पिंपरी, ता. २७ : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना नॉन क्रिमीलेअर दाखल्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने २१ दिवसांत ‘नॉन क्रिमीलेअर’ दाखला देण्याचा नियम केला असला, तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया हवेली प्रांत कार्यालयात अडकत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळ आणि त्रास सहन करावा लागत आहेत.
महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात व ‘नॉन क्रिमीलेअर’ दाखल्यांची सक्ती असते. तसेच विविध शासकीय नोकरदारांनाही या दाखल्याची आवश्यकता असते. त्यासाठी पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयात नागरिक अर्ज करत आहेत. महिन्याकाठी किती अर्ज दाखल होतात, या बाबत येथील अपर तहसीलदारही अनभिज्ञ आहेत. दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे अनेकांना महाविद्यालयीन प्रवेशाची अंतिम तारीख गाठण्यात अडचणी येत आहेत. काही विद्यार्थ्यांनी वेळेअभावी खासगी शिकवणी किंवा महाविद्यालयांची पर्यायी व्यवस्था शोधण्यास सुरुवात केली आहे. दाखल्यांसाठी अर्ज केल्यानंतर तहसील कार्यालयाकडून ती माहिती हवेली प्रांत कार्यालयाकडे पाठवली जाते. तेथून मंजुरी मिळाल्यावरच अंतिम प्रमाणपत्र नागरिकांना दिले जाते. मात्र, याच प्रक्रियेत विलंब होत असल्याने २१ दिवसांच्या नियमाचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.
दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- मागील तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला- अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता
गतिमान यंत्रणेची गरज
सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयात अनेकदा फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग वाढवणे गरजेचे आहे. विभागीय कार्यालयाने ऑनलाइन मंजुरी प्रणालीचा अवलंब करून वेळ वाचवता येऊ शकतो. तातडीने उपाययोजना न केल्यास अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि करिअर धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुलाच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी नॉन क्रिमीलेअर दाखला आवश्यक आहे. त्यासाठी अर्ज केला होता. मात्र, अनेक वेळा हेलपाटे मारूनही दाखला मिळत नव्हता. पुण्यातून मंजुरी येईपर्यंत वाट पहावे लागत आहे. या ठिकाणीच दाखला मिळण्याची प्रक्रिया हवी.
- अशोक जाधव, नागरिक.
नॉन क्रिमीलेअर दाखला देण्याचा अधिकार प्रांताधिकाऱ्यांना आहे. आमच्याकडे अर्ज केल्यानंतर तो हवेली प्रांत कार्यालयाकडे पाठवला जातो. तिथून मंजुरी मिळाल्यानंतरच आम्ही दाखला देतो. २१ दिवसांत दाखला देण्याचा प्रयत्न करतो.
- जयराज देशमुख, अपर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.