पिंपरी-चिंचवड

माय फ्रेंड श्रीगणेशा चार

CD

माय फ्रेंड श्रीगणेशा चार ः पीतांबर लोहार
--
वेदप्रतिपाद्या

ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या।
जय जय स्वसंवेद्या। आत्मरुपा।।
देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी॥
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउलींनी श्रीज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात श्री गणरायाचे वर्णन केलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या प्रथम वीस ओव्यांमध्ये गणपतीचे वर्णन आपल्याला आढळते. ते म्हणजे, ‘ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरुपा।।..., असे सांगून कीर्तनकार महाराज म्हणाले, ‘माउली म्हणतात, सर्वांच्या आरंभी ॐ असलेल्या गणपतीला माझे नमन असो. वेदप्रतिपाद्या म्हणजे वेदांचा प्रतिपाद्य विषय असलेल्या गणपतीला माझे नमन असो’ अशा या गणपतीला माउलींनी सुद्धा नमन केले आहे. कारण, वेदप्रतिपाद्या असा गणपती आहे. आपल्या ग्रंथांमध्ये चार प्रकराचे वेद आणि अठरा पुराणे सांगितली आहेत. ते चार वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. यामध्ये ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. त्याला महत्त्वाचा वेद मानले आहे. या वेदामध्ये विविध देवतांच्या स्तुतीसाठी मंत्र आणि ऋचा सांगितल्या आहेत. त्यानंतर येतो यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये यज्ञ आणि त्यासंबंधीच्या विधींचे वर्णन केलेले आहे. म्हणजे यज्ञ करताना म्हणायच्या मंत्रांचा समावेश यजुर्वेदामध्ये आहे. तिसरा वेद आहे सामवेद. सामवेदामध्ये संगीताशी संबंधित माहिती आहे. शिवाय, ऋग्वेदामध्ये नमूद मंत्रांचे गायन कसे करावे? यासाठी नियम आणि पद्धती सामवेदामध्ये सांगितल्या आहेत आणि चौथ्या क्रमांकावर येतो अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये औषधी आणि सांसारिक गोष्टींशी संबंधित माहिती आहे. अनेक मंत्र आणि स्तोत्रांचा समावेश सामवेदामध्ये आहे. ही स्तोत्र दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय म्हणून वापरली जातात. म्हणजे एकूण वेद किती? किती?’ कीर्तनकार महाराजांनी श्रोत्यांना विचारले.
श्रोत्यांनी सामूहिकपणे उत्तर दिले, ‘चारऽऽऽ’.
म्हणजे एकूण वेद चार
या चारही वेदांचा प्रतिपाद्य विषय म्हणजे गणपती आहे.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
चारही वेदांचा प्रतिपाद्य विषय म्हणजे गणपती आहे. म्हणजे तो स्वतःच स्वतःला ज्ञेय आहे. म्हणजेच गणपती हा स्वयंभू आहे. आत्मरूप आहे. अशा गणपतीला माउलींनी सर्वप्रथम नमन केले आहे. वारंवार जयजयकार असो, असे म्हटले आहे. शिवाय, तूच सर्व प्रकारच्या अर्थांना प्रकाश देणारा श्रीगणेश आहे, असेही म्हटले आहे.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
माउलींनी आणखी शब्दप्रयोग गणपतीविषयी योजला आहे. तो म्हणजे ‘सकलार्थमतिप्रकाशु’. गणपती हा ‘सकलार्थमतिप्रकाशु’ आहे. म्हणजे सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश असलेली देवता म्हणजे गणपती आहे. पुढे माउलींनी श्रीनिवृत्तीनाथांचा शिष्य म्हणून मी तुझा म्हणजे गणपतीचा जयजयकार करीत आहे, असेही म्हटले आहे. म्हणजेच माउलींनी गणपतीला ‘देवा’ म्हणून संबोधले आहे.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
