उद्योगनगरीभोवती मिसिंग लिंकचे ‘नेटवर्क’
‘पीएमआरडीए’चे १० ठिकाणी नियोजन : भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आपल्या हद्दीत दहा ठिकाणी पर्यायी रस्ते (मिसिंग लिंक) तयार करणार आहे. त्यासाठी ८५७ कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार करून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. ‘मिसिंग लिंक’ तयार झाल्यास पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि आयटीनगरीचा वाहतुकीचा ताण कमी होऊन कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
‘पीएमआरडीए’कडून ११ ठिकाणी मिसिंग लिंक करण्याचे नियोजन होते. त्यामध्ये कान्हे रेल्वे स्टेशन येथील नवीन रस्ता तयार करण्याला विरोध झाला. तसेच काही तांत्रिक अडथळे आले. त्यामुळे याचा विचार सध्या केला जाणार नाही. उर्वरित दहा ठिकाणी भूसंपादन करून रस्त्यांच्या कामाला सुरूवात होणार आहे. चार तालुक्यांमधून हे रस्ते जोडण्यात येणार आहेत. यामध्ये खेड, शिरूर, मावळ, मुळशी आदी तालुक्यांचा समावेश आहे. खेड तालुक्यात चार, शिरूर, मावळ आणि मुळशीमध्ये प्रत्येकी दोन ‘मिसिंग लिंक’ होणार आहेत. यासाठी ८५७.५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर कार्यवाही वेगाने होण्याची अपेक्षा आहे.
तालुकानिहाय ‘मिसिंग लिंक’ (कंसात अपेक्षित खर्च रुपयांत)
खेड -
-३० मीटर रुंदीचा तळेगाव-चाकण महामार्ग. हिंगणे चौक ते चाकण औद्योगिक वसाहत टप्पा ३ येथे वोल्कस्वॅगण कंपनी खराबवाडीला जोडणारा रस्ता. (२४ कोटी ६५ लाख)
-मौजे नाणेकरवाडी येथील सॅनी कंपनी ते राज्यमार्ग ६० येथील समृद्धी सीएनजी पंपाला जोडणारा रस्ता. (३३ कोटी चार लाख)
- मौजे मेदानकरवाडी, येथील राष्ट्रीय महामार्ग ६० येथील बंगला वस्ती चौक ते राष्ट्रीय महामार्ग ५५ रासे फाटा पर्यंतचा रस्ता.(१११ कोटी ७५ लाख)
- पश्चिम बाह्यवळण : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ६०, चाकण एमआयडीसी टप्पा-५ तसेच तळेगाव एमआयडीसी ते जुना मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग. (९१ कोटी ६८ लाख)
मुळशी -
- बालेवाडी स्टेडियमजवळून म्हाळुंगे गावातून जाणारा रस्ता. (२६ कोटी पाच लाख)
- ३० मीटर रुंदीचा सूर्या हॉस्पिटल (पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८) ते साखरे वस्ती हिंजवडी फेज-१ (३९ कोटी ६५ लाख रु.)
शिरूर -
- प्रमुख राज्य मार्ग ५ सणसवाडी ते राष्ट्रीय मार्ग ५५ पिंपळे जगताप जोडणारा प्रमुख मार्ग करणे (७९ कोटी ८ लाख)
- तळेगाव ढमढेरे मॅझॅक इंडिया कंपनी एल अँड टी फाटा पिंपळे जगताप ते करंदी फाटा रस्ता करणे (११५ कोटी)
मावळ -
-स्काय-वॉक प्रकल्पास मुंबई-पुणे महामार्गापासून जोडणारा पर्यायी रस्ता (४५ कोटी ७३ लाख)
- देहू-येलवाडी रस्ता करणे (२.२ किलोमीटर, रुंदी- ३० मीटर) (१२५ कोटी)
चौकट :
या ठिकाणच्या वाहतूक कोंडीला पर्याय -
बालेवाडी स्टेडियमजवळून जाणाऱ्या मिसिंग लिंकमुळे सुस-बाणेर, तसेच चांदणी चौकाकडून येणारी वाहने म्हाळुंगेतून हिंजवडी फेज-एक, दोन आणि तीनकडे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे वाकड येथील छत्रपती चौक, हिंजवडीतील काही भागांत होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे. तर, देहू येलवाडी ‘मिसिंग लिंक’मुळे चाकण-शिक्रापूर रस्त्यावरून थेट पिंपरी-चिंचवडला जोडण्याचा मार्ग उपलब्ध होईल. तसेच जुना पुणे-मुंबई मार्ग जोडला जाणार असल्याने पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीला आळा बसेल. स्काय वॉक प्रकल्पास पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याने लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी थांबणार आहे.
कोट :
शहरातून जाणारी वाहने बाहेरून वळविण्याचा उद्देश आहे. मिसिंग लिंकमुळे मार्गांमुळे हिंजवडी, लोणावळ्यासह इतर औद्योगिक परिसर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतून कोंडीला आळा बसेल. यासाठी भूसंपादन केले जाणार आहे. त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.
- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.