पिंपरी, ता. १८ ः अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील भैरवगड आणि घनचक्कर गडावर फ्रेंडस ट्रेकिंग क्लबची ११९ वी गिरीदुर्ग भ्रमंती मोहीम यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. अवघ्या तीन वर्षांच्या आयुष रहाणे, अनन्या बालघरे, राही जाधव आणि चिरायू बर्गे या बालवीरांपासून भगवान खेडेकर (वय ७५) या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सह एकूण ८५ सदस्यांनी मोहिमेत भाग घेतला होता.
क्लबचे अध्यक्ष वसंत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. अतिशय दुर्गम अशा शिरपुंजे गावापासून सकाळी साडेसहा वाजता मोहिमेला सुरुवात झाली. घनचक्कर आणि भैरवगड यांच्यामधील घळीतून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ११४९ मीटर इतकी आहे. घनचक्कर हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर म्हणून गणले जाते. वन विभागाने तेथे आता संपूर्ण दोन्ही गडांवर लोखंडी सुरक्षा कठडे बसविलेले आहेत. किल्ल्यावरील गुहेमध्ये भैरवाचे मंदिर आहे. गडावर पाणी आणि निवाऱ्यासाठी गुहा आहेत. गडावरून कळसूबाई रांग, हरिचंद्र गड, कलाड गड, कुंजीर गड तर घनचक्करवरून कळसुबाई, रतनगडाचा खुंटा, आजोबागड तसेच भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्राचा नयनरम्य परिसर दिसतो.
शाहीर जयसिंग कांबळे यांनी घनगडावर शिवरायांच्या जीवनावरील पोवाड्याचे सादरीकरण करत सर्वांच्या अंगावर वीरश्रीचे रोमांच उभे केले. रविवारी रात्री अकरा वाजता घरी सर्वजण सुखरूप पोहोचले.
मोहिमेसाठी कालिदास सूर्यवंशी, सुहास आढाव, रमेश ससाणे, रावसाहेब कडूस, देविदास गिरमे, शिवाजी नाईकरे, पुंजाजी तळेले, धैर्यशील दगडे, शशिकांत कुलकर्णी, पांडुरंग खटावकर, संजय दुर्वे, संगीता कुलकर्णी, डॉ. लता ससाणे, डॉ. राखी बांगर, संगीता आरगडे, जयश्री पाखरे, अंजली खटावकर आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
PNE25U98897
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.