वर्धापन दिन लेख
---
पाणी नियोजन
काळाची गरज
पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बांधकामेही वाढत आहेत. आगामी काळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांचा एकत्रित विचार करून वाढणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी आरक्षण करणे गरजेचे आहे. आताच योग्य पावले उचलणे आवश्यक आहे.
- प्रवीण लडकत, निवृत्त सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
पिं परी-चिंचवड शहरासाठी १९९१ पर्यंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा करण्यात आला. १९९१ मध्ये महापालिकेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. यामध्ये पवना नदीतील पाणी रावेत येथून उचलून निगडीतील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून संपूर्ण शहराला पुरवठा करण्यात येत होता. या योजनेअंतर्गत ११४ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र उभारला. कालांतराने शहराची जसजशी वाढ होत गेली. तसतशी टप्याटप्याने विविध योजना कार्यान्वित झाल्या. शहराची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आंद्रा व भामा-आसखेड हे प्रकल्प हाती घेतले. या प्रकल्पामुळे शहरासाठी २६७ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत आंद्रा धरणातील १०० दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. भामा आसखेड धरणातील १६७ दश लक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या प्रकल्पांमुळे शहराचे पूर्वेकडील भाग तळवडे, चिखली, मोशी वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी, बोपखेल या भागांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
भौगोलिक रचना
शहराची भौगोलिक रचना उंच सखल भागांचा विचार करून संपूर्ण शहराची ५२ जल क्षेत्रात विभागणी झाली आहे. १२५ पेक्षा अधिक पाण्याच्या उंच टाक्या बांधल्या आहेत. त्या भरण्यासाठी सुमारे १२२ किलोमीटर लांबीच्या मुख्य जलवाहिन्या व २४०० किलोमीटर लांबीच्या वितरण नलिका टाकल्या आहेत. सुमारे दीड लाख नळजोडमधून पाणीपुरवठा होत आहे.
लोकसंख्या वाढ
पिंपरी चिंचवड शहराची देशातील तिसऱ्या क्रमांकाचे वेगाने वाढणारे शहर म्हणून ओळख आहे. अशाप्रकारे अत्यंत वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी पाण्याचे नियोजन हे नेहमीच आव्हानात्मक ठरले आहे. शहराची २०४१ ची लोकसंख्या सुमारे ६० लक्ष इतकी होण्याची शक्यता गृहीत धरून वाढीव पाण्याच्या स्त्रोताचा विचार करणे गरजेचे आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहता पाणी पुरवठ्यासाठी तत्कालीन राज्यकर्ते व प्रशासन यांनी सकारात्मक प्रयत्न केलेले आहेत. भविष्यात देखील अशा प्रयत्नांबरोबरच लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे.
स्काडा प्रणाली
शहराला उपलब्ध होणारे पाणी, प्रत्येक पाण्याच्या मुख्य जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह मोजण्यासाठी व प्रत्येक पाण्याच्या टाकीतील पाण्याची पातळी, पाण्याचा प्रवाह व दाब मोजण्यासाठी तसेच जलशुद्धीकरणातील केंद्रातील व शहरातील विविध भागातील पाण्याची गुणवत्ता कळण्यासाठी स्काडा प्रणालीचा योग्य प्रकारे वापर केला आहे. शहरातील संपूर्ण वितरण पाणीपुरवठासाठी स्काडा प्रणालीचा कार्यक्षम पद्धतीने वापर करणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे.
पाण्याची गुणवत्ता
पाण्याचे अचूक पद्धतीने मोजमाप होण्यासाठी व बेहिशोबी पाणी कमी करण्यासाठी संपूर्ण शहरातील घरगुती व बिगर घरगुती नळजोडांना पाण्याचे मीटर बसविले आहेत. त्यामुळे प्रत्येक जलक्षेत्रातील पाणीपुरवठा व बेहिशोबी पाण्याचे प्रमाण निश्चित करणे शक्य झाले आहे. शहरातील नागरिकांना मानांकानुसार सर्व्हिस लेव्हल बेंचमार्कनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्णत्वास आहेत. ही योजना कार्यान्वित झाल्यास पाण्यामध्ये बचत होणार असून, पाण्याची गुणवत्ता ही उच्चदर्जाची
राहणार आहे.