गणपतीला देवा म्हणून संबोधणारे माउली पुढे म्हणतात,
हें शब्दब्रह्म अशेष। तेचि मूर्ति सुवेष।
तेथ वर्णवपु निर्दोष। मिरवत असे॥
म्हणजेच, चारही वेद हे शब्दब्रह्म अशेष म्हणजे साक्षात गणेशमूर्ती आहे. या वेदांमधील शब्दयोजना निर्दोष आहे. म्हणूनच गणेशमूर्ती शोभून दिसते.
स्मृति तेचि अवयव। देखा अंगीकभाव।ऽऽ
तेथ लावण्याची ठेव। अर्थशोभा॥ऽऽऽ
अष्टादश पुराणें। तींचि मणिभूषणें।ऽऽ
पदपद्धती खेवणें । प्रमेयरत्नांचीं।।ऽऽऽ
माउली पुढे म्हणतात, जसे चारवेद हे गणपतीचे अशेष आहेत, तसे अठरा पुराणे ही गणरायाची आभूषणे आहेत. आता अठरा पुराणे म्हणजे कोणती? असा प्रश्न कीर्तनकार महाराजांनी विचारला.
त्यावर काही श्रोत्यांनी सांगायला सुरुवात केली. मत्स्य पुराण, भागवत पुराण, वामन पुराण....
कीर्तनकार महाराज म्हणाले, अगदी बरोबर. ही अठरा पुराणे म्हणजे मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्मांड पुराण, गरूड पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, वामन पुराण, अग्नि पुराण, वराह पुराण, वायु पुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, ब्रह्म पुराण आणि वाल्मीक पुराण. ही अठरा पुराणे म्हणजे गणपतीचे अलंकार आहेत.
आभूषणे आहेत. ती त्याला शोभून दिसतात, असे माउलींनी वर्णन केले आहे.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
अशा या गणरायाला, गणपतीला माउलींनी वेदप्रतिपाद्या, स्वसंवेद्या, आत्मरुपा, गणेशु, सकलार्थमतिप्रकाशु अशा विविध नावांनी संबोधले आहेत. तुम्हाला माहिती असलेली गणपतीची नावे सांगा बरं, कीर्तनकार महाराजांनी श्रोत्यांना विचारले.
श्रोते सांगू लागले, ‘गजानन, गणेश, विनायक, सिद्धिविनायक, गणराज’ त्यांना थांबवत महाराज म्हणाले, अगदी बरोबर गणपतीला आपण विविध नावांनी ओळखतो. यामध्ये विशेषतः गणेश, वक्रतुंड, लंबोदर, विनायक, गजानन, एकदंत, हेरंब, विघ्नहर्ता, सिद्धिविनायक आदी. आणखीही काही गणपतीची नावे आहेत, ती म्हणजे, धूम्रवर्ण, भालचंद्र, शूर्पकर्ण, विकट, विघ्नराजेंद्र, कृष्णपिंगाक्ष, मयुरेश्वर आदी.
आता, धूम्रवर्ण म्हणजे ज्याचा रंग धूसर किंवा धुक्यासारखा आहे, असा. भालचंद्र म्हणजे ज्याच्या कपाळावर चंद्र आहे असा. शूर्पकर्ण म्हणजे ज्याचे कान सुपासारखे आहेत असा. विकट म्हणजे ज्याचा आकार मोठा आहे असा. विघ्नराजेंद्र म्हणजे विघ्नांचा नाश करणारा राजा. कृष्णपिंगाक्ष म्हणजे ज्याचे डोळे तपकिरी रंगाचे आहेत असा. गजवदन म्हणजे ज्याचे तोंड हत्तीसारखे आहे असा. मयुरेश्वर म्हणजे ज्याचे वाहन मोर आहे असा. अशा विविध नावांनी गणपतीला आपण संबोधतो. त्याच गणरायाचा उत्सव आपण साजरा करणार आहोत. त्याचा प्रारंभ माझ्या कीर्तनरुपी सेवेने होत आहे, हे माझे मोठे भाग्य आहे.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २६ लाख लाभार्थी महिलांची सुक्ष्म छाननी; आदिती तटकरे यांची माहिती

Pune Ganeshotsav : ध्वनिक्षेपकाला परवानगी! यंदा सात दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ‘बजाव’

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

SCROLL FOR NEXT