पिंपरी, ता. १६ ः शहरातील रस्ते व नदी-नाल्यांच्या कडेला अनधिकृत भराव व बांधकाम राडारोडा, कचरा टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. अशांवर कारवाई करण्यासाठी आता महापालिकेने दोन संस्थांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून सर्व ठिकाणी चोवीस तास देखरेख केली जाणार असून, करडी नजर ठेवत कारवाई केली जाणार आहे.
शहराचे सौंदर्य व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी महापालिका वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी कचरा, राडारोडा, प्लॅस्टिक टाकणे, आरएमसी प्लॅंटमधून होणारे हवेचे प्रदूषण, बांधकामाच्या ठिकाणी होणारा कर्कश आवाज, शहरात होणारे ध्वनी प्रदूषण, घर बांधकाम करताना घराच्या बाहेर टाकला जाणारा राडारोडा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर महापालिका २४ तास लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी शुभम उद्योग आणि सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी या संस्थांची स्वतंत्रपणे नेमणूक केली आहे. शहरातील पर्यावरणाची हानी करणाऱ्या कंपन्या किंवा समाजकंटकांवर या संस्थेमार्फत लक्ष ठेवण्यात येणार असून, पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
कायदा काय सांगतो?
महापालिका बांधकाम व्यवस्थापन २०१६, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६, बांधकाम राडारोडा मार्गदर्शन तत्त्वे, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन मार्गदर्शन तत्त्वे, ई-कचरा व्यवस्थापन नियम २०२२, प्लॅस्टिक व्यवस्थापन नियम २०२२ इत्यादी नियम व अधिनियमानुसार शहर सौंदर्यीकरणाला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
यामुळे होणार कारवाई
- सार्वजनिक ठिकाणी घनकचरा टाकणे, अस्वच्छता करणे
- रस्ते वा पदपथांवर अस्वच्छता करणे, कचरा टाकणे किंवा जाळणे
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे
- सार्वजनिक सभा संपल्यानंतर साफसफाई न करणे
- जैववैद्यकीय घनकचरा सार्वजनिक ठिकाणी फेकणे
- बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा उपयोग करणे
- मोकळ्या जागा अस्वच्छ ठेवणे
- डासोत्पत्तीस कारणीभूत जागा निर्माण करणे
- उद्योग, कारखान्यांतील सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदी-नाल्यांत सोडणे
महापालिकेचे आवाहन...
- नागरिकांनी सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे
- घरातील कचरा इतरत्र न टाकता योग्य ठिकाणी टाकणे आवश्यक
- औद्योगिक कंपन्यांनी रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया करून नदीत सोडणे आवश्यक
- शहर सौंदर्यासाठी सफाईबरोबरच नागरिकांचाही सहभाग गरजेचा
‘‘शहरात महापालिकेचे सहा हजाराहून अधिक सफाई कर्मचारी दररोज स्वच्छता करतात. नागरिकांनीही शहर स्वच्छ ठेवावे. कोणत्याही प्रकारे पर्यावरणास हानिकारक कृती केल्यास, नियमांचे उल्लंघन केल्यास नागरिक, कारखानदार, बिल्डरांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.