पिंपरी, ता. ७ ः शहरातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदी साहित्य तातडीने हटवावे. अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी दिला.
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदी विरुद्ध योग्य कार्यवाही करण्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. त्यात त्यांनी कारवाईबाबत इशारा दिला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व क्षेत्रीय व संबंधित अधिकारी उपस्थित होते. अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या कमानी, मंडप, झेंडे, फलक याबरोबरच खासगी तथा सार्वजनिक जागेवर लावण्यात आलेले अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, फ्लेक्स, पोस्टर, किऑक्स, गॅन्ट्री आदींबाबत संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी योग्य ती कारवाई करावी, अशा सर्व कारवाईचे फोटोग्राफी, चित्रीकरण व पंचनामे करून ते संग्रही ठेवावे आदी सूचना आयुक्त सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कायदा काय सांगतो?
महाराष्ट्र राज्यातील मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९९५ चे कलम-३ तसेच महाराष्ट्र अधिनियमातील कलम २४४ (१) (२) (३), २४५(१) (२) आणि महापालिका आकाशचिन्ह तसेच जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण करणारे नियम नऊ मे २०२२ च्या अधिसूचनेनुसार तरतुदी निश्चित केल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदी उभारले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
- अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदींविरुद्ध संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करावी
- पर्यवेक्षणासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपआयुक्त यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहावे
- प्रत्येक प्रभागात अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदी अनधिकृत बाबींना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांची एक समिती संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्थापन करावी
- व्यापक जनजागृती करावी, अनधिकृतरीत्या उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकावर प्लास्टिक किंवा इतर अविघटनशील पदार्थाचा वापर केला असल्यास संबंधितांवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी
अशी असेल प्रक्रिया
- महापालिकेद्वारे संबंधित कार्यक्षेत्रामध्ये नविन जाहिरात फलक उभारणे, परवाना नूतनीकरण आदी प्रस्ताव संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडे दाखल केले जातील
- दाखल प्रस्तावांवर परवाना निरीक्षक स्थळपाहणी करून क्षेत्रीय अधिकारी स्थळ पाहणी अहवाल सादर करतील
- स्थळपाहणी अहवालानुसार प्रस्तावाची तपासणी करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रस्ताव आकाशचिन्ह व परवाना विभागप्रमुखांकडे मंजुरीसाठी सादर करतील.
हेल्पलाइन
- अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदींबाबत तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक ः ८८८८००६६६६
- एसएमएस आणि व्हॉटस अॅपसाठी क्रमांक ः ९८२३११८०९०
- सारथी हेल्पलाइन ः ०२०-६७३३३३३३ किंवा ०२०-२८३३३३३३
- छायाचित्रासह तक्रार दाखल करण्यासाठी संकेतस्थळ ः www.pcmcindia.gov.in
परवानाधारकांना सूचना
१) महापालिकेद्वारे होर्डिंग तसेच जाहिरातींचे फ्लेक्सवर परवाना क्रमांक, परवाना कालावधी, परवान्याचे ठिकाण आणि क्युअर कोड आदी ठळकपणे दिसेल अशा दर्शनी ठिकाणी संबंधित परवाना धारकास बंधनकारक आहे. याबाबत योग्य खातरजमा संबंधित अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांच्याद्वारे करण्यात येणार आहे.
२) महापालिका क्षेत्रात विविध कामांसाठी तसेच विविध सणांच्या दरम्यान तात्पुरते बूथ किंवा मंडप उभारण्याची परवानगी देतेवेळी त्यावर कुठलेही होर्डिग अथवा जाहिराती लावता येणार नाहीत. या अटीचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
३) कुठल्याही व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त किंवा कोणतेही कार्यक्रम किंवा सणानिमित्त लावलेले अनधिकृत जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर कार्यक्रमाच्या दिनांकापूर्वीच निष्कामित करावेत
४) शासनाने महापालिका आकाशचिन्हे आणि जाहिरात प्रदर्शनाचे नियमन व नियंत्रण करणारे नियम नऊ मे २०२२ रोजी जाहीर केले आहेत, त्यामधील तरतुदी सर्व संबंधितांस बंधनकारक आहेत.
- संबंधित जाहिरात फलकांबाबची परवाना, प्रक्रिया व विलंब शुल्क, तसेच त्यानुषंगिक इतर शुल्क आकारणी आदींबाबतची कार्यवाही आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.