असलेल्या नाराजीमुळे महाविकास आघाडीला वातावरण चांगले होते. त्यामुळे पावणे दोन ते दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केला.
वाघेरे म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीमुळे मतदारांचा कौल महाविकास आघाडीच्याच बाजूने होता. लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. कोणी काहीही करा, लोकांनी एकदा ज्याला मत द्यायचे ठरविले तर ते त्यालाच देतात. चांगल्या मताधिक्याने विजयी होण्यात मला काहीच अडचण नाही. पिंपरी, चिंचवड व वडगाव मावळ विधानसभा मतदारसंघात मशाल चिन्हाला एकतर्फी मतदान होईल.
बारणे यांच्याबद्दल नाराजी
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी खासदारकीच्या दहा वर्षांच्या काळात काहीच ठोस काम केले नाही. लोक म्हणतात आम्ही दहा वर्षात त्यांना बघितलेही नाही. घाटाखाली व घाटावर हीच नाराजी त्यांच्यावर होती. शिवसेना शिंदे गटाचे किती कार्यकर्ते व मतदार आहेत, असा प्रश्न करून वाघेरे म्हणाले, ‘‘कर्जतमध्ये त्यांनी फेरमतदानाची मागणी केली, याचा अर्थ त्यांना मताधिक्याची
शाश्वती नाही. पनवेलला साधे पासपोर्ट कार्यालय बारणे सुरू करू शकले नाहीत, तेथे दोन दिवसाआड पिण्याचे पाणी येते. पनवेलला ते हॅास्पिटल सुरू करू शकले नाहीत. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला ते देऊ शकले नाहीत. नयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत, असे साधे साधे प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. त्यामुळे त्याबद्दलची त्यांच्यावर खूप नाराजी होती. त्याचा फायदा आम्हाला होईल. फॉक्सकॉनसारखा प्रकल्प मावळातून गुजरातला जाताना त्यांनी साधा विरोध केला नाही, तो प्रकल्प ते थांबवू शकले नाहीत. माझी पाटी कोरी होती व मी सर्वसामान्यांमध्ये राहिल्याने त्याचा फायदा मला होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.