गुंतवणुकीवर जादा परताव्याचे
आमिष दाखवून ९७ लाखांची फसवणूक
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका नागरिकाची ९७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना थेरगाव येथे घडली. अदविका शर्मा आणि राकेश जैन यासह विविध बँक खातेदारांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुनील श्रीपती झेंडे (रा. थेरगाव) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादीशी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधत त्यांना शेअर ट्रेडिंग ग्रुपमध्ये घेतले. त्यामध्ये १० ते १५ टक्के नफ्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादीस एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगून विविध बँक खात्यात पैशांचे व्यवहार करण्यास प्रवृत्त केले. अॅपमध्ये खोटा नफा दाखवून तो काढण्यासाठी पुन्हा रक्कम भरण्यास सांगितले. मात्र गुंतवलेले पैसे व परतावा न देता फिर्यादीची एकूण ९७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली.
वाकडमध्ये बेकायदा पिस्तूल जप्त
पिंपरी : बेकायदा पिस्तूल व काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली.
अभिषेक ऊर्फ नंदू दिलीप कांबळे (रा. वाकड गावठाण, मूळ रा. वालचंदनगर, ता. बारामती) असे आरोपीचे नाव आहे. वाकड येथील रोहन तरंग सोसायटीजवळील मोकळ्या मैदानात आरोपी संशयितरीत्या थांबलेला दिसून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि काडतूस सापडले.
तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक
पिंपरी : तडीपार केलेले असतानाही हद्दीत आलेल्या गुंडाला बेकायदा पिस्तूल आणि काडतुसासह काळेवाडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई थेरगाव मधील जगताप नगर परिसरात करण्यात आली. शंतनू ऊर्फ आदित्य दिनेश गायकवाड (रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले आहे. तरीही तो शहरात आला. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे बेकायदा पिस्तूल व काडतूस सापडले.
कोयता बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : बेकायदा कोयता जवळ बाळगणाऱ्या एकावर दापोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दापोडी येथे करण्यात आली. जफरोद्दीन नासिर खान (रा. दापोडी) असे गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडील कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.