पिंपरी, ता. ६ : शहर व परिसरात जमिनींचे भाव आकाशाला भिडले असताना बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी बळकाविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. या प्रकरणांत अनोळखी व्यक्तीं इतकेच नातेवाइकांकडूनही फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. विविध पोलिस ठाण्यांत यासंदर्भातील गुन्हे नोंद होत आहेत.
वारस नोंदणी, विभाजन, कौटुंबिक जमीन वाटप यासंदर्भात विश्वासाचा गैरवापर करून बनावट सातबारा, खरेदीखत व इतर सरकारी नोंदी तयार करून जवळच्या नात्यातील व्यक्तीच जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेक प्रकरणांत उघड झाले आहे. काही प्रकरणांमध्ये जमीनमालक गावी नसल्याचा फायदा घेत नातेवाईकांकडून मालकी हक्क सिद्ध करण्याचे प्रकारही घडत आहेत. अनेक प्रकरणात पीडित नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून काही प्रकरणे न्यायालयातही गेली आहेत.
काय करता येईल ?
- जमिनीची कागदपत्रे वेळोवेळी तपासणे
- फेरफार नोंदीवर लक्ष ठेवणे
- वारस नोंदणी तातडीने करणे
- संशय आल्यास त्वरित पोलिसांत तक्रार देणे
जमिनीला सोन्याचा भाव
जमिनीला सोन्याचा भाव आल्याच्या पार्श्वभूमीवर फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्याने सर्वसामान्य जमीनमालक त्रस्त झाले आहेत. त्याला आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. तसेच महसूल विभाग व निबंधक कार्यालयांनी देखील पडताळणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.
परस्पर ‘उद्योग’
काही जणांशी संगनमत करून जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली जातात. त्यानंतर आपल्या नावाची जमीन भलत्याच व्यक्तीच्या नावावर झाल्याचे खऱ्या जमीन मालकाला समजल्यानंतर संबंधिताला अक्षरशः धक्का बसतो. काय करावे काहीच सुचत नाही. काही कालावधीनंतर ही बाब समोर येते.
मागील दोन महिन्यांतील दाखल गुन्हे
- २६ सप्टेंबर
आळंदीजवळील केळगाव येथे जमिनीचे पूर्वी साठेखत व कुलमुखत्यारपत्र रीतसर खरेदीखत झाल्याचे माहीत असतानाही तीच जागा पुन्हा विकून फसवणूक
- २९ सप्टेंबर
मारुंजी येथे जागा रजिस्टर कुलमुखत्यारपत्र साठेखताने लिहून घेतली असताना जागेची बनावट कागदपत्रे बनवून तिची विक्री, एकाची दोन कोटी ४० लाखांची फसवणूक
- ४ ऑगस्ट
आळंदी येथे खोटे मृत्यू प्रमाणपत्र व खोटे प्रतिज्ञापत्र बनवून जमीन बळकाविण्याचा प्रयत्न
आमच्या वडिलांनी १९९२ मध्ये जमीन खरेदी केली. त्यावर बांधकाम करून आम्ही तेथे राहत आहोत. त्याचा करही भरतो. सर्व कागदपत्रेही आमच्या नावे आहेत, असे असताना काही जणांनी आमच्या नावे परस्पर बनावट कागदपत्रे तयार करून आमची जमीन भलत्याच व्यक्तीच्या नावावर केल्याचे समोर आले. याबाबत आम्ही संबंधित विभागांकडे तक्रार केली आहे.
- एक नागरिक