पाण्याची उपलब्धता
शहराचा विचार करता उत्तर व पूर्वेकडील बाजूने इंद्रायणी नदी, मध्य भागातून पवना नदी व दक्षिणेकडील बाजूने मुळा नदी वाहत आहे. यामुळे संपूर्ण शहर हे पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या खोऱ्यामध्ये विभागलेले आहे. पाणी नियोजन करताना या तीनही नदी खोऱ्यांचा विचार करणे गरजचे आहे. पवना धरणातील पाणी आरक्षणावर २०२२ पर्यंत पाण्याची गरज भागत होती. त्यानंतर इंद्रायणी खोऱ्यातील आंद्रा धरणातून पाणी उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. येत्या एक-दोन वर्षांत भामा-आसखेड धरणामधील १६७ दशलक्ष लिटर प्रतिदिन इतके पाणी उपलब्ध होणार आहे.
भविष्याचा विचार
भविष्याचा विचार करता मुळा नदीवरील मुळशी धरणातून शहरासाठी पाणी उपलब्ध होणे गरजेचे असून, त्यावर मुळा नदी खोऱ्यातील शहरातील भागासाठी नियोजन करणे शक्य होईल. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा (ज्यामध्ये कधीही वाढ होणार नाही) व शहराची वाढणारी लोकसंख्या याचा विचार करता धरणाव्यतिरीक्त इतर मार्गांनी पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने भूजल साठ्याचे मॅपिंग करून भूजल साठा वाढविणे व भूजल साठ्याचा योग्य वापर करणे अत्यावश्यक आहे.
अतिरिक्त पाणी
महापालिकेने गेल्या १५-२० वर्षांपासून पाऊस पाणी संकलन, पाण्याचा पुनर्वापर यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. पवना धरणाचे मजबुतीकरणाचे काम व पवना धरण ते निगडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंद जलवाहिनीच्या प्रकल्पाचे काम गेली सतरा-अठरा वर्षे बंद स्थितीत आहेत. शहरासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणे व अत्यंत चांगल्या गुणवत्तेचे पाणी उपलब्ध होण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
निधीची आवश्यकता
शहरातील पाण्याचे नियोजन करताना धरणातील पाणी आणणे, जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करणे, मुख्य जलवाहिन्या टाकणे, पाण्याच्या उंच टाक्या बांधणे, वितरण व्यवस्थेत सुधारणा करणे, प्रत्येक नळजोडासाठी मीटर बसविणे व स्काडा प्रणालीसाठी यंत्रणेची उभारणी करणे, यासारखे प्रकल्प राबविताना फार मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती. शहराची ही गरज केंद्रशासन व राज्यशासनाच्या योजनांमुळे पूर्ण झाली. भविष्यात देखील पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये सुधारणा करणे, प्रत्येक जलक्षेत्रामध्ये पाण्याचे काटेकोरपणे मोजमाप करून अतिरिक्त पाणी वापरावर नियंत्रण आणणे यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. यासाठी केंद्रशासन व राज्यशासन यांनी या शहरासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा लागेल.
पाण्याची मागणी वाढली
पिंपरी चिंचवडमध्ये गृहसंकुलांचे (सोसायटी) प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे व यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढत आहे. गृहसंकुलामधील प्रत्येक सदनिकाधारकास मीटरने पाणीपुरवठा करणे व गृहसंकुलासाठी मानांकनानुसार पाणी देणे आवश्यक आहे. शहरातील सर्व घरगुती व बिगर घरगुती नळजोडांना मीटर बसविले आहेत व टेलिस्कोपिक पद्धतीने पाणीदराची आकारणी केली जाते. असे असून देखील पाण्याचा वापर मानांकापेक्षा खूपच जात प्रमाणात होताना दिसतो. शहरात एकूण वीस मैलाशुद्धीकरण प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्प इंद्रायणी व मुळा नदीच्या खोऱ्यात येतात. या प्रत्येक मैलाशुद्धीकरण केंद्रातील पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी उद्यानासाठी, सोसायटींना वापरणे शक्य होईल.
पाण्याचे योग्य नियोजन
शहरामध्ये एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२२ मध्ये लागू झाल्यामुळे चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) एक वरून २.५ ते ४ पर्यंत वाढलेला आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सेक्टर क्रमांक एक ते ४२ मध्ये एक चटई क्षेत्र निर्देशांक गृहीत धरून पाणीपुरवठ्याचे नियोजन केलेले होते. ते आता कालबाह्य झालेले आहे. कारण ज्या ठिकाणी आतापर्यंत बंगले होते. त्याच ठिकाणी बहुमजली इमारती होत आहे. जिथे बांधकामासाठी एक एफएसआय वापरत होते. तिथे चार एफएसआयप्रमाणे बांधकामे सुरू आहेत. साहजिकच या भागातील लोकसंख्या चार पटीने वाढणार आहे. पर्यायाने पाण्याची मागणी देखील चार पटीने वाढणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे.
(शब्दांकन ः मंगेश पांडे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.