पिंपळे सौदागरमध्ये बेकरी मालकाला
मारहाण करून दहशत माजवली
पिंपरी : टोळक्याने बेकरी मालकाला मारहाण करत ४० हजार रुपयांची रोकड लुटून दहशत निर्माण केली. ही घटना पिंपळे सौदागर येथील जगताप नगर येथे घडली. या प्रकरणी सादिक अन्सारी (रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यश दुर्गे आणि सुमीत पुरी (दोघेही रा. पिंपळे सौदागर) या दोन आरोपींना अटक केली आहे. तर इतर चार अज्ञात साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी अन्सारी हे बेकरीचा व्यवसाय असून, आरोपी त्यांच्या बेकरीत शिरले. त्यांनी दहशत निर्माण करीत अन्सारी यांना दमदाटी केली. आरोपी यश याने कोयत्याने अन्सारी यांच्यावर कोयत्याने वार केले. तर इतर आरोपींनी त्यांना दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर बेकरीमध्ये तोडफोड करून हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण करीत ४० हजारांची रोकड लुटली.
बनावट बँक खात्याची माहिती देत फसवणूक
पिंपरी : हिंजवडी येथील एका कंपनीला बनावट ईमेल पाठवून मटेरियलचे १ लाख ३२ हजार ६५० रुपये घेत फसवणूक केली. या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या कंपनीला मटेरिअल पुरवणाऱ्या पुरवठादार कंपन्यांचे पैसे पाठवण्यासाठी अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या कंपनीला एका मेलद्वारे बनावट बँक खाते दिले. त्या बँक खात्यावर दोन पुरवठादार कंपन्यांचे पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांच्या कंपनीने संबंधित बँक खात्यावर एक लाख ३२ हजार ६५० रुपये पाठवले. ही रक्कम पुरवठादार कंपन्यांना मिळाली नसल्याची बाब काही दिवसांनी उघडकीस आली.
बांधकाम कार्यालयात राडा; महिलेवर गुन्हा
पिंपरी : एका कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात एका महिलेने जबरदस्तीने शिरून तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धमकावले. ही घटना दत्तनगर चिंचवड येथे घडले. प्रकरणी किशन नागवेकर (रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे दर्वेश कन्स्ट्रक्शन कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करतात. ते त्यांच्या कामावर असताना आरोपी महिला तिथे आली. तिने किशन आणि त्यांच्या मालकाला शिवीगाळ करून धमकी दिली. जबरदस्तीने कार्यालयात शिरून सर्वांना शिवीगाळ केली.
गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई पुनावळे येथे करण्यात आली. संतोष देवराम कांबळे (रा. भीमनगर, तळवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुनावळे येथील दर्शले चौकाजवळ एकजण गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संतोष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६१ हजार ७०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
जाहिरात लावल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी जाहिरात फलक उभारून शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई बावधन, पाषाण रोड येथील बावधन पोलिस चौकीसमोर करणात आली. या प्रकरणी पुणे महापालिकेचे परवाना निरीक्षक नीलेश घोलप यांनी याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हे फलक लावणाऱ्यावर गुन्हा केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.